संविधान केंद्रित भारताच्या निर्मितीसाठीचे कार्यक्रम घ्यावेत!
प्रा.लक्ष्मण गुंजाळ यांचे आवाहन
बीड (प्रतिनिधी )-
दरवर्षीप्रमाणे26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा होत आहे.या निमित्ताने संविधान केंद्रित नवभारताच्या निर्मितीसाठीचे विविध उपक्रम/कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन संविधान समितीचे सचिव प्रा. लक्ष्मण गुंजाळ यांनी केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की 26 नोव्हे. 1949 या दिवशी स्वतंत्र भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह घटनाकारांनी देशाला संविधान अर्पण केले. स्वतंत्र देशाचा कारभार कोणत्या पद्धतीने चालवावा, आपली राष्ट्रीय उद्दिष्टे कोणती आहेत,देशाचा जागतिक दृष्टिकोन काय आहे, नागरिकांची भूमिका,अधिकार आणिनागरिकांची कर्तव्य कोणती आहेत याबाबत आपल्या संविधानात जगातील सगळ्यां संविधानापेक्षा अधिक उपयोगिता,स्पष्टता आणि पारदर्शकता आहे. परंतु संविधाना बाबत आपल्याच देशातील लोक अज्ञानी आहेत. जोपर्यंत संविधान केंद्रित भारत निर्माण होणार नाही तोपर्यंत या देशातील कोणत्याही समस्यांचे निराकरण होणार नाही. संविधान प्रचार प्रसारासाठी जाणीवपूर्वक आणि गांभीर्याने विशेष उपक्रमांचे आयोजन देशभर झाले पाहिजे असे नमूद करून प्रा.गुंजाळ यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की शाळा महाविद्यालय स्तरावर संविधान रॅलीचे आयोजन करण्यात यावे. गावामधून अगर शहरामधून रॅलीमध्ये संविधानाचा जयजयकार करणारे महत्त्वाची कलमे नमूद असणारे फलक असावेत. सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्याद्वारे संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा. सेवाभावी संस्था संघटना यांनी संविधानाचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तींची जाहीर व्याख्याने ठेवावीत. संवेदनातील कलमे पाठांतराची स्पर्धा ( लेखी/तोंडी)ठेवावी. शासनाच्या वतीने गाव, तालुका,जिल्हा,विभाग, राज्य,देश पातळीवर संविधानाच्या प्रचार प्रसार करण्यासाठी स्वतंत्र समितीचे गठन करावे. त्यासाठी आर्थिक तरतूद करावी. संविधानाच्या प्रचार-प्रसार करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना पारितोषिके द्यावीत. असे समाज उपयोगी उपक्रम हाती घेतले तरच संविधाननिष्ठ भारत निर्माण होऊ शकेल हे केल्याशिवाय गत्यंतर नाही असेही शेवटी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.