सामाजिक पाठबळाशिवाय समृद्ध राष्ट्र निर्माण अशक्य
कडुदास कांबळे
कळंब ( प्रतिनिधी) दि. 23 - सामाजिक पाठबळाशिवाय समृद्ध राष्ट्र निर्माण अशक्य आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते कडुदास कांबळे यांनी मानवाधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात कळंब येथे मार्गदर्शन करताना सांगितले. राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक सुरक्षिततेसाठी मानवाधिकार कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर कळंब येथे ॲक्शन एड संस्था, लाल पॅंथर आणि श्रमिक मानवाधिकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहामध्ये 23 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे संयोजक श्रमिक मानवाधिकार संघाचे अध्यक्ष काॅ. बजरंग ताटे उपस्थित होते. कडुदास कांबळे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, आज सामाजिक स्तरावर समाज हिताला मारक असणारी स्थित्यंतरे घडताना आपण पाहत आहोत. जाती व्यवस्था ही अधिक बळकट होताना दिसत आहे. धर्मनिरपेक्ष भारतासाठी ही धोक्याची घंटी आहे. सामाजिक पातळीवरील संघटित शक्ती शिवाय समृद्ध राष्ट्र निर्माण अशक्य आहे. म्हणून सामाजिक भान असणाऱ्या महिला पुरुषांनी फुले, शाहू , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या परिवर्तनवादी विचारांची बिजे खोलवर रुजविण्याची गरज आहे. भारतीय संविधान इथल्या शेवटच्या माणसाला समजावून सांगण्याची गरज ही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक चळवळीची गरज नेत्यापेक्षा लोकांना गरजेची वाटली पाहिजे. घरामध्ये आपण जशी मुलाबाळांची जोपासना करतो तेच प्रेम सामाजिक एकोप्याला आणि चळवळीला दिले पाहिजे. असे कॉम्रेड बजरंग ताटे यांनी यावेळी मत व्यक्त केले.
उस्मानाबाद जिल्ह्यातून दलित आदिवासी भटके विमुक्त आणि शोषित घटकातील प्रमुख केडर कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक सुरक्षिततेसाठी आयोजित केलेले मानवाधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी अमर ताटे, सुरेश कांबळे, सुमनबाई काळे, लताबाई काळे, मंगल पवार, वैभव ताटे, राम माने, सुमन काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.