धबधब्यात बुडून चौघांचा मृत्यू
बदलापूर :
बदलापूर जवळच्या कोंडेश्वर मंदिराजवळील धबधब्यात बुडून चार तरूणांचा मृत्यू झालाय. कोंडेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या धबधब्याच्या कुंडात ही चारही मुलं बुडाली असून चौघेही घाटकोपरहून पिकनिकसाठी कोंडेश्वरला आले होते. चौघांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सगळे कोंडेश्वरला आले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला अन वाढदिवस हाच आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला.
घाटकोपरमध्ये राहणाऱ्या आकाश राजू झिंगा या 19 वर्षीय तरुणाचा आज वाढदिवस होता. त्यासाठी तो त्याच्या सहा ते सात मित्रांसोबत बदलापूरच्या कोंडेश्वर परिसरात आला होता. यावेळी आकाश याच्यासह स्वयम बाबा मांजरेकर (वय 18), सुरज मच्छिन्द्र साळवे (वय 19) आणि लिनस भास्कर उच्चपवार (वय 19) असे चौघे कोंडेश्वरच्या धबधब्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्यानं या चौघांचाही बुडून मृत्यू झाला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी या चौघांना पाण्याच्या बाहेर काढलं. तर पोलिसांनी पंचनामा करत त्यांचे मृतदेह बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
कोंडेश्वर धबधब्याच्या खाली अनेक वर्षांपासून पाणी पडल्यानं कुंड तयार झाले असून तिथे आजवर अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या धबधब्याच्या परिसरात जायलाही प्रशासनानं काही वर्षांपासून सक्त मनाई केलेली आहे. मात्र तरीही बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ही बाब माहीत नसल्यानं अनेकांचे याठिकाणी जीव जातायत.
एन दिवाळीत दुःखाचा डोंगर
चार तरूण कुंडात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कुंडातील पाण्यात उड्यात घेत चारही तरुणांना बाहेर काढलं. परंतु, त्याआधीच त्या चारही जणांचा मृत्यू झाला होता. पावसाळ्यात कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी मनाई आदेश लागू होते. असे असताना देखील हा मनाई आदेश न जुमानता अनेक तरुण या ठिकाणी सहलीसाठी येत असतात. स्थानिक गावकरी वारंवार त्यांना विरोध करत असताना देखील या तरुणांनी कुंडाच्या पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घातल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एन दिवाळीत या मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.