बाजार तळावरील वादग्रस्त जागेत कुणीच बांधकाम करू नये . समाज बांधवांचे प्रशासनाला निवेदन
------------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) शहरातील बाजार तळावर गायरान असलेल्या वादग्रस्त जमिनीवर हिंदू - मुस्लिम समाजाने मंदिर-मज्जिद काहीच बांधकाम करू नये यासाठी आज समाज बांधवांनी एकत्र येत प्रशासनाला निवेदन दिले.
गेवराई शहरातील बाजार तळावर पोलीस स्टेशनच्या उत्तर बाजूस सावता नगर- इस्लामपुरा रोडवर पूर्वीची शासकीय गायरान असून याठिकाणी पूर्वीपासून बाजार भरण्यासाठी ही जागा प्रशासनाने नियोजित केलेली आहे. मात्र या शासकीय गायरान जमिनीवर जुनी गढी असून या जागेवर काही हिंदू व मुस्लिम बांधवांकडून दावा करण्यात येत असून मंदिर व मज्जिद बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत माहिती मिळताच शहरातील या परिसरातील काही समाज बांधवांनी एकत्र येत या जागेवर कुठल्याच समाज बांधवानी हिंदू व मुस्लिम बांधवात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये यासाठी आज सकाळपासून मोठ्याप्रमाणात समाज बंधावांनी एकत्र येत प्रशासनाला निवेदन देऊन शांततेचे आवाहन केले आहे.