हंबर्डे महाविद्यालयास नॅकचा A ग्रेड
नवीन प्रणाली मूल्यांकनानुसार तालुकास्तरावर राज्यात प्रथम
आष्टी: प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषद बेंगलोरच्या तृतीय फेरी पुनर्मुल्यांकनात 3.17 गुणांसह अ दर्जा मिळाला आहे. नॅक मूल्यांकनाच्या नवीन प्रणालीनुसार आष्टीच्या हंबर्डे महाविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुसरा व तालुका स्तरावरील महाविद्यालयांत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
1 व 2 सप्टेंबर 2022 असे दोन दिवस नॅक समितीने महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयातील सर्व पायाभूत सुविधा, प्रशासनातील प्रदर्शकता, ई यंत्रणा, अध्यापन अध्ययन प्रक्रिया, गुणवत्तापूर्ण संशोधन, विद्यार्थी कल्याण योजना, नावीन्यपूर्ण कल्पना, समाजाभीमुख उपक्रम व कला क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांची कामगिरी या बाबींची माहिती घेतली. वाराणसीचे डॉ. वशिष्ठ त्रिपाठी, अहमदाबादचे डॉ. अतुल पटेल व बेंगलोरचे डॉ. एम. विश्वनाथैया पीअर टीमने सर्व विभाग, ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाला भेट देऊन आढावा घेतला. समिती सदस्यांनी संचालक मंडळ, प्राचार्य, समन्वयक, विभागप्रमुख, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. एकूण गुणवत्तापूर्ण शिक्षण व समाजाभीमुख उपक्रम बघून समितीने बेंगलोरला ऑनलाईन अहवाल सादर केला. त्यानुसार महाविद्यालयास अ दर्जा प्राप्त झाला असून 3.17 एवढे गुण मिळवणारे हंबर्डे महाविद्यालय विद्यापीठात द्वितीय व तालुकास्तरावरील महाविद्यालयांत राज्यात प्रथम ठरले आहे. यासाठी आय. क्यू. ए. सी. क्लस्टर चे पियुष पहाडे, दीपक ननावरे, आयुब शेख, भारत कानगुडे, रामदास पवार व ग्रीन विवोच्या श्रीमती नाहेदा शेख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. एम. डी. जहागीरदार, प्राचार्य डॉ काकासाहेब मोहिते, प्राचार्य डॉ वसंत सानप यांनी केलेल्या महत्वपूर्ण सूचनांचा फायदा झाल्याची माहिती प्राचार्य डॉ सोपान निंबोरे यांनी दिली. संस्था अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांनी समन्वयक प्रा निवृत्ती नानवटे, डॉ अभय शिंदे व सर्व स्टाफचे अभिनंदन केले.