बदामराव पंडित यांच्या प्रयत्नाला यश
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई न्यायालयाची इमारत उभारून साडे सहा वर्षे झाले, मात्र आतील फर्निचर व इतर कामे रखडल्याने त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी सर्व वकील बांधव धरणे आंदोलनास बसले होते. याची दखल घेऊन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन न्यायालयाच्या इमारतीसाठी तात्काळ निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विधी व न्याय विभागाच्यावतीने गेवराई न्यायालय इमारतीच्या कामासाठी 5 कोटी 52 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. बदामराव पंडित यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई शहराच्या वैभवात भर पाडणारी कोट्यवधी रुपयांची न्यायालयाची इमारत माजी ग्रामविकास राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या प्रयत्नाने उभी राहिली. मात्र राजकीय उलथा पालथ झाल्या नंतर गेल्या साडेसहा वर्षात या इमारतीकडे लोकप्रतिनिधी व काही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे इमारतीच्या आतील फर्निचर आणि इतर कामे झाली नाहीत. त्यामुळे न्यायालयास इमारत असूनही त्या इमारतीत न्याय देण्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. इमारतीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासह न्यायालय परिसरात गटारीचे पाणी साचल्याने दुर्गंधी व परिसर अस्वच्छ झाला आहे, तो स्वच्छ करावा. त्यासोबतच न्यायालयाच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणाचा पडलेला विळखा काढावा या मागण्यांसाठी गेवराई तालुक्यातील सर्व वकील बांधव न्यायालयासमोर अनेक दिवस धरणे आंदोलन केले होते. शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी आंदोलनाच्या दिवशीच सर्व वकील बांधवांची भेट घेतली. न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू अशी ग्वाही दिल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे जाऊन त्यांनी भेट घेतली. गेवराई न्यायालयाच्या इमारतीच्या फर्निचर व इतर कामासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आला असून त्यास तात्काळ मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी केली. या पार्श्वभूमीवर दिनांक 21 ऑक्टोबर 2021 रोजी न्याय व विधी विभागाकडून स्वतंत्र अध्यादेश काढण्यात आला, गेवराई न्यायालयाच्या इमारत सुधारणा टप्पा - 2 साठी 5 कोटी 52 लाख रुपयेच्या कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र सदर कामाची निविदा काढ ण्यात आली नव्हती यासाठी सातत्याने माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी प्रयत्न केले अखेर या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच सदर काम सुरू होणार असल्याचे समजते. त्यामुळे वकील बांधवांची मागणी मार्गी लागत आहे.