गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणुक होणार तिरंगी
कोरोना संकटात वर्षभर लांबली होती निवडणुक
गेवराई :प्रतिनिधी सत्तर कोटींवर वार्षिक उलाढाल असलेल्या गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जूलै महिन्यात होत असलेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच तीन स्वतंत्र पॅनल मैदानात आहेत. त्यामुळे, शिक्षक पतसंस्था निवडणुकीचा निकाल काय लागणार, या विषयी चर्चा होऊ लागल्यात. विशेष म्हणजे कोरोना संकटात एक वर्ष निवडणुक लांबणीवर पडली होती.
दरम्यान, तात्यासाहेब मेघारे आणि विष्णू खेत्रे यांच्यात मतभेद झाल्याने निवडणुकीत रंगत वाढणार असल्याची चर्चा आहे.
गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण,पुणे यांच्या आदेशाने जाहीर झाला असून,7 ऑगस्ट 2022 रोजी येथील मतदान केंद्रावर 911 शिक्षक सभासद मतदार शिक्षक पतसंस्था कुणाच्या ताब्यात द्यायची, याचा फैसला करतील.
गेवराई तालुका शिक्षक पतसंस्थेवर गेली अनेक वर्ष आदर्श शिक्षक नारायणराव मोटे व व्ही.जी. खंडागळे यांचे वर्चस्व होते. पतसंस्थेला एका उंचीवर नेऊन, शिक्षक सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले होते.शगेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेवर मेघारे-खेत्रे गटाचे वर्चस्व राहीले असून, या वर्षीची निवडणुक तिरंगी होईल, असे चित्र आहे. मेघारे -खेत्रे यांच्या मध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाल्याने दोघेही वेगवेगळ्या पॅनल च्या माध्यमातून निवडणुकीत उतरले आहेत. तसेच, नेहमी दुरंगी होणारी निवडणुक यंदा मात्र तिरंगी होणार आहे. कास्ट्राईब महासंघाचे सरचिटणीस बापूसाहेब ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नवक्रांती पॅनल शिक्षक पतसंस्था विकास पॅनल निवडणुक लढविणार आहे. तात्यासाहेब मेघारे, विष्णुपंत खेत्रे आणि बापूसाहेब ससाणे या तिन शिक्षक नेत्यांच्या नेतृत्वाखाली तीन पॅनल मैदानात उतरले आहे. गाठीभेटी सुरू झाल्यात. जवळपास सत्तर कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या पतसंस्थेत 20 कोटी रुपयांवर ठेवी आहेत. संस्थेला स्वतःची जागा, भव्य कार्यालय असून, सदरील संस्था ताब्यात ठेवण्यासाठी तिन ही पॅनल मैदानात उतरलेत.