पाण्याच्या शोधत दोन काळविटांचा विहिरीत पडून मृत्यू ; जळगाव मजरा येथील घटना
---------------
गेवराई (प्रतिनिधी) : संपुर्ण जून महिना लोटला तरी गेवराई तालुक्यात पेरण्यायोग्य ही पाऊस न झाल्याने वन्य जीवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्याच्या शोधात भटकंती करत असतांना दोन काळविट विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जळगाव शिवारात शुक्रवारी रात्री घडली. दरम्यान ग्रामस्थांनी दोन्ही काळविटांना विहीरीबाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जवळगाव शिवारात विहीरीत शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दोन काळविट पडले असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर गावचे पोलीस पाटील बाबासाहेब खुणे यांनी वनविभागाचे वनपाल टाकणकर यांना याची माहिती दिली. वन पाल यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्रामस्थांनी दोन्ही काळविटांना विहीरीबाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता . दोन्ही काळविटांना विहीरीबाहेर काढण्यासाठी श्रीमंतयोगी ग्रुपचे सर्वसदस्य , गोविंद बाबासाहेब खुणे , सरपंच पिंटूभाऊ , झुंबर इदगे , शहाजी इदगे , रखमाजी मोरे , कृष्णा इदगे , कुंडलीक खुणे , सुर्यभान खुने यांनी परिश्रम घेतले.