कोरोना महामारीमुळे लघु वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत
नियमित प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांना सरसकट जाहिरात दर वाढ द्यावी
संपादक संघाची महासंचालकांकडे निवेदनाद्वारे मागणी
बीड (प्रतिनिधी)- जगभरात आलेले कोरोनाचे संकट, लॉकडॉउन आणि कागद, त्यावरील जी एस टी कर यासह इतर साहित्यांचे वाढलेले दर यामुळे लघु वृत्तपत्रे अडचणीत सापडलेली असतानाच शासकीय जाहिरात दरवाढ प्रस्तावातील कागदपत्रांच्या त्रुटीमुळे वर्षानुवर्ष नियमित प्रकाशित होणार्या वृत्तपत्रांना दरवाढ मिळू शकली नाही. दरवाढ मिळू न शकलेल्या लघु वृत्तपत्राना सरकारने सहानुभूती पूर्वक विचार करून मदतीचा हात देऊन सरसकट जाहिरात दर वाढ द्यावी अशी मागणी बीड जिल्हा संपादक संघाने माहिती महासंचालक मुंबई आणि विभागीय संचालक औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माहिती व जनसंपर्क विभागाने दि.13 ऑगस्ट रोजी राज्यातील 842 वृत्तपत्रांच्या श्रेणी व जाहीरात दरवाढीचा शासन आदेश जारी केला आहे. राज्यातून प्रस्ताव दाखल झालेल्या अनेक वृत्तपत्रांच्या प्रस्तावातील काही त्रुटीमुळे नियमितपणे प्रकाशित होणार्या लघु वृत्तपत्रांनाही दरवाढ मिळू शकली नाही. आधीच करोना महामारीचे संकट, कागद आणि त्या वरील जी एस टी कर तसेच शाई, केमिकल आदी साहित्यांचे वाढलेले दर यामुळे लघु वृत्तपत्र व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला असतानाच शासनाने वृत्तपत्रांना सहानुभूती पूर्वक विचार करून सरसकट जाहिरात दर वाढ देऊन मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
नियमित प्रकाशित होणार्या अनेक वृत्तपत्रांच्या प्रस्तावांवर काही त्रुटीमुळे सकारात्मक निर्णय होवू शकला नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी याबाबत लेखी मात्र कळवलेले नाही. त्यामुळे नियमित प्रकाशित होणार्या वृत्तपत्रांवर ही बाब अन्यायकारक असल्याची भावना अनेक संपादकांमधून व्यक्त केली जात आहे. दरवाढीच्या प्रस्तावातील त्रुटी संबंधितांना कळवून त्या पूर्ण करण्याची संधी दिली जावी. कोरोना महामारिमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लघु वृत्तपत्रांना सहानुभूतीपूर्वक मदत करण्याच्या दृष्टीकोणातून सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी बीड जिल्हा संपादक संघाच्या वतीने माहिती महासंचालक आणि विभागीय संचालक औरंगाबाद यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर संपादक संघाचे अधक्ष्य नरेंद्र कांकरिया, सचिव राजकुमार होळकर, संपादक सर्वोत्तम गावरसकर, दिलीप खिस्ती, विलास डोळसे, अभिमन्यू घरत, शेखरकुमार, अनिल वाघमारे, साहस आदोडे आदींच्या सह्या आहेत.