गेवराई बाजार समितीला ‘शेतकरी भवन' बांधकामास मंजुरी
===============
आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नांना यश
===============
गेवराई, (प्रतिनिधी) ः- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजने अंतर्गत गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या रु.१८६.३१ लक्ष रक्कमेच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. गेवराई शहरात येणाऱ्या शेतकरी बांधवांना या माध्यमातून मुक्कामाची सोय भविष्यात होणार आहे. गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी भवन मंजुर व्हावे यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप यांच्यासह संचालक मंडळाने दोहोंचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे.
मराठवाड्यातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने आजवर विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना मुलभूत सुविधांसह गेवराई शहरात मुक्कामाची सोय व्हावी यासाठी शेतकरी भवन बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. शासनाच्या पणन विभागाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजने अंतर्गत गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या रु.१८६.३१ लक्ष किंमतीच्या अंदाजपत्रकास दि.१ जुलै रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता दिली आहे. याकामी आ. विजयसिंह पंडित यांनी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला होता.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीला नवीन शेतकरी भवन बांधकामास मंजुरी मिळाल्याबद्दल आ. विजयसिंह पंडित यांनी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार, पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांना मुक्कामाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप यांच्यासह संचालक मंडळाने माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे. गेवराई शहरालगत बाजार समितीच्या व्यापारी संकुला लगत लवकरच शेतकरी भवनाची देखणी वास्तू उभारली जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुक्कामासह आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शेतकरी भवनाला मंजुरी मिळाल्याबद्दल गेवराई तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.
