*मेहेर मेळावा: तरुणाईचा दुर्दम्य उत्साह*
मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शिराळचिचोंडी गावात आनंद ऋषी महाराज साहेब यांच्या पावन भूमीत मेहेर परिवारातील सुमारे 300 सदस्य एकत्र आले. मेहेर कुळाच्या पूर्वजांनी जर स्वर्गातून हा सोहळा पाहिला असेल तर त्यांना नक्कीच समाधान वाटलं असेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले मेहेर परिवाराचे सदस्य एका छताखाली एकत्र आले ह्याचा सर्वांनाच खूप आनंद झाला.
वेगवेगळ्या बॅचचे वर्गमित्र जसे खूप वर्षांनी एकत्र येऊन गेट टुगेदर करतात तसे मूळ मेहेर आडनांव असलेले आपले सर्व बांधव एकत्र येऊ शकतील काय अशी कल्पना माझ्या मनात अनेक वर्षांपासून घोळत होती; पण ज्याचं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर काहीच माहीत नाही त्यांना संपर्क कसा करायचा हा प्रश्न होताच. फेसबुक, व्हॉट्स ॲप, इंस्टाग्राम अशा समाज माध्यमांच्या व गुगल फॉर्म या तंत्रज्ञानाच्या मदतीने कल्पनेला मूर्त स्वरूप देता आले ह्याचा मला मनस्वी आनंद वाटतो. खास निमित्त किंवा प्रयोजन काही नव्हते, फक्त मेहेर आणि मेहेर परिवारातील प्रौढ आणि तरुण सदस्यांना एकत्र बोलावून परिचय करून घेणे, परस्परांना जाणून समजून घेणे, पिढ्यांतील वाढत चाललेले अंतर कमी करणे आणि हरवत चाललेला संवाद पूर्ववत करणे या स्वच्छ हेतूने मी फक्त एक पाऊल टाकले. इतरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. समवयस्क ह्या कल्पनेनेच खुश झाले, तरुणाई प्रफुल्लित झाली आणि त्यांनीच सूत्रे हातात घेतली. बघता बघता हजारो बांधव जोडले गेले. खास करून तंत्रस्नेही यंगस्टर खूपच उत्साहाने काम करत होते. गुगल फॉर्म रोज नवे अपडेट आणि आकडे देत होते. योगायोगाने तारीखही एक सात म्हणजे जणू एकसाथ अशीच होती. एक जुलैला सकाळपासूनच चारही दिशांनी गाड्या शिराळचिचोंडीकडे कूच करत होत्या. दूरच्या लोकांनी आदल्या रात्रीच मुक्कामाचे नियोजन केले होते. शंभरेक मेहेर्स जमतील असा अंदाज होता, प्रत्यक्षात सुमारे तीनशे लोकांनी हजेरी लावली.
एक अनामिक उत्सुकता, उत्साह आणि अगतिकता जवळपास प्रत्येक सदस्याची होती. सकाळी 9.30पासून सायंकाळी 5 पर्यंत हा स्नेहमेळावा चालू होता. ह्या आठ नऊ तासांत कुणाला बोर झालं नाही किंवा कुणाला घाई गडबड नव्हती. सगळ्यांना ॲट होम वाटत होते, अगदी दिवसभर. मेहेर मेळाव्याची संकल्पना जरी माझी होती तरी इतरांचे सहकार्य, मदत, पाठिंबा, मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाख मोलाचे होते. हा आपला घरचा कार्यक्रम आहे असे वाटत असल्याने प्रत्येक जण स्वयंसेवकाच्या भूमिकेत होता, जणू मीच पाहुणा आणि मीच यजमान.
मेहेर एवढेच नाव पुरेसे वाटते, इतर नामोल्लेख करणे सयुक्तिक वाटत नाही तरीही काही नावांशिवाय लिहिता येणार नाही. राजेशजी, दिलीपजी, राजेंद्रजी ललितजी, पूनमजी, चंद्रकलाकाकीजी, राजूशेठ, रवीशेठ ह्यांच्या सहकार्याशिवाय हा सोहळा संपन्न झाला नसता. यंगस्टर्स सुमित, सागर, प्रशांत, प्रीतम ह्यांची ऊर्जा ह्या सोहळ्याला एका उंचीवर घेऊन गेली. महिलांचा सहभाग म्हणण्यापेक्षा पुढाकार कौतुकास्पद होता. प्रत्येक इव्हेंटला स्वतःहून सूत्रसंचालन करत त्यांनी रंगत आणली. रेखाभाभी, कल्पनाभाभी, उज्ज्वलाभाभी, पूनमभाभी, ज्योत्स्नाभाभी आणि माझी अर्धांगिनी ज्योती ह्यांची रसिकता उल्लेखनीय होती. आष्टीचे सुप्रसिद्ध व्यापारी संजयशेठ मेहेर यांचे मार्गदर्शन आमच्या आणि नंतरच्या पिढीसाठी मोलाचे होते. बायोडेटाच्या माध्यमातून देशभर परिचित असलेले अनिल मेहेर यांनी समाजहिताच्या दोन गोष्टी सांगितल्या. लहान मुलींचा डान्स खूपच मोहक होता. नागपूर, जळगाव, अडावत, श्रीगोंदा, आष्टी आणि इतर ठिकाणांहून स्वखर्चाने निश्चित लोकेशनला आलेले मेहेर परिवारातील सदस्य हेच या मेळाव्याचे खरे आकर्षण. जैन समुदाय दानधर्म करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेच, त्यातल्या त्यात मेहेर आणि त्यात पुनः आष्टीचे मेहेर ज्वेलर्स यांनी सर्वांसाठी गिफ्ट आणले होते. जामखेडच्या भाभीनी गौतम प्रसादीसाठी एकावन्न हजार दिले. ह्या सहभागाचे आणि दानधर्माचे मूल्य पैशात करता येत नाही. सर्वांनी सढळ हाताने योगदान दिल्याने पूंजी अजून शिल्लक आहे, भविष्यात वापरू. असे मेळावे पुन्हा पुनः होतील, हा दिवस सदैव स्मरणात राहील. मेळाव्यातील आठवणींचा सुगंध सदैव दरवळत राहील. ही संकल्पना माझ्या मनात कुठून आली माहीत नाही, कदाचित मेहेर मेळावा ही परमेश्वराचीच योजना असेल.
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव तथा श्रावक संघ आष्टी सचिव किंवा केरोसिन फेडरेशनचा जिल्हाध्यक्ष यापेक्षा सर्वांनी बहाल केलेले मेहेर फाउंडेशनचा अध्यक्ष हे पद मला मला अधिक महत्वाचे वाटते. स्नेह असाच वृध्दिंगत होईल. मेहेर या शब्दाचा अर्थ मराठीत कृपा, दया असा होतो. मेहेर आहेतच तेवढे कृपाळू. आणीबाणी शब्द सध्या चर्चेत असताना ही मेहेरबानी मला विशेष भावली.
श्री. अतुलकुमार मनसुखलाल मेहेर
अध्यक्ष, मेहेर फाउंडेशन महाराष्ट
8390304030 /9890304030
