कसा असतो गुड टच, बॅड टच.....!
सहा सात वर्षांपूर्वी ज्येष्ठ लेखिका अरूणा ढेरे यांचा एक लेख वाचलात आला होता. लहान मुलांसाठी त्या छान छान गोष्टी स्वरूपात शब्दबद्ध होत असतात. त्यांचा हा संवाद मायेचा आणि आपुलकीचा असतो. त्या दिवशी वाचलेल्या लेखाचा मथळा (हेडींग) होता, गुड टच बॅड टच..! खूप छान लेख होता. विशेष म्हणजे, महिलांसाठी आणि खास करून एका आई साठी उत्तम प्रकारचे मार्गदर्शन, होते. एक हळुवार संदेश, त्याच बरोबर सजग नागरिक म्हणून जागे रहा, असा आर्जव करणारा, हक्काने चार गोष्टी ध्यानात आणून देणारा होता. आज त्यांच्या लेखाची आठवण आली. कारण, मा. न्यायलयाने ऐतिहासिक निकाल देऊन सावित्रीच्या लेकिंना नवे , कणखर कवच कुंडल बहाल केले आहे.
शोषणाच्या गुन्ह्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने 18 नोव्हेंबर 2021 रोजी ऐतिहासिक निकाल देऊन नागपूर खंडपीठाचा आदेश रद्द केला. त्यामुळे, वाईट हेतूने अल्पवयीन मुलींना स्पर्श करणे हे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पॉक्सो) गुन्हा ठरणार आहे. संबंधित पीडितेच्या गुप्तांगांना कपड्यावरून स्पर्श करण्यात आल्यामुळे तो शोषणाचा प्रकार ठरत नाही, असे म्हणता येणार नाही. अशा पद्धतीने कायद्याचा अर्थ लावता येणार नाही. याआधी निर्दोष ठरविण्यात आलेल्या आरोपीला पुन्हा दोषी ठरविले. संबंधित दोषीला पॉक्सो कायद्याअंतर्गत तीन वर्षांची शिक्षा ही ठोठावण्यात आली आहे. बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्ष स्पर्शाचा मुद्दा बाजूला ठेवतानाच लैंगिक हेतूने साधलेली जवळीक, संपर्क हे लैंगिक शोषणच असल्याचे स्पष्ट केले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊन, निरागस मुलींचे संरक्षण केले आहे.
कुलगुरू शिवाजीराव भोसले सांगायचे, एखाद्या गोष्टीचे लंगडे समर्थन तुम्ही कराल, पण मग काळ कधी तुमच्यावर मानगुटीवर बसेल कळणार ही नाही. म्हणून, वेळीच लक्ष घालण्याची गरज होती. या अर्थाने कायद्याचे नवे कवच कुंडले महत्त्वाचे राहतील. असा हा निकाल आहे. समस्त मुलींच्या हिताला न्याय मिळाला आहे. त्याबद्दल आनंद आहे.
पाटीपोटी असणाऱ्या आईबाबांना या आदेशाचे महत्त्व अधीक असणार आहे. लैंगिक शोषणाचे कायदे अधिका कठोर करण्यामागे समाजात घडणाऱ्या घटना आणि त्या अनुषंगाने कठोर कायदे आवश्यक आहेत. न्यायालयाने पून्हा एकदा ते अधोरेखित केले ते योग्यच झाले आहे.
शोषण अनौळखी माणुस करतोच पण त्या ही पेक्षा
ओळखीच्या आणि विशेषत जवळच्याच लोकांकडून लैंगिक शोषणाचे प्रयत्न होतात, ही बाब लपून राहीलेली नाही. काही वेळा विश्वासाने विश्वासघात होतो. सार्वजनिक ठिकाणी स्त्रीलंपट माणसे एकट्या महिलेला नकळत स्पर्श करायचा प्रयत्न करतात. सरकारी कार्यालये,
एसटी, खाजगी बसेस, रिक्षा इत्यादी गर्दीच्या, वरदळीच्या ठिकाणी असे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते. चित्रपटातून ही अशा "टच" वर प्रकाश टाकून समाजातील पुरूषी मानसीकतेचा बुरखा टराटरा फाडलेला आहे. काही बहादूर महिला अशा कठीण प्रसंगात बरोबर लेडीज टचचा हिसका दाखवतात. एसटी बस मध्ये पुढे बसलेल्या महिलांना पाठीमागून टच करण्याचे प्रकार घडलेले आहेत. गर्दीच्या वेळी लगट करून स्पर्श केला जातो. अशा रगेल आणि आंबट शौकिनांना प्रसाद दिल्याचे प्रकार ही व्हायरल झालेले आपण अनेकदा पहात आलो आहोत.
शालेय स्तरावर विविध विषयात, खेळात तरबेज असलेल्या आणि यश मिळालेल्या मुलामुलींना शाबासकी दिली जाते. कधी पाठीवर थाप मारून तर कधी आपुलकीने जवळ घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते. परतू , कौतुकाच्या वेळी केलेला, झालेला स्पर्श विद्यार्थ्यांना समजला पाहिजे. आता नवा जमाना आलाय. तंत्रज्ञान सोबतीला आहे. विविध माध्यमं सोबतीला आहेत. त्यामुळे, बरे वाईट कळू लागले आहे. तरीही, मुलींच्या बाबतीत आईने सजग राहायला हवे. मुलगी वयाने वाढते तसा तिच्याशी संवाद वाढला पाहिजे.
आठवडय़ातून एकदा का होईना मुलीशी लैंगिक विषयांवर संवाद व्हायला हवा. खर तर, ग्रामीण भागातील आई नकळतपणे मुलीला सगळे विषय समजून सांगत असते. त्यात अधिकचा खुलेपणा यायला हरकत नाही. आई आणि मुलीच नात मैत्रीणीच असायला हवे. शहरी आई नौकरीला जाते, त्यामुळे तिला कमी वेळ मिळत असेत तर वेळ काढून मुलीशी संवाद साधला पाहिजे. एखाद्याने अंगाला केलेला स्पर्श आणि त्यातला हेतू समजून यायला वेळ लागत नाही. फक्त आईने सांगितलेल्या "त्या" चार हिताच्या गोष्टी मुलीच्या कानावर असाव्यात. म्हणजे, नैतिक मूल्यांची जपवणूक कशी करावी, याचे भान यायला मदत होईल. भारतीय संस्कृती तिचा वारसा जगात कुठे ही दिसणार नाही, एवढी काळजी, सजगता आणि त्याच बरोबर एक प्रकारचे नैतिक भान आपल्या संस्कृतीत पहायला मिळते. बापाची चप्पल मुलाच्या पायात आली की, बाप मुलाशी अदबीने वागतो. मुलगी उपवर झाल्यावर तिचयाशी संयम ठेवून वागणारा ,बोलणारा बाप जगाच्या पाठीवर कुठे दिसणार नाही. एकीकडे आपली संस्कृती, त्याचा वारसा सांगणारे आपण; लैंगिक शोषणाच्या समस्येने चिंतेत आहोत. हे वास्तव दुर्लक्षित करून चालणार नाही. सरकारी कार्यालयात ही महिलेला अचानक पणे अशा प्रसंगाचा सामना करावा लागतो. एखादी विवाहित स्त्री काही वेळा ते सहन करते. एकतर लोक लज्जा आणि दुसरे म्हणजे सासरचा धाक..! हेतू ठेवून बोलणे, त्यातून आलेल्या कॉमेंट तिच्या लक्षात येतात. नाही असे नाही, पण काही वेळा मुकपणे सहन करावे लागते. गप्प बसून किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे लागते. गुड टच, बॅड टच, बॅड काॅमेन्ट, हा विषय स्त्रीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. त्यात काही कच्चे दुवे ही असू शकतील, पण शालेय वयायल्या मुलांमुलींच्या दृष्टिने मा. न्यायालयाचा निकाल अंत्यत महत्त्वपूर्ण आणि आईबाबांना दिलासा देणारा आहे. मुला मुलींनी खेळावे, बागडावे, मस्ती ही करावी पण हेतू ठेवून कोणी अंगाशी चाळे करत असेल तर त्याची माहिती घरी दिलीच पाहिजे. वेळ निघून गेल्यावर जागे होणे, कुणासाठीच चांगले नाही. वखवखलेल्या नजरेने पहाणारे नराधम आपल्याच अवतीभवती आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. म्हणून, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च वाटतो. मा. न्यायमूर्तीना सलाम...!
सुभाष सुतार
(पत्रकार)
