महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

कवी सय्यद अल्लाउद्दीन यांचा कविता संग्रह ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’

कवी सय्यद अल्लाउद्दीन यांचा कविता संग्रह ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’
(कवी प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांच्या ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’ या पहिल्याच कविता संग्रहाचे प्रकाशन परळी येथे भरलेल्या 71 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी ना.धों. महानोर यांच्या हस्ते 24 एप्रिल 1998 रोजी झाले. दुस-या आवृत्तीचे प्रकाशन कला, वाणिज्य तथा आताच्या अॅड. बी.डी. हंबर्डे महाविद्यालय, आष्टी (जि.बीड) चे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी.डी.हंबर्डे यांच्या हस्ते संपन्न झाले. आता तिस-या आवृत्तीचे प्रकाशन नाशिक येथे दि. 3,4,5 डिसेंबर रोजी संपन्न होणा-या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार आहे. या पुस्तकाला ज्ञानपीठ विजेते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या शुभेच्छा लाभल्या असून ज्ञानपीठ विजेते कन्नड साहित्यिक अभिनेता गिरीश कर्नाड यांचा सुंदर इंग्रजी हस्ताक्षरात सुंदर अभिप्राय लाभला आहे. कसुमाग्रजासह राम शेवाळकर, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. यू.म. पठाण, डॉ. सौ. सुहासिनी इर्लेकर, डॉ. प्रकाश मेदककर, प्रा. फ.मुं.शिंदे, महावीर जोंधळे, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, महेश कळुसकर, प्रा.दत्ता भगत, जीवन किर्लोस्कर, प्रा.अनंत हंबर्डे, दिवंगत दया पवार, यांची पाठराखण लाभली आहे. ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’ च्या तिस-या आवृत्तीच्या प्रकाशना निमित्त अॅड. बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे मराठी विषय प्रा. कै.लक्ष्मण शिंदे यांनी लिहिलेला समिक्षात्मक पुस्तक परीचय…)
आज मराठी साहित्यात नव नवे कवी उदयाला येत आहेत. पूर्वी सारखा रविकिरण ‘कंपु’ आज नसल्याने नव्या नव्या जाणिवा यामधून आपणास फुलत असतांना दिसतात. पूर्वी समाजाचे प्रश्न मर्यादित स्वरुपाचे असत. आज प्रत्येक माणसाला जीवन जगतांना जीवघेणे प्रश्न भेडसावत आहेत. आज जगण्याचा प्रश्न भयावह बनलेला आहे. गरीबी, बेकारी, जातीयवाद, भ्रष्टाचार, सत्तांधता हे काय अनेक प्रश्नांनी राक्षस रुप धारण केलेले आहे. वर वर समाज प्रगतीकडे जाताना दिसत असला तरी अंतर्बाह्रय तो किती ढासळत चाललेला आहे हे शोधणे मोठे कठीण होऊन बसले आहे. अशा एक ना अनेक समस्या कवी प्रा. सय्यद अल्लाउद्दीन  यांच्या कवी मनाला सारख्या दंश करु लागल्या. कविता जन्म घेऊ लागली. आकार घेऊ लागली. कवितेचा एक एक पदर एक एक गा-हाणी मांडणारा ठरु लागला. त्यामधूनच गेल्या दहा-पंधरा वर्षात जन्मलेल्या कवितांचा संग्रह आकाराला आला तो ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’.
आज मराठी भाषेत लेखन करणारी मुस्लिम लेखक कवींची एक पिढी जन्माला येत आहे. जीवन जगतांना आलेले नवे अनुभव त्यांच्याही या साहित्यातून येऊ  लागलेले आहेत. खेडे, शहर, महानगर यांच्यातला जातीय वादावरचा तापमान अंदाज शब्दांच्या फूटपट्टीने मोजला जात आहे. कवी प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांची कविता एक सशक्त कविता आहे. त्यांच्यावाणीमधून आणि लेखनीतून अस्खलीत मराठी भाषा फुलत आलेली आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी त्यांच्या कविता वाचून ‘भाषेचा आणि साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास आहे’ असे म्हटले आहे. यापेक्षा वेगळी टिप्पणी करण्याची मला गरज नाही. 
प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’ या संग्रहाचे अखिल भारतीय परळी साहित्य संमेलनात प्रकाशन झाले. त्यांनी स्वत:च खर्च करुन हा संग्रह प्रकाशित केला. संग्रहात एकूण एक्क्यानव (91) कविता आहेत. शासकीय अनुदानावर काढला असता तर कवितांच्या संख्येला त्यांना लाल त्रिकोण लावावा लागला असता आणि तो आजच्या सारखा देखणा झालाही नसता.
संग्रहाच्या मुखपृष्ठावर कवीने दोन ओळी ठेवलेल्या आहेत. स्वत:च्या त्या अशा-
पुन्हा इथे जगायची फार कांही आस नाही.
माझे येथे येणे सुध्दा जगालाही पास नाही.
या ओळी जीवनाच्या उदासिनतेबद्दल बरच काही सांगून जातात. प्रतिज्ञा तुटली जाते. परंतु प्रत्यक्षात मनाचे मुखवटे निराळेच आहेत. या विषयी कवी संग्रहावरच्या पहिल्याच ‘प्रतिज्ञाभंग’ कवितेत म्हणतो.-
ज्याचा त्याचा त्याने । प्रांत गाठलेला
मनी आटलेला । तिरंगाही 
देशाला लटके । माझे म्हणायचे
पुन्हा कण्हायचे । धर्मासाठी
देश फाटत चालला आहे. धर्माच्या नावाखाली कवेळ देशच वाटला जातो असे नव्हे माणसेसुध्दा धर्माच्या नावावर मनामनातून दुभंगली जात आहेत. आज भ्रष्टाचार हा सामाजिक एड्स होऊन बसला आहे. एड्स संसर्ग नाही. भ्रष्टाचार आहे. या विषयी कवी म्हणतो.ध्र् 
बाप होता भ्रष्टाचारी, पोरगाही त्या वाटेवरी
काळ्याच्या छी-थू परीस, गोरी हुकुमशाही बरी

त्यामुळे सामाजिक संतुलन ढासळत आहे. विषमताच आज सर्वत्र नांदत आहे. स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही नेमका उलटा लावला आहे. कवी म्हणतात-
दुरितांच्या घरी । अंधार अंधार
भुकेचा आजार । किती काळ
घरालाच विश्व । मानतात बापा
दुस-याचा खोपा । परकीय
सर्वत्र स्वार्थ बोकाळला आहे. राजनीती नको इतकी ढासळत गेली आहे. कुठलीच नाती आज कर्तव्य पाळत नाहीत. सख्खे भाऊ सुध्दा पक्के वैरी व्हावेत. माणसं दुरावत चालली आहेत. जग झपाटयाने बदलत आहे. पण ते फुफाट्याने जात आहे. त्याचा मार्ग अयोग्य वाटतो. नाती तुटताहेत तटातट धाग्यासारखी. कवी म्हणतो-
आईनेही दुधाचा हिशोब विचारावा
इतके हे जग स्वार्थी आहे बरं
कोण भाऊ ? कोण बहिण ? कोण दोस्त ?
सारे खोटया नान्यासारखे
कवी ‘फाळणी’ नावाच्या कवितेत सुध्दा देश विभाजनाचे दु:ख व्यक्त करतो. आपण फाळणी झाल्यामुळे बरेच रसातळाला गेलो आहोत. याचही दु:ख कवीला बोचत आहे. एकेकाळी अमीना 
प्रकरण हैद्राबादचे खूप गाजले. एका कोवळया मुलीचा विवाह एका जख्खड म्हाता-या बरोबर लावण्यात आला. त्यावर ‘निकाह’ नावाची एक कविता यात आहे. –
निकाह अरबाशी लावून बाप गेला
त्या कोवळ्या जीवाला देऊन बाप गेला
दामाद जाहला, तो थेरडा साठीतला
जन्मदाता कसाई होऊन बाप गेला.
प्रश्न कुणाचेही असोत कवीचे मन इतके संवेदनशील असते. त्याला आसवांमध्ये जात दिसत नाही. अश्रूंना रंग नसतो. अश्रूंना धर्म नसतो. अश्रू ते अश्रूच असतात. त्याच्या जोडीला असतो तो हुंदका. त्याची कोणती एक भाषा नसते. आज या कविचा हुंदका शब्दातून बाहेर येऊ पाहत आहे.
माणसाचा एकदाच मृत्यु होतो. पण रोजच्या वेदना, रोजचे रोज भोगीत असलेले दु:ख, वेदनेतची दाहकता मृत्युपेक्षा कमी नाही. ही रोजच्या रोज होणारी हत्या आहे, असे कवीला वाटते ते असे-
रोज माझी हत्या । रोज माझा बळी
रिचवावे गळी । रोज विष
प्रेत आणि आम्ही । फार नाही भेद
काळजाला छेद । दोघांच्याही
भूकंपावर अनेक कविता रचल्या गेल्या. परंतु, प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांच्या ‘भुकंपव्यथा’ ही कविता निराळीच. भूकंप झाल्यानंतर मदतीचे ओघ वाढत गेले, ती देखील माणुसकी कवीला बेगडी वाटते. कारण प्रत्यक्ष भूकंपस्थळी उचलेगिरीचे जे दर्शन झाले त्यापेक्षा माणसाच्या पशुत्वाचे दर्शन कोठेच झाले नाही. कवी म्हणतो-
मुडद्याची काया । भामटे चाफती
दागिने ढापती । घातलेले
मेलेल्या बाळाची । गळ्यातली सरी
चोरा वाटे बरी । लुटावया
आज देशात अत्याचार, बेबंदशाही वाढते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आमचे जे आदर्श होते ते आज टीकेचे विषय होऊन बसले आहेत. गांधीजीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे म्हणणे नकोसे झाले 
आहे. थोर महापुरुषांची जागा त्यांच्या मारेक-यांनी घेतली आहे. गांधींच्या स्वप्नातला देश शेवटी दिवास्वप्नच ठरले. कवी म्हणतो.-
गांधी तुझा देश । राहिलाना आता
नथुराम लाथा । झाडी रोज
स्वप्नांचीही होते । रोज तुझ्या राख
झोपडयाची खाक । स्वातंत्र्यात
काय तरी न्यारे । गोरा आणि काळा
विषातला चाळा । सारखाच
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वाटले होते. देश बदलेल. गुलामीची बेडी तुटली. आता आम्हाला माणूस म्हणून जगता येईल. परंतु नेमके माणूस म्हणून जगणेच कठीण होऊन बसले आहे. 
अमानुषपणे जीवन जगणारांचा तेथे सत्कार होतो. त्यामुळे माणुसकी शब्दाची नेमकी परिभाषा काय करावी, हे ही समजत नाही. लोक तर असे आहेत. 
प्रेताचेच कफन लोक पांघराया लागले.
कबर त्याची झोपलेली नांगराया लागले.
‘आज रस्तेच इतके आडवे-तिडवे झाले आहेत. तेथे सरळ चालायची सोयच नाही’ कवीला एके ठिकाणी सांगायचे आहे ते याकरिताच. आज तर जातीयवाद रस्त्यावर केव्हांच आला आहे. मुठभर लोकांची सत्ता हजारो-लाखोंना झुलवित ठेवू शकते ती जातीच्या नावावर. मदारी माकडाला नाचवतो. मदारी एकच असतो. माकडही एकच. परंतु, आज समाजात परिस्थीती निराळी आहे. तेथे मदारी एकच आहे. मात्र माकडे अनेक आहेत. परंतु, एकच मदारी त्या हजारो माकडांना फार संुदर नाचवतो. त्यामुळे जातीयवादाचा भडका केव्हा उठेल हे सांगताच येत नाही. मात्र अशा संवेदनशील क्षणांची चाहूल सर्वांनाच असते. ‘दंगल : काही हुंदके’  या कवितेत कविने छोट्या छाट्या उपकवितेमधून फार छान मांडणी केली आहे. त्यात दंगलीचा एक एक घाव उकल होत जातो. त्यातील एक छोटी कविता-
मोहरम आले
पुढुनच जाऊ
गणपती आले
माघनं सूड घेऊ
हायदोस
मोरिया !
बिथरला सूर
नको तोच वाहिला
रस्त्यावरती पूर
सामान्य माणसाला दंगल नको असते. जीवनाचे अनेक प्रश्न भेडसावत असतांना घरातला अचानक कोणी माणूस दंगलीची शिकार व्हावा. ती सारी घडी विस्कळीत होते. परंतु आज दंगाखोर बहाणा धुंडाळीत असतात आणि दंगल दंगाखोरांचा पाठपुरवा करीत असते. म्हणून ते म्हणतात-
प्रत्येक चौकाचौकाला 
नाव दिलंच पाहिजे
फलक लावलेच पाहिजेत
जातीय तणाव वाढविण्यास 
हीच जागा मोक्याची ठरते.
आज अशांचा सुकाळ आहे. राजकारण तर गुंडाचे शेवटचे आश्रयस्थान समजले जाते. ज्यांना कुठेच आश्रय भेटला नाही, तिथे राजकारण्यांचा बगलबच्चा होतो. मग त्याची सारी पापं काठोकाठ भरलेल्या दारुच्या गिलासानेच धुतली जातात. यावर कवी ‘बाजारु भामटे’ या कवितेत म्हणतो.-
बाजारू भामट्यांना, आला सुकाळ आहे,
लुटारु चोरट्यांची, शिजते डाळ आहे,
जळून खाक झाली, जत्रेतली दुकाने,
घोटाळते कुणाची, अजून लाळ आहे.
डॉ. किशोर शांताबाई काळे यांनी ‘कोल्हाट्याचं पोर’ हे आत्मचरित्र लिहिले. हे चरित्र वाचून कवी अस्वस्थ होतो. एक ‘तवायफ’ च जीवन जगणा-या स्त्रीच्या वाट्याला शरीर सुखाचा 
वखवखलेल्यांना आनंद देऊन शेवटी मिळत काय ? शेवटी ती कलंकित ठरते. केवळ खळगी भरण्यासाठी तिला शरीराचा व्यापार मांडवा लागतो ही मानसिकता व्यक्त करतांना कवी म्हणतो-
शरीराचा तुवा । मांडला व्यापार
रोज रात्री नार । झालीस तू
इच्छा नसतांना । रंगविले ओठ
लेकरांचे पोट । भागविले
रोज नवा पती । रोज नवी रात
हाती द्यावा हात । वासनेच्या
वासनेभोवती । तुझे फेरे सात
सत्यवान त्यात । लाथा झाडू
एक ना अनेक, मनाला सुन्न करणा-या कवितांचा हा संग्रह आहे. कवितांचा विषय भिन्न भिन्न असेल, कधी नारायण सुर्वेच्या जन्माची चितरकथा असेल, कधी तांड्यावरची आत्महत्या करणारी स्त्री 
असेल, कधी बुध्दभूषण कांबळेचा जन्म असेल, कधी कुंडली पाहणा-या नानांचा मृत्यु असेल, गंगुचे बाजाराला जाणे असेल, कधी गाळातल्या बाळाचं बेवारस जिणं असेल किंवा कधी एका कविची आत्महत्या असेल, अशा कथात्मक कवितांचा अंतिम धागा दु:ख, दैन्य ‘एक दर्द भरी दास्तां’ यांच्याशी जोडलेले आहे. 
‘झिंदाबाद-मुर्दाबाद’ मध्ये कविने अनेक विषयांना नुसता स्पर्शच केलेला नाही. ते शल्य त्यांनी शब्दात उतरविण्याचा पूर्णत: प्रयत्न, यशस्वी केलेला आहे. गझल, अभंग, ओवी, मुक्तछंद सर्वांचा वापर यात वावरतो. म्हणूनच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कविताविषंयी म्हणतात- ‘श्री सय्यद अल्लाउद्दीन हे निष्ठावंत आणि सामाजिक समस्यांची जाण असलेले कवी आहेत. विविध विषयांवरील त्यांच्या काव्यात भावविश्वांचा उत्कट आविष्कार दिसून येतो.
या ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’ काव्यसंग्रहाला अनेक मान्यवर साहित्यिक कविंचा अभिप्राय लाभलेला आहे. तो संग्रहाच्या मलपृष्ठावर मांडलेला आहे. यात कुसुमाग्रज, राम शेवाळकर, डॉ. सुधीर रसाळ, डॉ.यू.म.पठाण,डॉ.सौ.सुहासिनी इर्लेकर, डॉ. प्रकाश मेदककर, प्रा.फ.मुं.शिंदे, महावीर जोंधळे, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, महेश केळुसकर, दत्ता भगत, जीवन किर्लोस्कर, प्रा.अनंत हंबर्डे, दिवंगत दया पवार या थोर साहित्यिक कवी अभ्यासकांचा समावेश आहे.
संग्रहात एकुण एक्क्याण्णव कविता असल्या तरी संग्रह वाचतांना संख्येचे विशालपण जावणत नाही. जाणवते ते कवितेचे कसदार असणे. हा कवी शब्दांचा मोजून मापून उपयोग करतो. त्याचे सामथ्र्य मोठे आहे. शब्दांवर त्याचे कसे प्रेम आहे, हे त्यांच्या कवितेत पहावे लागते. ते शब्द कवितेत म्हणतात-
शब्द माझी आई । शब्द माझा भाऊ
शब्द माझा ताऊ । ऐसा शब्द
शब्द माझे ह्रदय । शब्द माझे मन
शब्द कणकण । जाहलेला
शब्द माझा घण । शब्द माझा घाव
शब्दच उठाव । विद्रोहाचा
ही कविताच वेगळ्या भाषेत त्यांच्या कवितांचे शीर्षक गीत ठरेल असे वाटते. 
प्रा. लक्ष्मण शिंदे