१९ ते २२ ऑगस्ट रोजी होणार सकारात्मक उर्जेचा अविष्कार
‘महाराष्ट्र सोशल फोरम’ चा स्तुत्य उपक्रम ; जिल्हा समन्वयक पुष्कराज तायडे यांची माहिती
जालना : प्रतिनिधी
सध्या सर्वच देश कोरोनाच्या काळजीत आहेत.यातच अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे ऐंशी टक्के असंघटित समाज चिंतेत अडकला आहे. गेलेला रोजगार पुन्हा कसा मिळवायचा ? कोंडीत अडकलेले शेतकरी - शेतमजूर या समूहाला सकारात्मक ताकद देऊन उभारी देण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजार संविधान प्रेमी समविचारी संस्था, संघटना, कामगार- कष्टकरी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ ते २२ ऑगस्ट दरम्यान ‘महाराष्ट्र सोशल फोरम’ च्या वतीने 'सकारात्मक उर्जेचा अविष्कार' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम ऑनलाईन पार पडणार असून या कार्यक्रमाचे उदघाटन टी.एम.कृष्णा, प्रा. सोनलिहाजा मिन्झ, प्रा. झोया हसन आणि प्रा. सुखदेव थोरात यांच्या हस्ते होणार आहे. ‘ सध्याची देशाची परिस्थिती आणि त्यावरील उपाय’ विषयावर व्याख्यान होईल.दि. २० रोजी दुपारी १ ते ४ या वेळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातले प्रश्न मांडून, त्यासाठी आवश्यक असणारे ठराव जिल्हा पातळीवर मांडले जातील. ४.३० ते ६ यावेळेत जिल्हा समन्वयक यांच्याशी झालेल्या चर्चेचा अहवाल आणि ठराव मांडले जातील. ज्यात मिनार पिंपळे, डॉ. मनिषा गुप्ते, अविनाश पाटील, प्रतिभा शिंदे, उल्का महाजन आणि अनिता पगारे हे कार्यकर्ते विश्लेषण करुन पुढील मार्गदर्शन करतील. या सत्राच्या अध्यक्षस्थान अंजली आंबेडकर या भूषवतील.
२१ रोजी दुपारी १ ते रात्री ८ वाजे पर्यंत विविध विषयांचे सत्र होईल. ज्यात ‘स्त्री आणि नव्या युगातील संघर्ष’, ‘आदिवासी, भटके विमुक्त आणि उपेक्षितांची आंदोलने’, ‘खाजगीकरण आणि श्रमिक आंदोलन’, ‘देशाची उध्वस्त अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्रा पुढील आव्हाने’, ‘बहुसंख्याकांच्या राष्ट्रवादाचे आव्हान’या सत्रांचा समावेश राहणार आहे.
मॅगासेसे अवॉर्ड विजेता रविश कुमार यांचे व्याख्यान दि. २२ रोजी सायंकाळी होणाऱ्या समारोपीय सत्रात मॅगासेसे अवॉर्ड विजेता 'एनडीटीव्ही' चे ख्यातनाम पत्रकार रविश कुमार यांचे व्याख्यान होईल. याच सत्रात ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आढाव यांचा एक हजार संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तसेच संभाजी भगत यांचे ‘संविधान सुरक्षा गीत’ सादर होईल. शेवटी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी हे विचार मांडतील, अशी माहिती महाराष्ट्र सोशल फोरमचे जिल्हा समन्वयक पुष्कराज तायडे,मिलिंद सावंत, ऍड अशोक तुपे,प्रभाकर घेवंदे,चंद्रकांत चौथमल, शरद आडागळे,राजेविक्रम खरात यांनी दिली आहे.