फोटो साठी वृक्ष लागवड न करता त्याचे संगोपन करा....खा.प्रीतम मुंडे
किल्लेधारुर/प्रतिनीधी
धारूर नगर परिषदेच्या वतीने येथील बाजार समितीच्या प्रांगणात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांतर्गत हात पट्टे विकसित करणे साठी साडेतीन हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे उपस्थित होत्या.त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना केवळ फोटोसाठी वृक्ष लागवड न करता त्याचे संगोपन करा असा संदेश दिला.
नगरपरिषद धारूर च्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम हाती घेत शहरांमध्ये साडेतीन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.या वृक्षलागवडीची सुरुवात शनिवार रोजी करण्यात आली.या कार्यक्रमास बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे,भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के,भाजप नेते रमेश आडसकर,नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी,मुख्याधिकारी नितीन बागुल यांची उपस्थिती होती.तत्पूर्वी छोटेखानी कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी धारूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या विकास कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे.कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल अशा मोठ्या कॉम्प्लेक्स ची निर्मिती सुरू आहे.त्याचबरोबर शहराच्या विकासासाठी सातत्याने नवनवीन योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.तर यावेळी बोलताना खा.प्रीतम मुंडे यांनी सांगितले कोरोना मुळे आपल्या सर्वांना एक संदेश मिळाला आहे.पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल.तर यावेळी वृक्षलागवड केवळ फोटोसाठी न करता त्या लागवड केलेल्या वृक्षाचे संवर्धन करा असा उपदेशही खासदार यांनी दिला.धारूर मध्ये वैशिष्ट्यपूर्ण वृक्षलागवड उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले तर आम्ही आता जास्तीचा निधी तुम्हाला देऊ शकत नाही कारण आमचा येणारा निधी हा कोरोना साठी वापरण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती महादेव बडे,उपसभापती सुनील शिनगारे,संचालक महादेव तोंडे,नगर परिषदेच्या उपाध्यक्षा मीनाक्षीताई गायकवाड,नगरसेवक संतोष शिरसाट,बालाजी चव्हाण,बाळासाहेब खामकर,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन बाळासाहेब गायकवाड यांनी केले.