तलवाडा ( प्रतिनिधी ) :- बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बैल पोळा सण साजरा करण्यावर निर्बंध घातले असताना हा सण मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने साजरा केल्याचे चित्र तलवाडा व परिसरातील ग्रामीण भागात मंगळवारी पहावयास मिळाले. माजीमंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी देखील आपल्या दैठण या येऊन बैल पोळा हा सण अगदी साधेपणाने साजरा केला. गेवराई तालुक्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या दैठण तसेच मिरगाव, जळगाव मजरा, राहेरी, गंगावाडी, भोगलगाव यासह ग्रामीण भागातील अनेक गावात शेतक-यांनी पोळा सणानिमित्त बैलांची आकर्षक अशी सजावट केली होती. परंतु मिरवणूक न काढता अतिशय साध्या पद्धतीने आपल्या सर्जा - राजाची पुजा करून पोळा हा सण साजरा केल्याचे चित्र पहावयास मिळाले. कोरोणाच्या सावटात व जिल्हाधिकारी बीड यांचे आदेशाचे पालन करून पोळा हा सण साजरा केल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.