गेवराई तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीत शिवसेना सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी : भोसले, पवार
गेवराई (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे, बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, जिल्हाप्रमुख अॅड. चंद्रकांत आप्पा नवले व मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीत पाणीटंचाईग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहिली आहे. आमला वाहेगाव येथील ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून, शासन स्तरावर रीतसर पाठपुरावा करून गावासाठी पाणी टँकरच्या खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत.
आमला वाहेगाव येथील ग्रामस्थांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते हनुमान खेत्रे यांनी विक्रमराजे भोसले जिल्हा संघटक व गणेश पवार यांच्याशी संपर्क साधून गावासाठी पाणी टँकर उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार भोसले व पवार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून टँकरच्या खेपा मंजूर करून घेतल्या असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे त्यांनी दिली असून त्याची रीतसर ऑर्डर करण्यात आली असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
गेवराई येथून पाण्याने भरलेल्या टँकरचे विक्रमराजे भोसले शिवसेना जिल्हा संघटक, मुकेश महाजन गेवराई शहरप्रमुख, गणेश पवार व युवा नेते हनुमान खेत्रे यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. गावकर्यांच्या पाणीप्रश्नासाठी गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करणार्या हनुमान खेत्रे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या प्रयत्नाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला. गावात पाण्याचा टँकर दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना विक्रमराजे भोसले व गणेश पवार यांनी सांगितले की, सध्या गेवराई तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. कोणत्याही गावात पाण्याची अडचण असल्यास ग्रामस्थांनी गेवराई येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा. शासन स्तरावर पाठपुरावा करून पाणी टँकर उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. आमला वाहेगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकार्यांचे आभार मानले.
