प्रत्येक स्पर्धेत मुलींची आघाडी - प्राचार्य निंबोरे
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांनी सर्व प्रकारच्या स्पर्धामधे मुलींची आघाडी, ही सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची पावती आहे असे मत व्यक्त केले.
संस्थाअध्यक्ष श्री किशोर नाना हंबर्डे व संस्थासचिव श्री अतुलकुमार मेहेर यांच्या प्रेरणेतुन अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयात दरवर्षी 12 जानेवारीला, राष्ट्रीय युवक दिन व राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात एकूण वीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. कु. प्रतीक्षा विजयकुमार तवले, कु. साक्षी राजेंद्र केरूळकर व श्री. बळीराम आदिनाथ सानप यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना प्रा. महेश चवरे व प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य निंबोरे यांनी हे स्पर्धेच सोळावं वर्ष असून प्रतिवर्षी सहभागी स्पर्धेकांचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. सहभागी स्पर्धेकांत मुलींचे प्रमाण उल्लेखनीय असून विजेत्यांतही मुली जास्त आहेत हे सांगताना प्रत्येक स्पर्धेत मुलींची आघाडी ही सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची पावती आहे असे ते म्हणाले. परीक्षक म्हणून प्रा. रोहिणी कांबळे, प्रा. सायली चौधरी व प्रा. दीपाली मस्के उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. राजाराम सोनटक्के यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. स्वाती चौधरी यांनी केले तर आभार प्रा. ज्ञानेश्वर नवले यांनी मानले. यावेळी मंचावर कार्यालय अधीक्षक श्रीमती सरस्वती जाधव व सर्व महिला उपस्थित होत्या.