गेवराई येथे दोन दिवसीय पतसंस्था प्रशिक्षण संपन्न
गेवराई : प्रतिनिधी
गेवराई येथे पतसंस्था पदाधिकारी, संचालक व कर्मचारी यांना दोन दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार तज्ञ डॉ. एम.ए.मुरुडकर, चार्टड अकाऊंट रविंद्र गिरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास तालुक्यातील पतसंस्थेच्या पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
बीड जिल्हा सहकारी बोर्ड लि. बीड व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जयप्रकाश पतसंस्थेत गेवराई तालुक्यातील पतसंस्था पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांसाठी बुधवार व गुरुवार या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयप्रकाश पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मीनारायण अट्टल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती संध्या कदम (सहाय्यक निंबधक गेवराई), कोल्हापूर येथील सहकार तज्ञ डॉ. एम.ए. मुरूडकर, सहकार अधिकारी मिलिंद देशपांडे, आर.डी. वाघमारे ( सहकार बोर्ड ), रविंद्र गिरी चार्टड अकाऊंट रवींद्र गिरी यांची उपस्थिती होती. दरम्यान या प्रशिक्षणात नियामक मंडळ, संचालकांची जबाबदारी व हक्क, एमआयएस, लेखापरीक्षण, केवायसी, पतसंस्था व मार्केटिंग संबंध, पतसंस्था कामकाज इत्यादी विविध विषयावर सहकार तज्ञ मुरुडकर व रविंद्र गिरी यांनी मार्गदर्शन केले. सदरील प्रशिक्षणास गेवराई तालुक्यातील सर्व पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व संचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्तविक प्रकाश कदम ( बीड जिल्हा सहकारी बोर्ड लि बीड ) यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयप्रकाश पतसंस्थेचे हाकाळे यांनी मानले.
चौकट -
प्रशिक्षण काळाची गरज - सहकार तज्ञ डॉ. एम.ए.मुरुडकर
सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांनी सहकार खात्याने ठरवून दिलेल्या नियमानुसार कारभार केला पाहिजे, त्यासाठी प्रशिक्षण घेणे हि काळाची गरज आहे. या प्रशिक्षणातून सहकारी संस्था अधिनियमानुसार पतसंस्थेचे कामकाज करणे अधिक सुलभ होते, असे मत सहकार तज्ञ डॉ. एम.ए.मुरुडकर यांनी व्यक्त केले.