महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

विद्यार्थी प्रिय प्राचार्या - डॉ. रजनी शिखरे..!


विद्यार्थी प्रिय प्राचार्या - डॉ. रजनी शिखरे..!


     काहींच्या नशीबी नौकरीचा योग जुळून यायला अवकाश लागतो. मेहनत करून ही अडथळे उभी राहतात. काहींना मात्र, अगदी शिक्षण पूर्ण व्हायच्या आधी संधी मिळते. नशीबाची साथ लाभली की संधी मिळते. अशीच एक संधी त्यांना मिळाली. "त्या" जिल्हा परिषद शाळेत शिकल्या. शेंडेफळ म्हणून घरात त्यांचा लाड व्हायचा. अभ्यासात ही हुशार. म्हणून मग, खेळण्या-बागडण्यात थोडेसेच स्वातंत्र्य मिळाले. ग्रामीण भागातल्या शाळेत दहावी झाल्यावर त्यांनी औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयातून (एसबी काॅलेज) शिक्षण पूर्ण केले. पदवी संपादन करून बीडला बलभीम महाविद्यालयात पीजी ( पदव्युत्तर शिक्षण ) पूर्ण केले. त्यांना हिंदी विषयात गोल्ड मेडल मिळाले आहे. महाविद्यालयात त्यांचा त्यावेळी गौरव ही झाला होता. याच बळावर त्यांनी विद्यार्दी दशेतच प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना धडे दिले. सलग नऊ वर्ष तात्पुरत्या स्वरूपात , तुटपुंजा पगाराची नौकरी ही केली आहे.
  आज त्या नावाजलेल्या महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. गौरी गणपतीच्या उत्सवाची धूम सुरू असतानाच, प्राचार्या डॉ. रजनी श्रीकांत पाटील-शिखरे यांना शारदा प्रतिष्ठानचा, मानाचा मानला जाणारा 
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिजाऊ-सावित्रीच्या या कर्तृत्ववान लेकीचा गौरव म्हणजे तालुक्यातील स्त्री शक्तीचा गौरव आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंतराव शिखरे यांची लाडकी लेक आणि  प्रा. श्रीकांत पाटील यांची पत्नी आहे. 
  डॉ. रजनी शिखरे यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गेवराई तालुक्यातील चकलांबा जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. पुढे औरंगाबाद आणि नंतर बीड च्या बलभीम महाविद्यालयातून त्यांचे उच्च शिक्षण झाले. तुझ्यात टॅलेंट आहे. म्हणून, तू शिकून पुढे जा, अशी स्वप्न आयुष्याचा साथीदार असलेल्या श्रीकांत पाटील यांनी दाखवली. विशेष म्हणजे, त्यांच बाळ लहान असताना श्रीकांत यांनी पीएचडी करायला प्रोत्साहन दिले. या विषयी स्वत: डॉ. रजनी शिखरे  कृतज्ञतापूर्वक त्या सुखद प्रसंगाची आठवण करून देतात. हा त्यांचा मोठेपणाच आहे. मी भाग्यवान आहे की श्रीकांत नवरा म्हणून माझ्या आयुष्यात आल्याचे सांगायला विसरत नाहीत. 
      कुलगुरू शिवाजीराव भोसले सांगायचे, शिक्षणाच्या व्यासपीठावर स्त्रीत्वाला वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल, त्यासाठी, मुला - मुलींच्या वाट्याला "चांगल्या बाई" यायला हव्यात. या अर्थाने, डॉ. शिखरे यांचा उल्लेख करता येईल. विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणाऱ्या त्या प्राचार्या आहेत.
 नियमित वेळेवर... साडेदहा वाजता त्यांच्या गाडीचा हाॅर्न गेटवर आला की वाजतो. लेट कमर्स म्हणून काम करायला त्यांना आवडत नाही. इतरांनी ही वेळेच्या आधी यावे, असा त्यांचा आग्रह नसतो पण किमान वेळेत यावे, हा नियम फाॅलो करण्याची  अपेक्षा व्यक्त करत राहतात. 
आपण संस्थेला बांधिल राहीले पाहिजे. संस्थेचा पगार घेतो म्हटल्यावर पुढची जबाबदारी आपली आपण नीटपणे पार पाडली पाहिजे. 
काॅलेजला आल्यावर फेरफटका मारून कोण आलय, नाही आलय. विद्यार्थ्यी कुठे आहेत. वर्गात आहेत की कॅम्पस मध्ये आहेत. कोण शिकवतोय. याकडे लक्ष देतात. उशिरापर्यंत थांबून महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल बदल घडवणारी भूमिपुत्री म्हणून त्यांची महाविद्यालयाच्या इतिहासात नोंद होईल. उगाचच कुठेही दिसावे. नाही त्या व्यासपीठावर घुटमळत राहायचे. नसत्या उचापती करून लक्ष वेधून घ्यायचे. अनाठायी उठाठेवी. असल्या भानगडीत न पडता, आपले विद्यार्थी, आणि आपले महाविद्यालयात यापलीकडे त्या जात नाहीत. तारतम्य ठेवून अध्यापन करून विद्यार्थ्यांच्या जीवन व्यवहारांवर सकारात्मक उर्जा निर्माण करायचे काम या सावित्रीच्या लेकीने प्रमाणीकपणे केले. खर तर, त्यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व पाहिले की, त्या खऱ्या अर्थाने हाडाच्या शिक्षिका म्हणून शोभून दिसतात. वैरभाव न ठेवता त्यांच्या स्वभावात, वागण्या बोलण्यात विद्रोही साहित्याचे गारूड दिसते. ग्रामीण भागातून आलेली एक विद्यार्थिनी आज अट्टल महाविद्यालयात प्राचार्या म्हणून काम करते आहे. हा समस्त गेवराई ( बीड )  तालुक्यातील महिलांचा सन्मान आहे. नारी शक्तीचा गौरव आहे. खर म्हणजे, त्या र.भ. अट्टल महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या जवळपास चार हजार विद्यार्थ्यांचे त्या पालकत्व करताहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. गेवराई (बीड) च्या इतिहासातली ही पहिलीच घटना असावी. ही गौरवास्पद आणि अभिमानाची बाब आहे. डॉ. रजनी शिखरे यांनी कवितेचा आधार घेत, प्रथितयश लाभलेल्या दोन कवींच्या कवितांचा तुलनात्मक अभ्यास करून पीएचडी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी- विद्या वाचस्पती ) मिळवली आहे. राष्ट्र कवी रामधारी सिंह अर्थात "दिनकर" यांची कविता त्यांना भावते. कवी दिनकर हे  भावस्पर्शी कवी होते. ते लिहितात, कलम मे "सत्य" की शक्ती है, किसी अस्त्र शस्त्र मे क्या होगी..?  डॉ. शिखरे यांनी प्राचार्य पदावर काम करताना सत्य -शिव - सुंदर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत जाणीवा निर्माण करायचे काम केले आहे. विद्यार्थ्याला केन्द्र बिंदू माणून महाविद्यालय स्तरावर नवे बदल घडवून आणलेत. त्याचा फायदा या परिसरातील गोरगरीब समाजातील विद्यार्थ्यांना होतोय. पीजी ( पदव्युत्तर शिक्षण ) चे तीन अभ्यासक्रम सुरू केलेत. विद्यार्थ्याने व्यावसायिक शिक्षण करून स्वतःची इमेज तयार करावी, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. शिक्षणाला उद्योग व व्यावसयाशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  महाविद्यालयातला हरएक विद्यार्थी त्यांच्याशी थेट संपर्क करू शकतो. त्यांची गाऱ्हाणी ऐकून घ्यायला त्या उत्सुक असतात. शांत, संयमी भूमिकेतून त्यांनी विद्यार्थ्यां मध्ये स्नेह भाव निर्माण केला आहे. स्वकर्तृत्वावर प्राचार्य पदापर्यंत पोहोचून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि खास करून मुलींसाठी प्रेरणा असलेल्या डॉ. रजनी शिखरे यांना मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. खर म्हणजे, पुरस्काराने प्रेरणा मिळते. आनंद मिळतो. कामाचे चीज झाल्याचा फिल येतो. शेवटी अस आहे की, प्रेरणेतून, उर्जेवर राष्ट्र उभे राहते. म्हणूनच शिक्षक आणि शिक्षण देशाचे आधारस्तंभ आहेत. डॉ. रजनी शिखरे यांनी बहुजन समाजातील असंख्य घटकांना अध्यापनाच्या माध्यमातून नवी अमेद दिली आहे. या पुढे ही त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत जाईल, अशी प्रार्थना आहे. र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रजनी शिखरे व त्यांच्या कुटुंबाला 
मनापासून आभाळभर शुभेच्छा..! 

सुभाष सुतार 
( पत्रकार) 9404253386