उन्हाच्या लाटेने घामाच्या धारा...!
काळजीचे कारण : गेवराई तालुक्यातील नागरीकांना बसतोय "सनस्ट्रोक" फटका
गेवराई प्रतिनिधी
सूर्य रोजच आग ओकत असल्याने कडक ऊन पडत असून, वातावरण उष्णतेची तिव्र लाट निर्माण झाली आहे. वाढलेल्या तापमानाचा जबर फटका नागरीकांना बसू लागला असल्याने, घामाच्या धारा सहन करण्याचे संकट उभे राहीले असून, सनस्ट्रोकचा फटका बसल्याने रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, कामाशिवाय बाहेर पडू नका, पडायचे असेल तर पुरेशी काळजी घ्या असे आवाहन डॉ. काळे यांनी केले आहे.
गेवराई तालुक्यात उष्णतेचे तापमान वाढल्याने, नागरिक हैराण झालेत.
दिवसेंदिवस वाढत चाललेला उन्हाचा त्रास सहन करता - करता नागरिक घामाघूम होऊ लागलेत. सकाळी दहा वाजताच उन्हाची तीव्रता वाढत असून, तापमानाची सरासरी वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून उन्हच्या अशा तीव्र झळा नागरिकांनी अनुभवल्या नाहीत. त्यामुळे, उन्हाची डोकेदुखी चिंतेचा विषय झाला आहे. सरकारी,खाजगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येत असून, इच्छा असो नसो नातेवाईक,आप्तेष्ट, मित्रांच्या लग्नाला व अन्य धार्मिक कार्यक्रमांना जावेच लागते. त्यामुळे,भर उन्हात लग्नाला हजेरी लावून घरी जाणाऱ्या असंख्य नागरीकांना "सनस्ट्रोक" चा फटका बसू लागला आहे. उन्हाचा फटका बसलेल्या नागरीकांना हलका ताप, चक्कर येणे, तोंडातल्या तोंडात घास फिरणे, तसेच
हगवणीचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना उन्हाचे चटके सहन करून प्रवास करावा लागत असून, ग्रामीण भागातील कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्यात. कंदुरीचे कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू झालेत. गेवराई तालुक्यातील यात्रेत मोठी गर्दी असते. त्वरीता देवीच्या यात्रेला ही सुरुवात झाली असून, भर उन्हात यात्रेत गर्दी दिसून येत आहे. मादळमोही, तलवडा , सिरसदेवी, उमापूर, चकलांबा, रोहीतळ, जातेगाव परीसरात मोठी यात्रा भरते. औरंगाबाद विभागात 42 अंशावर तापमान गेले आहे. असे असले तरी, यात्रेत, कंदुरीच्या कार्यक्रमात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान,
उन्हात जाण्याच्या आधी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, कान, डोके पांढर्या शुभ्र रुमालाने झाकून घेऊन उन्हापासून बचाव करावा, असे आवाहनदिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढता असून, शक्यतो घरा बाहेर पडू नका.उन्हातून घरी आल्यास लगेच साधे किंवा थंड पाणी, थंड पेय, टरबूज, खरबूज वचावचा खाऊ पिऊ नका. उन्हाच्या त्रासाने काही तक्रारी जाणवल्यास लगेच डॉक्टरांना जाऊन भेटा, असे आवाहन ही डॉक्टर अशोक काळे यांनी केले आहे.
फोटो कॅप्शन : दिवसभर सूर्याची उष्णता नागरिकांना हैराण करून सोडत असताना, मावळत्या सूर्याचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे वाटते. गुरूवारी घेतलेले छायाचित्र..!
