महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गोष्ट एका संघर्ष कन्येची ..!

गोष्ट एका संघर्ष कन्येची ..! 

 "इथे वेदनेला अरे अंत नाही , उरी बांध माझ्या मला खंत नाही . तिने फेकले त्या मुलीला गटारी , कुळी माणसाची , अरे जंत नाही "...!

     ढाकणे कुटुंबात मुलीचा जन्म झाल्याने आनंद झाला. तिच्या रूपाने लक्ष्मीची पाऊले घरात आल्याचा हर्ष होता. मात्र, वर्ष दोन वर्ष झाले तरी बाळ पाय धरीत नव्हते. आईची काळजी वाढली. वैद्यकीय उपचाराचा आधार घेतला. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. निसर्गाने अपंगत्व दिले. अशक्तपणा राहील्याने शारिरीक वाढीला मर्यादा आल्या. आता कसे होईल  ? आईला पडलेला प्रश्न. सहा वर्षाने चमत्कार झाला. गोड रूप दिलेली छकुली चालू लागली. त्यामुळे, कुटुंबातील आशा पल्लवित झाल्या. काही वेळा निसर्ग एखादी गोष्ट कमी देतो. पण ,  त्या बदल्यात बौद्धिक ज्ञानाची भर टाकतो. या गोष्टीला मानसशास्त्राचा आधार आहे.
 देवाने जे दिले ते स्वीकारून "त्या" चालत्या झाल्या. वैखरीची वाट तुडवून प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेतले. आई-वडील आणि शिक्षकांच्या आधाराने शिक्षण पूर्ण केले. जगाची भाषा म्हणून जिचा जगभर डंका वाजतोय, ती भाषा अवगत केली. तिच्यावर प्रभुत्व मिळविले. वाटेत आलेले अडथळे बुद्धीच्या जोरावर लाथाडले आणि एक आदर्श शिक्षिका उभी राहीली. ताठ मानेने..! अपार कष्टाने आयुष्याला कोरून व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ज्यांचा आज नामोल्लेख होतो, त्या आहेत श्रीमती सविता ताई ढाकणे. कलाविष्कार प्रतिष्ठानच्या (गेवराई-बीड)  शिक्षण रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. अपंगत्वावर मात करून बाल मनावर संस्कार करणाऱ्या एका संघर्ष कन्येची ही यशोगाथा...!
    श्रीम. सविता उत्तमराव ढाकणे, जि.प.प्राथ.शाळा महारटाकळी, ता. गेवराई, जि. बीड या शाळेत सहशिक्षिका या पदावर कार्यरत आहेत. त्यांच मुळ गाव ठा. पिंपळगाव, ता. शेवगाव. जि.अहमदनगर आहे.
               सविता ताईच्या जन्मतःच संघर्षमय जीवन नशीबी आले. त्या  दोन वर्षांच्या कालावधीत उभा राहू शकत नव्हत्या. डॉक्टरांनी, पाय कमजोर असल्याने चालू शकतील की नाही. या विषयी संशय व्यक्त केला.
आई-वडीलांची माया वेडी असती. मुल - बाळ काळजाचा तुकडाच असतो. त्यांना वाटायचे, देव एवढी निष्ठूरता दाखवणार नाही. अचानक एक दिवस चमत्कारच झाला.
वयाच्या सहाव्या वर्षी आई-वडीलांची लाडकी छकुली चालू लागली. आनंद गगनात मावत नव्हता. आधीच 
आई निरक्षर पण लेकीला खूप शिकवून तिला तिच्या पायावर उभे करण्याचे स्वप्न उराशी बाळगले.  गावातील सरकारी 
शाळेत प्रवेश घेऊन, शिक्षणाचा श्रीगणेशा केला. सुरवातीचे दिवस अडचणीत गेले. शरीराने अशक्त, उंची कमी, पाठीला बाक (कुबड) होते. आपण इतर सर्व मुलां पेक्षा वेगळे आहोत याची जाणीव व्हायची. त्यामुळे, वर्गात एका कोपऱ्यात बसायच्या. कुसळकर गुरुजींनी चिमुकल्या मुलीकडे लक्ष दिली. तिची चिकाटी, जिद्द ओळखली. तिच्यात आत्मविश्वास जागृत केला. तिच्या अभ्यासू वृत्तीला आधार दिला. त्या 
वर्गात नेहमीच "एक नंबर"  असायच्या.  


 शाळेत जाताना दप्तराचे ओझेही उचलत नसायचे. मग, मैत्रीणी मदत करायच्या. इंग्रजीची विशेष आवड होती. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करून दिवस भराभरा गेले तसा त्यांचा प्रवास इयत्ता 12 वी पर्यंत पूर्ण झाला. डिएड करायचे स्वप्न होते. सुरूवातीला अपयश आले. त्यात पून्हा गरीबी पाचवीलाच पुजलेली. पैसा खर्च करून डीएड करता आले नाही. तेवढा पैसा नव्हताच..! म्हणून इंग्लिश विषय  घेऊन 
बी.ए. साठी प्रवेश घेतला. इंग्रजी विषयात पदवी मिळवली.  सन 2002 एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ,पुणे येथे बी.एड. केले. 
ग्रामीण भागातील मराठी आणि शहरी मराठी यातले अंतर खूप आहे. आपली हिंदी तर "तेरकू मेरकू" त्यावर उपाय म्हणून, ढाकणे ताईनी 
इंग्रजीत संभाषणाचा खूबीने वापर केला. लोंढे सरांनी सहकार्य केले. याच काळात 2004 मध्ये इंग्रजी विषय घेऊन एम.ए.चे पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. प्रयत्न फळाला आले आणि दि. 4 ऑक्टोबर 2005 साली रायगड जिल्हा परिषदेचा नोकरीचा कॉल 
आला. दि. 7 ऑक्टोबर 2005 रोजी पं.स.पोलादपूर, जि.प.रायगड येथे कार्यरत झाल्या. जिवनाचे सार्थक झाल्याचा फील आला. घरापासून 500 किमी अंतरावरची शाळा, त्यात कोकण पट्टा, अशा भौगोलिक परिस्थिती सविता राहील का  ?  घरच्यांना वाटले चला परत जाऊया. मन सैरभैर होत होते. 
आई, तू जिद्दीने मला शिकवलेस. शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण होतय. तू काळजी करु नकोस, आशिर्वाद दे...!मोरसडे, ता.पोलादपूर, जि. रायगड परिसरातल्या शाळेत नौकरीतला पहिला दिवस सुरू झाला. 
परिसर सुंदर होता. मोबाईलची रेंज ये-जा करायची. गाड्यांची सोय नव्हती. रोज दोन किमी. चालत शाळेत जावे लागे. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहकार्याने अडचणीतून मार्ग सुकर होत गेला.  मोरसडे शाळेत 50 मुल होती. सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना मनापासून शिकवले. त्यांना चांगले धडे दिले. शाळेच्या भिंतीना बोलते केले पाढे पाठांतर, परिपाठ, सांस्कृतिक कार्यक्रम, इंग्रजी शब्द पाठांतर, क्रीडा स्पर्धा, वाढदिवस असे अनेक उपक्रम राबवून शाळेचा नावलौकिक वाढविला. एका होतकरू दिव्यांग विद्यार्थी अमर उतेकरला दत्तक घेऊन त्याला शाळेच्या प्रवाहात आणले. अमरच्या आयुष्यातील अंधार दूर झाला असून तो दहावीत शिकतोय. या शाळैत 9 वर्षे  कशी गेली कळले ही नाही. 1 सप्टेंबर, 2014 रोजी ढाकणे ताई आपल्या कर्मभूमीत (गेवराई-बीड) आल्या.  जि.प.शाळा महारटाकळी येथे त्या कार्यरत आहेत. शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना असा समन्वय ठेवून त्यांचे शैक्षणिक काम सुरू आहे. या माऊलीने विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते निर्माण करून आदर्श जिव्हाळा उभा केलाय. इलेक्ट्रॉनिक लघू माध्यमांचा खूबीने वापर करून शाळेला ज्ञानाशी जोडून विद्यार्थ्यांना परिपक्व करण्याकडे त्यांचा कल राहीलाय. बोलो ॲप, गुगल, युट्युब, व्हाट्सअपच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करतात. लॉकडाऊन च्या कठीण प्रसंगात ही त्यांनी ऑनलाईन शिक्षण दिले. इंग्लिश विषय सोपा करून ,समजून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण आनंद देणारी आहे. त्या उत्तम कवयित्री, लेखिका आहेत. शाळेला बोलते करून, शैक्षणिक वाट सोपे करून सांगणारी ही "बाई" विद्यार्थ्यांची आदर्श ताई...माई झाली आहे. निसर्गाने दिलेले दान हसत मुखाने स्वीकारले. या वैखरीच्या वाटेवरून खडतर प्रवास केला. त्यावर , जिद्दीने यश संपादन केले. 
अपंगत्वावर यशस्वी मात करून, विद्यार्थ्यांमध्ये रमणारी ही माऊली खऱ्या अर्थाने सावित्रीची लेक शोभते. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, यश मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे "पून्हा" प्रयत्न करणे. प्रयत्नातून त्या यशोशिखरा पर्यंत गेल्यात. त्यांचा प्रवास अनेकांना वाट दाखवणारा आहे. श्रीमती सविता ढाकणे यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कलाविष्कार प्रतिष्ठानचा मानाचा शिक्षण रत्न पुरस्कार ही त्यांना मिळाला. खर म्हणजे, लहान मुलांना शिकविणे मोठी गोष्ट असते. अशा बालमनावर संस्कार करण्याचे दायित्व ताईनी इमाने इतबारे पार पाडले आहे. या पुढे हे कार्य अधिक गतिमान होत जाईल. आपले आयुष्य बालगोपालांच्या आशीर्वादाने बहरत राहील, अशी प्रार्थना आहे. वामन दादा कर्डक यांच्या काव्यमय शब्दात वर्णन करायचे झाल्यास, माणसा माणसा मी तुझे असे गीत गावे, असे गीत गावे...! तुझे हित व्हावे, तुझे हित व्हावे...! डाकणे ताईना शुभेच्छा.
 
सुभाष सुतार 
(पत्रकार)