म्हाळस जवळा येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
बीड ( प्रतिनिधी)
तालुक्यातील म्हाळस जवळा येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा कलशारोहण सोहळा ह. भ. प. नामदेव शास्त्री जरुडकर यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात आणि हर्ष उल्हासात संपन्न झाला. याप्रसंगी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज ह. भ. प. रमेश महाराज वशेकर, आरण यांच्यासह समता परिषदेचे मराठवाडा विभागीय तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांची विशेष उपस्थिती होती.
तीन दिवस सुरू असलेल्या या कलशारोहण आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये शुक्रवार रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. तर शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी कुंड पूजन आणि स्थापन विधी, हवन मूर्ती, न्यास आरती संपन्न झाली. रविवार रोजी ह.भ.प. रंधवे बापू महाराज यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न होऊन मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा संपन्न झाला. यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पंचक्रोशीतील भक्त भाविकांनी कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हाळस जवळा पंचक्रोशीतील गावकरी मंडळींनी मोठे परिश्रम घेतले.
