गजबजलेल्या "गावाची" एक्झिट...!
अनाथांची एक माय देवाच्या घरी शेवटच्या प्रवासाला निघून गेली आहे. अनाथाचे छत उडून गेले आहे. आता, नऊवारी लई बेस्ट..जय महाराष्ट्र...! हे शब्द ऐकायला मिळणार नाहीत. तो कातर आवाज, त्यातले मार्दव, स्वाभिमान, निष्ठा, दायित्व ,ममत्व, प्रेम, माया, जिव्हाळा,आनंद, संवेदनशीलता, एक शिल्प आणि अनाथांचे एक पूर्ण वर्तुळ...... काळाने हिरावून नेले आहे. आधार गेला आहे. ना कशाचे नाते-गोते, त्यांच्याच साठी त्या शेवटपर्यंत झिजल्या. पदर पसरुन पोरांना जगवले. माई,विलक्षण शक्ती होती.
माईंना खूपदा ऐकले आहे. त्या बोलायच्या आणि आपण ऐकायचे, ऐकत राहावे वाटायचे. मध्येच येणारा त्यांचा एखादा शेर, अंतर्मुख करणारा अन मनाला भेदणारा प्रश्न मनातल्या आतल्या कवाडांना हेलकावे द्यायचा. माणसातले माणूसपण जागे व्हायचे. अशी होती आपली सिंधू माय.. !
अत्यंत धक्कादायक, तेवढीच वेदनादायक बातमी मंगळवारी ता. 5 जानेवारीच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सोशल माध्यमांवर आली. नव वर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात अतिशय दुखद प्रसंगाला सामोरे जावे लागते आहे. कंठ दाटून आलाय, माईंच्या आठवणी आयुष्यभर पुरतील, एवढी उंची होती. दै. सकाळ ची लिंक वाचली आणि
मित्र, माधव चाटे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारना केली. तसा, त्यांचा कंठ दाटून आला. कातर आवाजात ते एवढच म्हणाले, मला सांगता येणार नाही. पण तस घडले ही असेल कारण , माईंवर गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यानंतर, काही वेळातच माईच्या निधन वार्ता येऊ लागल्या. खर म्हणजे, असंख्य आया पाहिल्या, वाचल्या आहेत. आपण तिला माऊली म्हणतो. जेष्ठ पत्रकार, लेखक उत्तम कांबळे यांची आई ,पदराला दोन चार रुपये बांधून दहा वीस किलोमीटर पायी चालून पोटच्या पोराला शिक्षणसाठी आधार देणारी ही माय , त्यांनी शब्द पुष्पाने गुंफरी आहे. त्यांनी लिहलय,
आई समजून घेताना..!
सिंधू ताईना....हजरो लेकराची आई होता आले.
ही माय वेगळीच होती. हजारो अनाथांची ती माय झाली. दु:खाच्या प्रसंगात सुद्धा त्या उभ्या राहील्या. स्वत: च्या दुखावर फुंकर मारायला कोणी आले ही नाही. सगळीकडे अंधार असताना, आपले दु:ख पदराआड लपवत, समाजाने फेकून दिलेली असंख्य मुल जवळ केली. आपल दु:ख या वेदने पेक्षा खूप मोठे आहे. याची जाणीव ठेवून, अनाथांची ही माऊली वैखरीच्या वाटेवरून चालती झाली. अनाथ मुलांच्या जीवनात एक पणती पेटवून त्यांचे आयुष्य कोरून काढणारी "माय" म्हणजे, सिंधूताई सपकाळ..!
अनाथांची "माय", अशी ओळख निर्माण केलेल्या सिंधूताई यांचे मंगळवारी ता. 5 रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने झालं आहे.
काल-परवाच त्या राष्ट्रपती भवनात व्हीलचेअर बसून आल्या होत्या. ते दृश्य पाहून खूप आनंद झाला होता. मानाचा असलेला "पद्मश्री" पुरस्कार त्यांना सन्मानाने दिला गेला होता. या आधी, असंख्य पुरस्काराने माईंचा गौरव करण्यात आलेला आहे.
प्रा. मोरे सरांनी वर्णन केलेली माय सिंधूताईत दिसायची. माईंच्या कार्या पुढे सगळे कसे थिटे, खूजे वाटायचे. मोरे यांनी सांगितलय, माझ्या माये पुढे थिटे समदे राऊळ,देऊळ...! तिच्या पायाच्या चिर्याचे (पायाला पडलेल्या भेगा) माझे अजिंठा.. वेरुळ....!
ही माय, हजारो अनाथांचे छत्र होते. या अनाथांच्या डोक्यावरून तिने मायेने हात फिरवला. त्यांना जगवले. जीव लावला. स्वतःच्या पायावर उभे केले. भावा-बहिनीनो, इंटरनेट च्या बाजारात पैशाने सगळे मिळते. ते विकत ही घेता येते. अपवाद असतो फक्त.....आई-बाप. तेवढे मात्र मिळत नाही. माईने ही उणीव भरून काढली. महाराष्ट्रातल्या मराठी मुलखात तिने अनवाणी पायाने मजल दरमजल करीत गावे जवळ केली. पदर पसरत साद घातली. लोक हो, मी अनाथाची माय झाले. तुम्ही गणगोत झालात तर मला बळ मिळेल. तुमच्या बळावर त्यांना जीवंत ठेवता येईल, देणार ना मुठभर अन्न..! काळीज खालीवर व्हायचे. अस म्हणतात की, एका संवेदनशील बाईच दु:ख एक बाईच समजू शकते. माईच्या हाकेला ओ देत, हजारो सावित्रीच्या लेकींनी माईसाठी खारीचा वाटा देऊन महाराष्ट्र धर्म वाढविला आहे. माईच्या भावनिक शब्दसामर्थ्याने....डोळ्यातून अश्रू ओरघळत राहायचे. समाजातल्या मुलीं विषयी असलेल्यामानसिकतेमुळे सिंधूताई यांना केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेता आले. लहान वयात लग्न झाले आणि नशीबी भोग आले. आयुष्यात आलेल्या कठीण संघर्षांतून त्यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला. समाजाने टाकून दिलेल्या अनाथ, मायबापा विना पोरके झालेल्या मुलांना त्यांनी छातीशी धरून कुरवाळे आणि सुरू झाला त्यांचा खडतर प्रवास. त्यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. आता त्या गोष्टीला तीस वर्षाचा काळ लोटला आहे. पोटची मुलगी अनाथ मुलांच्या आड येऊ नये म्हणून, ताईनी छातीवर दगड ठेवला. पोटची मुलगी दगडूशेठ हलवाई संस्थेतल्या सेवासदन मध्ये शिक्षण घेत वाढू दिली. अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. खर म्हणजे, औरस असून ही ज्यांना अनौरस म्हणून समाजाने नाकारले अशा सर्व चिमुकल्या बाळांची आई म्हणून "सिंधू माय" पुढे आली. त्यांचे पालनपोषण करून शिक्षण दिले. त्यांच्या पंखात बळ भरले. त्यांना समाजात मान सन्मान मिळेल, एवढे शिक्षण दिले. त्यांची संसार वेल वाढविली. अशा हजारो मुल-मुलींना माणूस म्हणून जगापुढे आणले.
माईंचा...गेवराई (बीड) शहराशी लळा, खूप जिव्हाळा ही होता. त्या आल्या की, हजारो मुल-मुली माईंच ऐकायला येत. माधव चाटे यांनी दोन तीन वेळा या माईला शहरात आणले.
माझ्या माधवला जपा, पोरगा चांगलाय, कसल बोलतोय. तो बोलला की अंगावर काटाच येतो.
ऐ.....पोरींनो, कार्यक्रम संपला की, जाऊ नका. चार गोष्टी सांगणार आहे. अंगभर कपडे घाला, कपाळाला कुंकु लावत जा, सवय करा.माईंनी...हाती माईक घेतला की, श्रोते नुसत ऐकायचे. त्यांच तरूण पणातले दु:ख...त्याच्या खोलवर झालेल्या जखमा...त्या जखमेतून भळभळणारे रक्त...तारुण्य आणि त्याकडे पाहणाऱ्या वखवखलेल्या नजरा...
त्या चुकवण्यासाठी तुडवलेली मसनवाट...परिस्थितीने शिकवलं...त्या बळावर त्यांनी निर्धाराने वाट तुडवून प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन त्यांच ताठ मानेने..स्वाभिमानाने उभे राहणे...जगातल्या भल्या माणसांनी सिंधूताईला "माय" म्हणून हाक मारणे...हा थक्क करणारा प्रवास....मानाच्या "पद्मश्री" पर्यंत येऊन ठेपला. माईचे मोठेपण, माईनेच सिद्ध केल. ज्यांनी घराबाहेर हाकलून दिले. ज्यांच्या मुळे...पावसात भिजत, चिखलात ,गोठ्यात रात्र काढावी लागली. दुर्दैव म्हणजे, ही माऊली तिथच बाळंत झाली. एवढे होऊन ही या आईने, मोठ्या मनाने माफ केले. ही माय जगभर फिरली. जगभरातल्या मराठी माणसांनी विचारपूस केली. गणगोत झाले. भरभरून दान दिले. सरकार ही धावून आले. मदत ही केली. फ.मू. शिंदे यांनी एका कवितेत आईची महती सांगितली आहे.
आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.
जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात.
दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की, सापडतेच अंतःकरणातली खाण. याहून का निराळी असते आई.....! दादा कोंडके, ये आयेएएएएए अशी हाक मारायचे.
सुभाष सुतार
(पत्रकार)
