इतिहासातला सोनेरी "दिन"
मुहूर्तमेढ.....!
एखाद्या सर्वसमावेशक व्यावसायाने उद्योगाला चालना मिळते. लोकसंपर्क, दळणवळ वाढत जाते आणि त्या परिसराला आर्थिक सुबत्ता लाभते. उद्योग व्यावसायात काही गोष्टींवर सुरूवातीपासून लक्ष देऊन तोटा होणार नाही, याची काळजी घेत पुढे जाता येते. भले, नफा कमी झाला तरी फार अडचण येत नाही. ना नफा ना तोटा, या तत्त्वावर काही दिवस काढता ही येतील. एकदा गणित जुळले की, संस्थेला आकार यायला वेळ लागत नाही. चिकाटी, योग्य नियोजन, पारदर्शकता आणि जनहिताचा विचार असावा, एवढे ध्यानी घेऊन वाटचाल केली की "गुलमेश्वर" च्या माध्यमातून हा परिसर उजळून निघेल, शेतकरी बापाला तरी या पेक्षा काय हवे असते ?
हर्ष वाटावा, अशी एक गोड गोष्ट घडून आली आहे. एक सुंदर, देखणी इमारत उभी राहिली आहे. त्यामध्ये स्वहित कमी आणि सार्वजनिक हीत अधिक आहे. बुधवार ता. 30 नोव्हेंबर 2021 रोजी त्या वास्तूचे दर्शन झाले. दूरवरून चिमणी दिसताच, मनोभावे नमस्कार केला. हात जोडले. खर म्हणजे, या कारखान्याचा उद्घाटन समारंभ एक दिवस आधीच पार पडला. जायचे मनात होते. निमंत्रण नव्हते. पण, खाजगी कामात व्यस्त असल्याने जाता आले नाही. प्रसिद्ध निवेदक , मित्र राहुल गिरी यांनी कार्यक्रम छान झाल्याचे सांगून, काही तरूण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नवा अध्याय कोरलाय, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. म्हणून, या वास्तूला पहाण्याचा योग आला.
मराठवाड्याच्या इतिहासातला सोनेरी दिवस म्हणून त्याची नोंद झाली आहे. काही समविचारी व्यावसायीकांनी मिळून, गुलमेश्वर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नगद नारायण नगर, सुरळेगाव. पो.गुळज ता. गेवराई, जि. बीड (मराठवाडा) परीसरात नव्या उद्योगाचे रोपटे लावले आहे. गुलमेश्वर हे भगवान शंकराचे संबोधन आहे.
गवताचे आधुनिक रूप म्हणजे "ऊस" आहे. ऊस गोड लागतो. वेगळी चव असते. कुलगुरू शिवाजीराव भोसले म्हणायचे, साखरेतून गोडी येते खरी. तिचा निर्माता लोकहितवादी असावा लागतो. नसता साखर ही कडू लागते. शेतकर्यांच्या आयुष्यात साखर पेरणी करणारा साखर कारखाना शेतीला उभारी देतो. त्यात गुलमेश्वर ची भर पडली. 30 नोव्हेंबर 2021 रोजी शुभ मुहूर्तावर
गुलमेश्वरच्या गव्हाणीत ऊसाची मोळी पडली आहे. कारखान्याची पर डे 700 टन ची क्षमता आहे. गाळप हंगामात दीड लाख टनाची गरज भासणार आहे. ही गरज याच परिसरातील शेतीतून पूर्ण होऊ शकेल, एवढे ऊसाचे क्षेत्र उपलब्ध आहे. या युनिट साठी पन्नास कोटी रुपयांवर खर्च आला असणार, सोपी गोष्ट नाही.
येथून गुळ पावडर (जाग्री ) ची निमिती होणार आहे. उद्योगाने दारिद्र्याचा नाश होतो. या अर्थाने, गुलमेश्वर च्या उभारणीतून या परिसराचा कायापालट होईल. संचालकांनी स्वतःच अस्तित्व पणाला लावले आहे. शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन पाऊल टाकले आहे. ही वैखरीची वाट आहे.
15 फेब्रुवारी 2021 रोजी कामाला सुरुवात करून, अवघ्या सात आठ महिन्यात एवढे मोठे युनिट उभे करायची किमया संचालकांनी केली आहे. पायाला भिंगरी लावून , 24 तास झपाटून काम केले आहे. शुभारंभ झाला आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे, विद्यमान आमदार लक्ष्मणराव पवार , माजी मंत्री बदामराव पंडित आणि राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी ही या युनिटचे मनापासून स्वागत केले आहे. एखादी गोष्ट उद्योगाशी निगडित आली म्हणजे, मनमोकळेपणा ठेवून पाठिंबा दिला पाहिजे. त्याची सुरूवात झाली आहे. शेवटी, उद्योग आला की पैशाची आवक जावक होते आणि परिसरात आर्थिक सुबत्ता यायला मदत होते. जय भवानी सहकारी साखर कारखाना ही कात टाकतोय, चांगलीच गोष्ट आहे. गुलमेश्वर कारखाना सुरू होताच 170 कर्मचाऱ्यांना कारखान्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे. गाव परिसरातल्या युवकांना संधी दिली आहे.
एखादा उद्योग उभा करायचा तर त्यासाठी काही गोष्टी शोधाव्या लागतात. महत्त्वाचे म्हणजे उद्दिष्ट ठरवावे लागते. गुलमेश्वर च्या संचालकांनी धुळे, नंदुरबार, कोल्हापूर-पुणे पासून चांदा ते बांदा भ्रमंती केली आहे. गुलमेश्वर चा परिसराच्या अवतीभवती गोदामाय, सिंदफणा आणि पैठण नाथसागराचा चा उजवा कालवा आहे. कारखाना जिथे उभा आहे तो परिसर हिरवागार आहे. आजूबाजूचा निसर्गरम्य परीसर कारखान्याच्या वैभवात भर पाडतो आहे. कारखान्याच्या अवतीभवती अनेक गावांचा वेढा आहे. येथील
शेतीला पाणलोट क्षेत्राशी जोडता आले आहे. गोदा, सिंदफणा, उजवा कालवा आणि असंख्य उपनद्या, त्यातून मिळालेला पाण्याचा स्तोत्र म्हणजे शेतीला मिळालेली संजीवनी आहे. इथल्या मातीशी इमान राखून काम करणारी शेतकरी जमात, स्वाभिमानी आणि कष्टाळू आहे. गुळज -पांचाळेश्वर - उमापूर परिसरात जवळपास दहा लाख टन उसाची नोंद आहे. याच परीसरात पंधरा किमी च्या परिघात उसाची लागवड केली जाते. पाच सहा वर्षात पावसाचे प्रमाण वाढते असून ,ऊस लागवड करण्यासाठी चांगल्या प्रतीची जमीन परिसरात आहे. चांगल्या गोष्टीचे, कामाचे कौतुक व्हायलाच हवे. ते करता आले तर आपले भाग्यच समजावे. बापूसाहेब चव्हाण आणि त्यांच्या सवंगड्यांनी गुलमेश्वर चे रोपटे लावले आहे. एका गरीब, कष्टकरी शेतकरी बापाच्या युवकांनी केलेले धाडस स्पृहणीय आहे. एक मोठा उद्योग उभा राहीला आहे. मालक, कर्तेधर्ते संचालक आहेत. मात्र, या उद्योगाला हातभार लावण्याची जबाबदारी तुमची - आमची, शेतकर्यांची, गावच्या नागरीकांची आहे. आपल्या गावातली वास्तू समजून, या वास्तुला झळाळी प्राप्त करून देण्याचे दायित्व, ही आपली जबाबदारी, बांधिलकी आहे. वंदनीय
राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे, "सपने वो नहीं है जो हम नींद में देखते है , सपने वो है जो हमको नींद नहीं आने देते" एका निश्चित ध्येयाने प्रेरित होऊन काही तरूणांनी स्वतःला गाडून घेतले आहे.
आपण ही निरभ्र मनाने, त्यांनी लावलेल्या वृक्ष रूपी....रोपट्याला पाणी घालू या..! एका शुभ मुहूर्तावर गुलमेश्वर ची लावलेली मुहूर्तमेढ इतिहासातील सोनेरी दिन राहील, एवढीच एक प्रार्थाना आहे.
सुभाष सुतार
( पत्रकार )
