8 डिसेंबर - संत संताजी जगनाडे महाराज यांची 397 वी जयंती
यानिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा लेख...!
तुकाराम गाथेचे लेखक संत संताजी जगनाडे महाराज
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत 8 डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे सूचित केले आहे. या माध्यमातून संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय सर्वांना होणार आहे. संताजी महाराजांच्या जीवन व कार्याची माहिती म्हणावी तितकी जनमानसात पोहोचलेली नाही. ती पोहोचावी याच उद्देशाने हा लेखनप्रपंच...!
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी *8 डिसेंबर 1624* रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. तसेच कीर्तन, प्रवचन यांना उपस्थित राहण्यात खंड नसे. हे सर्व संस्कार संताजींवर झाले. तत्कालीन परंपरेनुसार अगदी बालवयातच विवाह होत असत. संताजींचा विवाह त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षी खेडच्या कहाणे घराण्यातील यमुनाबाई यांच्याशी झाला.
याचदरम्यान त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. ती म्हणजे *संताजी व संत तुकाराम महाराज यांची पहिली भेट. संताजींचे वय 16 वर्षे असताना 1640 साली संताजी व संत तुकाराम महाराज यांची ही ऐतिहासिक भेट झाली.* चाकण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे कीर्तन होते. या कीर्तनाला संताजी व पूर्ण कुटुंब उपस्थित होते. संत तुकारामांच्या कीर्तनाने व अभंगांनी संताजी एवढे प्रभावित झाले की त्यांनी तुकारामांचे पाय धरले व 'मला तुमचा शिष्य करुन घ्या' अशी विनंती केली. यावेळी संताजींचे आई-वडील विठोबा व मथाबाई यांना संताजी ‘आता संसार सोडून संन्यास घेतात की काय’ अशी चिंता वाटली. परंतु 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे | उदास विचारे वेच करी ||' असे सांगणार्या संत तुकारामांनी संसार करत शक्य तेव्हा त्यांच्यासोबत राहण्यास सांगितले.
यानंतर चाकणपासून जवळ ज्या ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन असे, त्या त्या ठिकाणी संताजी जात असत. संताजींच्या या भक्तिभावाने संत तुकारामांनी *त्यांचा समावेश आपल्या 14 शिष्य टाळकऱ्यांत केला.* यानंतर अगदी सावलीप्रमाणे संताजी संत तुकाराम महाराजांच्या अंतसमयापर्यंत त्यांच्यासमवेत होते.
संत तुकाराम महाराज कीर्तन करतेवेळी निरुपण करायचे व त्यानंतर धृपद म्हणण्याचा मान संताजींना होता. संताजींची स्मरणशक्ती व हस्ताक्षर दोन्ही उत्तम होते. *संत तुकाराम महाराज कीर्तन करत असताना त्यांच्या मुखातून जे उत्स्फूर्त अभंग बाहेर पडायचे ते लिहून ठेवण्याचे महान कार्य संताजींनी केल्यामुळेच आज तुकारामांचे अजरामर अभंग टिकून राहिले.*
*कारण इंद्रायणीत जी गाथा बुडवण्यात आली, ती संत तुकाराम महाराजांच्या हस्ताक्षरातील गाथा होती. ती पाण्यातून वर येणे शक्य नव्हते. अशावेळी संताजी जगनाडे यांनी लिहून ठेवलेल्या अभंगांमुळे खऱ्या अर्थाने गाथा तरली असे म्हणता येईल. त्यामुळे हे अतिशय महान कार्य संताजींच्या हातून झाले.*
तुकारामांचे चरित्र लिहिणारे महिपती ताहराबादकर यांनी एका अभंगातून हे मांडले आहे.
संताजी तेली बहू प्रेमळ | अभंग लिहीत बसे जवळ ||
धन्य तयाचे भाग्य सबळ | संग सर्वकाळ तुकयाचा ||
खुद्द संत तुकाराम महाराजांचे पणतू गोपाळबाबा यांनी स्वतः लिहिलेल्या तुकाराम चरित्रात स्पष्ट लिहिले आहे,
दुसरा लेखक भाविक पूर्ण |
संताजी जगनाडा त्याचे अभिधान ||
तो यातीचा तेली त्यासी नाम नाणे |
देऊनि तुकयाने तोषविला ||
*संताजी महाराज यांच्या हस्ताक्षरातील 'जगनाडी वह्या' आजही जतन करून ठेवल्या आहेत. त्या वह्यांचा मुख्य आधार घेऊनच तुकाराम गाथा जनमानसापर्यंत पोहोचली आहे.*
संत तुकाराम महाराजांच्या सहवासात संताजींनाही कवित्व स्फुरले. त्यांनी लिहिलेले अभंग हे 'घाण्याचे अभंग' म्हणून प्रसिद्ध आहेत. परंपरागत घाणा व्यवसायातील प्रतीके वापरुन संताजींनी मराठी अभंगविश्व समृद्ध केले आहे.
आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा । नंदी जोडियेला मन पवनाचा
भक्ति हो भावाची लाट टाकियली । शांती शिळा ठेवली विवेकावरी
सुबुद्धीची वढ लावोनी विवेकास । प्रपंच जोखड खांदी घेतीयले
फेरे फिरो दिले जन्मवरा । तेल काढियले चैतन्य ते
संतु म्हणे मी हे तेल काढियले । म्हणुनी नाव दिले संतु तेली ।।
अशा अप्रतिम अभंगरचना संताजींनी केल्या आहेत. तसेच संताजी महाराजांची कन्या भागीरथी हिनेसुद्धा 'भागू म्हणे' या नावाने अभंगरचना केली आहे. संताजींचा मुलगा बाळोजी यांनीही संताजींनंतर संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहून ठेवण्याचे काम पुढे चालू ठेवले.
संत तुकाराम महाराजांच्या निर्वाणानंतर संत तुकारामांचे अभंग व विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे काम संताजींनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. तुकाराम गाथेच्या लेखनाबरोबरच तिचे रक्षणही जीवाची पर्वा न करता संताजींनी केले. हा इतिहास फारसा समोर आलेलाच नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळात परकीय सत्तांच्या अनेक स्वाऱ्या महाराष्ट्रावर झाल्या. पुणे हे स्वराज्यातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने शत्रू पुण्यावर चाल करून येत. पुण्याकडे येत असताना रस्त्यात चाकण लागतेच. याचठिकाणी संग्रामगड हा भुईकोट किल्ला आहे. तसेच चाकण ही तत्कालीन मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे शत्रू सैन्य चाकणवर चाल करून येत. संग्रामगडावर घनघोर लढाई होई. बाजारपेठ व गाव लुटले जाई. घरे-वाडे जाळले जात. *संताजींच्या काळात चाकणवर शत्रूंनी दोनदा स्वारी केली. पहिल्यांदा शाहिस्तेखान याने तर दुसर्या वेळी दिलेरखान याने. या दोन्ही स्वाऱ्यांच्या वेळी संताजींनी आपली संपत्ती, दागिने, धनदौलत यांना वाचवण्याऐवजी तुकारामांचे ‘शब्द धन’' आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूसैन्यापासून रक्षण केले. अशा खडतर संकटांतून संताजींनी तुकाराम गाथेचे रक्षण केले व हे शब्दधन अबाधित ठेवले.*
*20 डिसेंबर 1699* रोजी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला संताजी महाराजांनी सदुंबरे याठिकाणी आपला देह ठेवला. सदुंबरे याठिकाणी त्यांचे सुंदर समाधीस्थळ आहे. येथे जयंती व पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातून तेली समाज बांधव व भक्तजन गर्दी करतात.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ह्या महत्त्वपूर्ण योगदानाचा प्रचार व प्रसार जनमानसापर्यंत पोहोचावा हीच या जयंतीनिमित्त सदिच्छा...!
*संत संताजी जगनाडे महाराज यांना विनम्र अभिवादन...!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*जय संताजी...!*
धर्मराज करपे 9850929098
(लेखक मराठवाडा विद्यापीठात संताजी जगनाडे यांवर पीएच. डी. करत आहेत.)
