वर्गमित्रांनी साजरी केली अनाथ मुलांसोबत दिवाळी
गेवराई :(प्रतिनिधी)
मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना
अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना
कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांना
दुःख ओले, दोन अश्रू, माणसांचे माणसांना...!
कवीवर्य ना.धों. महानोर यांच्या या ओळींना स्मरून काल धोंडराई शाळेतील 2004 च्या दहावी बॅचच्या वर्गमित्रांनी मिळून गेवराईतील सामाजिक कार्याचे एक ऊर्जा केंद्र असलेल्या 'बालग्राम' सहारा अनाथालय येथे जाऊन तेथील अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली.
विविध क्षेत्रांत काम करणार्या या वर्गमित्रांनी मिळून बालग्रामला 10,000 रुपयांचा किराणा व मुलांसाठी मिठाई दिली. या मुलांसोबत आपला आनंद साजरा करत त्यांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली आहे.
सहारा अनाथालयाचे प्रमुख संतोष गर्जे व प्रीती गर्जे यांच्या उपस्थितीत मिठाई व साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी धर्मराज करपे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 'आमची दिवाळी खऱ्या अर्थाने आज साजरी झाली' असे मत व्यक्त करत बालग्राम परिवाराच्या कार्याचा गौरव केला.
संतोष गर्जे याप्रसंगी म्हणाले की, अनेकांचे हात या प्रकल्पाशी जोडलेले असल्याने हा प्रकल्प उभा असून त्या सर्वांचे सहकार्य हीच आमची कार्यप्रेरणा आहे.
यावेळी धोंडराई शाळेतील दहावी 2004 च्या बॅचचे वर्गमित्र सर्वश्री नामदेव खेडकर, धर्मराज करपे, रामेश्वर बदक, डॉ. मिलिंद ठवरे, गणेश यमगर, अफसर सय्यद, अशोक मोटे, जगदीश हजारे, उमेश पाटील, गोरख लांडगे, शरद पवार व युवराज राजपूत व संपूर्ण बालग्राम परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
