आपण, अस का वागतो ?
अस का वागतो आपण ? खरच गरज असते का , असच वागण्याची. लोकसेवक म्हणून एवढे मोठे अधिकार, हाताखाली हजारो माणसे, कर्मचारी, सेवकांचा ताफा असतांना ही......"दामुजीलाच" का महत्त्व देतो. पैसा सर्व काही आहे, अस का वाटत बर ? गल्ले लठ्ठ पगार असून ही, समाधान का लाभत नाही. असा सरळ साधा आणि मनाला चटका लावणारा
प्रश्न विचारण्या मागे खास कारण ही आहे.
मंगळवार ता. 26 रोजी दुपारी चार वाजता एक फोन आला. पोलीस ठाण्यात या. गेवराईचा आगार व्यवस्थापक लाच घेताना पकडला आहे.खरच वाईट वाटल. उच्च पदावर काम करायला संधी मिळणे, हे भाग्य असते. जगात एवढी मोठी स्पर्धा आहे. अशा स्थितीत मिळालेली नौकरी "लाच" घेऊन घालवायची. किती चिंताजनक बाब आहे. पात्रता असून ही अनेक चांगली माणसे पदापर्यंत जात नाहीत. हे वास्तव असताना , पदावर काम करणारे "लोकसेवक" लाचे सारख्या घटनेत घरी जातात. अशा वेळी, मनात प्रश्नांचे काहूर उठते. सहज वाटते की, हे समाजव्यवस्थेचे अपयश आहे का ? असा प्रश्न पडतो. गेल्याच आठवडय़ात तत्कालीन तहसीलदार शेळके यांच्यावर झालेल्या कारवाईने गेवराईकरांना तर धक्काच बसला. कधी काळी गेवराईच्या (बीड) विविध विभागात उच्च पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केल्याने चर्चेला उधाण आले आहे. तत्कालीन तहसीलदार डॉक्टर बिराजदार, चंद्रकांत शेळके, कृषी विभागातला देशमुख, आणि काल परवाच ज्यांच्या मुसक्या बांधून अटकेची कारवाई केली तो आगार प्रमुख वाघदरीकर..! या शिवाय, मागच्या सहा महिन्यात चार पाच कर्मचाऱ्यांवर अशाच कारवाईत घरी जाण्याची वेळ आली.डेपो मॅनेजर यांचे कारनामे तर चक्रावून सोडणारे आहेत. बसस्थानकावर रोजंदारीवर झाडझूड करून पोट भरणाऱ्या महिलांना दिवसाला दोनशे पन्नास रुपये मिळतात. त्यातले पन्नास रुपये हे महाशय घेत असत आणि मग बिलावर सही करायचे. असे असेल तर, किती हा गलिच्छ प्रकार आहे. ज्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तो कर्मचारी स्टोअर विभागात कार्यरत आहे.स्टोअर विभागात एक दोन वस्तू दिसून आल्या नाहीत. त्यामुळे, व्यवस्थित अहवाल सादर करतो त्या आधी पंचवीस हजार रूपये दे, त्यांनी त्या कर्मचाऱ्याला
लाच मागीतली. कर्मचाऱ्याचा पगार आहे आठ हजार रुपये..! पंधरा हजार घेताना चतुर्भुज झाला अन वाघ गेला दरीत.
कुलगुरू शिवाजीराव भोसले म्हणायचे, मिळेल ते घ्यावे वाटते, हाव संपत नाही आणि मग धावाधाव वाढत जाते. या अथाने, हाव का वाढत जाते. हा खरा विषय आहे. तस तर, भौतिक गरजा या चढाओढ केल्याने वाढतात. असे सर्व साधारण निरिक्षण आहे. त्यात किती तथ्य, माहीत नाही पण अनेकदा हेच एक कारण असल्याचे दिसून येते. एक उच्च पदावर कार्यरत असलेले अधिकारी होते. त्यांनी सेवानिवृत्तीच्या आठवडाभर आधी दुकानदारांना, भेट घेऊन यायचेच असेल तर पाच ग्राम सोन्याची अंगठी घेऊन या, असा विनंती वजा आदेश दिला होता. या गोष्टीला आज पंधरा वर्ष झाली. डॉक्टर बिराजदार तर पत्रकारांना आग्रह करून सांगायचे, माझ्या नावा आधी डॉक्टर लावत जा, मला विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त आहे. रूबाबात कार्यालयात यायचे, महागडा गाॅगल असायचा. डॅशिंग राहायला कुणाची हरकत नाही. मात्र, हाच रूबाब कामात ही दिसला पाहिजे. लोक डोक्यावर घेऊन मिरवतील. जिल्ह्य़ातील लोक अशा कामात तत्पर असतात. चांगल्या अधिकाऱ्यांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला, कौतुक ही केले. काय होतय, आपण सरकारी नौकर आहोत. हेच काहींच्या गळी उतरत नाही. अधिकार आले की मग तोरा दाखवायचा. कार्यालयात यायचेच नाही. फाईली अडवायच्या, खुटी मारायची. या बाबी समोर आल्यावर प्रतिमा मलीन होते जाते. खर तर,
सरकारी आणि निमशासकीय कामे आनंदाने करायला हवीत. त्यामध्ये किंतू आला की, मग कामात लक्ष लागत नाही. लालसा वाढत जाते. दप्तर दिरंगाई असा एक शासकीय शब्द आहे. तत्पर, सत्वर ती कार्यवाही व्हावी. सरकारी यंत्रणेतले हे महत्वाचे शब्द आहेत. त्याला एक उंची आणि अर्थ आहे. दुर्दैवाने, तस होत नाही. काही दिवस भागून जाते. अधिकाराचा गैरवापर करून ही काही होत नाही. धाडस वाढत जाते.
अचानक लाच प्रकरण भोवते आणि मग, आपण हे काय केले. असे वाटायला लागते. तोपर्यंत वेळ राहत नाही. सगळेच आलबेल आहे असे नाही. काही अधिकारी खूप इमानदारीने लोकसेवक म्हणून कार्यरत राहण्याला प्राधान्य देतात. अशांचा नाव लौकिक होतो. तत्कालीन जिल्हाधिकारी केन्द्रेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक
धिवरे, तत्कालीन तहसीलदार महेश वडदकर, विक्रम देशमुख, राऊत, चंद्रकांत शेळके, सुमनताई मोरे यांचा गेवराई तालुक्यातला कार्यकाळ चांगला राहीला. वडदकरांचे तर सर्व सामान्य घटकांपर्यंत नाव झाले होते. अनेक नावे घेता येतील. हा लेख वाचताना तुम्हाला ही काही चांगले नावे आठवतील.
अब्राहम लिंकन यांनी एक पत्र पाठवल होत, मुख्याध्यापकांना...! त्यांनी त्यात लिहल की, श्रमातून कमावलेला, मिळवलेला एक छदाम ही आयत्या मिळालेल्या घबाडा पेक्षा ही मौल्यवान असतो. मग, कष्टाने, घामाने मिळवले ते उगीच का हारवायचे ? खर की नाही.
सुभाष सुतार
(पत्रकार)
