चांगला संकल्प.
अग्रलेख सा प्रकाश आधार मध्ये प्रसिद्ध
चांगला संकल्प...!
परमपूज्य भगवान बाबांच्या पुण्यभूमीत एक चांगला उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या विषयावर स्वतःच पंकजा ताई मुंडे यांनीच आपल्या समर्थकांना साद घातली आहे. खूप चांगला विषय, मनोदय त्यांनी भगवान शक्ती - भक्ती गडावरून जाहीर केला. त्याचे स्वागत झालेच पाहिजे. व्यसनमुक्तीची शपथ देऊन, एक आदर्श पाऊल ताईनी गडावरून उचलले, इतिहासात त्याची नोंद झाली आहे. खर म्हणजे, तंबाखूचा विळखा भरले घर उध्वस्त करतो. हे वास्तव लक्षात घेऊन, कोणीतरी व्यसनमुक्तीचा विढा उचललाच पाहिजे. वास्तविक पाहता, व्यसनमुक्तीची चळवळ कुठेना कुठे सुरू असतेच, त्यामध्ये ताईनी पुढाकार घेणे महत्त्वपूर्ण बाब आहे.घरे कोसळून पडलीत. कर्ता पुरुष व्यसनाने अकाली जातो. घरात पत्नी, मुल बाळ असतात. ती तर उघड्यावर येतातच, त्याशिवाय पत्नी कधीही बाहेर पडलेली नसते. मुलांची जबाबदारी पार पाडत तिचा दिवस जातो. अशा वेळी, अचानक घराची सगळी जबाबदारी अंगावर आल्यावर,त्या बाईने ती कशी पार पाडायची ? खूप कठीण असतो असा प्रसंग, ज्याच जळत त्यालाच कळत. हे जग दिल्या घेतल्याच आहे. सोपी गोष्ट नाही. पाठीवर थाप मारून मदत करणारे असतात, पण त्यांना ही मर्यादा पडते. रोजच कोण मदत करीन, हा प्रश्न असतोच. म्हणून, व्यसन हे वाईटच असते. ते करू नये, तरूण पिढीला या संकटातून वाचवायचा प्रयत्न करण्याचा निर्णय ताईनी घेतला. माझ्यासाठी एवढी एकच गोष्ट सोडा, तुम्हाला फार काही मागत नाही. तरूण वयातली पोरं व्यसनाधीन होताना, खूप वाईट वाटते रे...! सोडाल ना..? अशी साद घालून, एक आई, ताई, बाई किती
संवेदनशील असू शकते याचा प्रत्यय दसरा मेळाव्यात दिसून आला आहे. व्यसना सारखा विषय त्यांनी पोटतिडिकीने मांडला आहे. समाजातल्या सगळ्या घटकांनी आता या आव्हानाला पाठिंबा देण्यासाठी पुढे यायला सुरुवात केली पाहिजे. तंबाखू...खायची म्हणजे चार चौघातून उठून जायची गरजच काय ? अस चार चौघात "चल उठ" म्हणणारी सवय कशाला करता.या सवयीने स्वतःचेच नुकसान आहे. व्यसना पायी पैसे जातात. पैसे नसतात तेव्हा भिक मागून व्यसन पूर्ण करायची वेळ येते. सवय वाढली की
कॅन्सर होतो. बर, एवढा पैसा आणायचा कोठून ? दवाखान्यात लाखो रूपये लागतात. ऐपत असेल तर पैसे जातात पण घर भिकारी होते. ज्यांची ऐपत नसते त्यांना दुसरा पर्याय नाही. तोंडातून किडे बाहेर पडून मृत्यू येतो. तो तर जातो जिवानिशी. कुटुंबाची वाताहत होते. या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. माजी मंत्री पंकजा ताईनी ती गरज, वास्तव ओळखूनच व्यसनमुक्तीची हाक दिली आहे. त्यांच्या या चांगल्या संकल्पनेचे स्वागत आहे. समाजाच्या हिताचे निर्णय निरोगी समाज व्यवस्थेला बळकटी आणतात. आम्हाला तेच हवय.
