पालकांनो, मुलांना जपा..! 🙏🏻🙏🏻
पिसाळल्या कुत्र्याने चावा घेतल्याने पुनित मुंदडा ( रा. गेवराई - बीड ) नावाचा आठ वर्षाचा एक कोवळा जीव गेल्याची बातमी वाचून मन सुन्न झाले. कुत्रा चावल्याचे मुलाने घरी सांगितली नाही. त्यामुळे, हा दुखद प्रसंग मुंदडा कुटुंबावर कोसळला. एक भितीयुक्त चुक पालकांना अंतर्मुख करायला लावणारी आहे. हल्लीची मुल खूप हुशार आणि तल्लख बुद्धीची आहेत. मात्र, मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुल म्हणजे, पालकांचा जीव की प्राण, त्या अर्थाने आपण कुठे कमी पडतोय का ? हा प्रश्न आपणच आपल्या मनाशी विचारायचा आहे. मुलांच्या भरणपोषणाची जबाबदारी पालकांना पार पाडावी लागते. म्हणूनच, काही गोष्टीकडे बारकाईने पाहीले पाहीजे. ती हुशार असली तरी त्यांना काही गोष्टीची समज नसते. ती लहानच असतात. संवेदनशील असतात. चटकन राग येतो. ते लगेच भितात. त्यांना अपमान नको वाटतो.
त्यामुळे, आपली जबाबदारी ओळखून मुलांचे निरिक्षण करण्याची गरज असते. लहान मुल घाबरत असतात. कधी ती आई किंवा बाबांना घाबरतात तर कधी दवाखान्यात जायला घाबरत असतात. डॉक्टर आणि दवाखावा त्यांना नको वाटतो. त्यांना इंजेक्शन नको वाटते. साधी आयोडीन लावायच्या भितीने ते आईचा आधार घेतात. या सगळ्या गोष्टी नॅचलर आहेत. त्यात काय वावगे नाही. परंतू , त्यांना काही गोष्टी समजून उमजून सांगितल्या की, ते ही धीट व्हायला लागतात. मोठ्यांनी लहाना मुलांसारखे होऊन, त्यांना अशा कठीण वाटणार्या गोष्टी सोप्या करून सांगणारे हवे असतात. म्हणून, व्हावे लहानाहून लहान...! त्यांना आपण सुद्धा त्यांच्या वयाचेच मित्र वाटले पाहीजेत. अवघड असे काही नाही. वेळात वेळ काढून त्यांना वेळ दिला पाहीजे. कोणी ही, आई ,बाबा ,आजी,आजोबा अन्य जवळच्या नातेवाईकांनी एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवली तर अनेक गोष्टीमध्ये त्यांना शहाणे करता येईल. अण्णाभाऊ साठे म्हणायचे, "पोर आणि ढोर सारखेच असते". त्यांना वळवावे लागते. कधी गोडीत तर कधी थोडस रागावून त्यांच्याशी सुसंवाद साधायलाच हवा. या अर्थाने, मुलांकडे सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.
पुनितच्या विषयावर बोलायचे झाल्यास, त्याने घरी गेल्यावर एक गोष्ट लपवली. तो सायकलवरून घरी येत होता. अचानक पिसाळलेला एक कुत्रा त्याच्या सायकल मागे लागल्याने तो घाबरून सायकलवरून पडला. पडल्यावर त्याला काही ठिकाणी खरचटले. त्याचबरोबर तो कुत्रा ही त्याला चावला. परंतू , पुनितने घरी आल्यावर केवळ सायकलवरून पडल्याचे सांगातले. पालकांनी अशा वेळी मुलांच्या सांगण्यावर विश्वास दाखवून, आणखीन काही माहीती घेण्याचा प्रयत्न केला पाहीजे. कुठे पडलास बाळा, चल बर ...दाखव ती जागा ? म्हणजे काय होईल. जिथे तो पडला तिथे कोणी आजूबाजूला असेल तर आणखी एखादी नवी माहीती मिळेल. अहो, तुमचा मुलगा पडला आणि हो, त्याच्या मागे एक कुत्रा लागला होता. अशा लहानसहान गोष्टी आपल्या कळतात. दुर्दैवाने पुनितच्या पालकांना वाटले, तो पडला आहे. मात्र, आठवडाभरात पुनितची तब्येत अचानक बिघडली. वैद्यकीय उपचार झाले तरी त्याला बरे वाटेना. उलट तब्येत आणखी बिघडल्याने त्याला उपचारार्थ औरंगाबाद येथे हलवले. अखेर त्याचा मृत्यू झाला. रेबीज मुळे तो गेल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. या दुर्दैवी घटनेत पालकांचा काही दोष नाही. पुनितचा सुद्धा नाही. तो तर चिमुकला जीव. भितीपोटी त्याने गोष्ट लपवल्याने, काळजाचा तुकडा
गेल्याचे दु:ख आयुष्यभर राहील. हा विषय पालकांसाठी गंभीर आहे. उदाहरण म्हणून , ते उन्हाळ्याचे दिवस होते. पालक घरीच होतो. त्यांचा सहावीतला मुलगा घरी आला. गेट मधून तो घरात आला पण आई - बाबाकडे आलाच नाही. पतीने, पत्नीला विचारले तर तिने, हो ना, आपला बाळा कसा काय आला नाही ? पडून झडून आला वाटतय. असा संशय व्यक्त केला. आईने त्याला आवाज दिला तर बाळा डोळ्याला मोठा गाॅगल लावून बसला होता कारण , त्याला खेळता खेळता डोळ्याला लागले होते. ही अशी असतात मुल. ते भितात. त्यांना वाटते आई - बाबा रागवतील.म्हणून ते काही गोष्टी घरी सांगत नाहीत. मात्र, पालकांनी सजग राहून, लहान मुलांचे नकळत निरिक्षण करावे. त्याला विश्वासात घ्यावे. आपण त्याचे शाळेतल्या विद्यार्थ्या सारखेच मित्र आहोत. याची त्याला जाणीव झाली पाहीजे. ते आपल्या हाती आहे असे वाटते. कुलगुरू शिवाजीराव भोसले म्हणायचे, मुलांचे हित व्हावे, असे सगळ्याच पालकांना वाटत राहते. मात्र, त्यासाठी पालकांनी साखरेतून गोडी येते. हे भावसूत्र लक्षात घ्यावे. सुमितच्या निमित्ताने, समस्त पालकांशी संवाद करण्यासाठी हा प्रपंच केला आहे.
आणखी एखादा सुमित असा अकाली जाऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. कारण, पोर आणि ढोर सारखेच असते. म्हणून, चुक कुणाची. या खोलात जायची गरज नाही. या पुढच्या चुका टाळता आल्या म्हणजे , चिमुकल्या, गोड पुनितला ही भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल...!
सुभाष सुतार
