खतांची दरवाढ मागे घेऊन शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करुन द्या
-----------------------------
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अँड.गणेश कोल्हे यांची पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे मागणी
---------------------------
गेवराई : प्रतिनिधी
मागील एक-दिड वर्षापासुन देशामध्ये कोरोनाचा संसर्ग आहे. या संकटात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही. शेतकऱ्यांच्या मालाला कोठेही योग्य मार्केट उपलब्ध नाही. त्यातच वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट या संकटाने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान कशानेही न भरून निघणारे आहे. त्यामुळे शेतकरी पुर्णपणे आर्थिक अडचणीत सापडलेला असताना आपण रासायनिक खतांचे भाव वाढवुन एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे. तरी रासायनिक खतांचे भाव कमी करून शेतकऱ्यांना योग्य दरात रासायनिक खते उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अँड. गणेश कोल्हे यांनी पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, केंद्राकडून रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याच काम केले आहे. केंद्राच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना शेती करताना नाकीनऊ येणार आहे. अगोदरच शेतीमालाला हमी भाव नाही, त्यातच देशात कोरोनाचे संकट असल्याने बाजारपेठा बंद आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना केंद्राकडून खतांच्या प्रति बॅग 700 ते 800 रुपयांनी वाढवल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून शेती व्यवसाय पुर्णतः संकटात येईल. अगोदरच सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने बेजार असलेल्या शेतकऱ्यांना खतांच्या वाढलेल्या किंमतीने आश्चर्याचा धक्काच बसला असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. कोरोनाच्या संकटात आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी या वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे पुर्णतः नैराश्यात गेला आहे. पंधरा दिवसांवर खरीप हंगाम आला आहे, त्यामुळे हा खरीप हंगाम व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्या सरकारने खतांच्या अन्यायकारक वाढवलेल्या किंमती तात्काळ कमी कराव्यात, रासायनिक खतांचे भाव कमी करून शेतकऱ्यांना योग्य दरात रासायनिक खते उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अँड. गणेश कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
