महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

साक्षात सरस्वतीच...

साक्षात सरस्वतीच.....!

    "त्या" जेमतेम शिकलेल्या होत्या. लग्नानंतर पोटापाण्यासाठी पतीसह गाव खेड्यातून पुणे शहरात आल्या. घोरपडे कुटुंब येरवडा परीसरात राहत होते. त्यांचे पती मिस्त्री काम करायचे. आपल्या नशीबी आलेले दिवस पोराबाळाच्या नशीबी येणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली. शिक्षण असते तर कुठेही चांगली नौकरी करता आली असती, अशी खंत त्यांना वाटायची, म्हणून मग त्यांनी काबाडकष्ट करून मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठे केले. साधी अक्षर ओळख असलेल्या या साक्षात "सरस्वतीने" चार मुलांना इंजिनियर केले. एक मुलगा राजेश, विदेशात नौकरीला आहे. दुसरा मुलगा पुण्यातल्या नामांकित कंपनीत आणि जेष्ठ चिरंजी उद्योजक म्हणून पुण्यातच कार्यरत आहेत. छोटा शेती करतोय आणि जावई, चंद्रकांत चौधरी पोलीस अधिकारी आहेत. पाच मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार असलेल्या सौ. सरस्वती एकनाथ घोरपडे यांचा अकाली मृत्यू नातेवाईकांसाठी धक्का देऊन गेला आहे. शनिवारी अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी आली. मुंगी ता. पैठण जि. औरंगाबाद , या सासर गावातून पुण्यात आपलं भविष्य शोधायला आलेल्या घोरपडे दांपत्याने स्वकर्तृत्वावर सुखाचे दिवस शोधले. उपजीविका भागविण्यासाठी मोलमजुरी केली. त्या मनाने खंबीर होत्या. घर सांभाळून पतीच्या मागे ठामपणे सावली सारख्या उभ्या राहील्या. दिवस बदलतील, या आशेवर त्यांनी पुण्यात गरीबीचे दिवस काढले. दारिद्र्याचा पिच्छा पुरवून कुटुंब, नातेवाईक, आप्तेष्टांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या "मामी"आमच्यासाठी आदर्शवत होत्या. आम्हाला खुप आधार होता. तो आधारच असा अचानक गेला. मजबूत पायातली एक शिळा गळून पडली आहे. ही हानी भरून निघणार नाही. खर तर, 
रक्ताचे नाते असतेच, पण मायने गुंफलेली नाती घट्ट असतात. सहसा ती तुटत नाहीत. सरस्वतीबाई घोरपडे, माझी पत्नी मंगल हिची मावशी. माय मरो अन मावशी जगो. या अर्थाने , मंगलवर मावशीचा खुप जीव होता. त्या नेहमी म्हणत, मंगल, माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुला अंतर देणार नाही. माझ्या पत्नीचे पहीले बाळंतपण मावशीच्या घरी म्हणजे पुण्यात झाले. हक्काने तिला घेऊन गेले. माझी सासरवाडी गेवराई ( बीड ) शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर  उमापूर गाव, तरी ही घोरपडे कुटुंबाने आम्हाला जीव लावला. 
जावई म्हणून मला खुप मान सन्मान दिला. आपला जावई आणि बहीणीचा जावई असा भेद कधी केला नाही. त्यांच्या घरी गेलो म्हणजे, सुभाष आलेत का ? असा प्रश्न त्या करायच्या, तेव्हा चांगला फील यायचा. पुण्यात त्यांच्याकडे गेलेत की, माझ्याशी हितगूज करीत. त्यांच शिक्षण किती, या पेक्षा त्यांच्यातली समज आणि नातेवाईकांवर असलेले प्रेम त्यांची उंची अधोरेखित करायचे. गरीबी असतानाचा स्वभाव आणि सुगीचे दिवस आल्यावर ही, त्यांच्या वर्तनात कसालाही बदल जाणवला नाही. ना त्यांना कधी अंहकार आला. वैभव संपन्न आयुष्यात ही त्यांनी नातेवाईक, आप्तेष्टांना अंतर दिले नाही. घोरपडे कुटुंबाच्या "त्या" बहिणाबाईच होत्या, असे म्हटले तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल. मुलांच्या शिक्षणा कडे त्यांच बारकाईने लक्ष होते. त्यामध्ये त्यांनी तडजोड केली नाही. हाडाची काड केली. मुलांना उच्च शिक्षण देऊन घोरपडे कुटुंबात त्यांनी "ज्ञानदीप" लावला. याचे सगळे श्रेय त्यांनाच जाते. मुल शिकून मोठी झाली. आपआपल्या पायावर उभी राहीली. मुलांनी आईच्या स्वप्नांना पंख लावले. तिघे इंजिनियर झाले. राजेश विदेशात नौकरीला गेला आणि आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचा त्यांना आनंद झाला. लाखात एक असा जावई, चंद्रकांत चौधरी ( पो.निरीक्षक ) यांच्या रूपात मिळाला. सगळे मनोरथ सिद्धीस गेले. त्या म्हणायच्या, अजून काय हवय. देवाने परीक्षा घेतली, नको तेवढे पदरात टाकले आहे. कधी काळी येरवडा येथे वास्तव्य असलेले घोरपडे कुटुंब नावाजलेल्या खेसे पार्क मध्ये रहायला गेले. ही गोष्ट मामींच्या
मनाला समाधान देऊन गेली आहे. कुटुंबाला एकत्र बांधुन ठेवण्याकडे त्यांचा कल असायचा. आपल्या नातेवाईकांना जपा, अंहकारात येऊ नका ,अशी शिकवण सांगणार्‍या मामी धार्मिक वृत्तीच्या होत्या. ही माऊली  पतीच्या मागे सावली सारखी उभी राहीली. हे दोघे रथाची दोन चाकेच होती. एकमेकांवरचा विश्वास, समंजसपणा, अतुट नाती असलेली ही जोडी अनेकांसाठी प्रेरणा होती. 
   एकदा त्या उमापूरला बहीणीकडे भेटायला आल्या होत्या. त्या दिवशी त्यांचा अचानक विंचवावर पाय पडला. रात्रीचा एक वाजला होता. 
खुप त्रास होत असल्याने त्यांना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्या आधी मी रुग्णालयात जाऊन बसलो. डॉक्टरांनी उपचार केले. मात्र, त्रास काही कमी होत नव्हता. डॉक्टर म्हणाले, चार पाच तास त्रास होतोच, मला बघवेना. डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एक इंजेक्शन लिहून दिले. रात्रीचे तीन वाजले होते. मेनरोडवर गंगवाल यांचे मेडिकल आहे. तो माझा बालपणीचा मित्र आहे. तेवढ्या रात्री त्यांनी पैसे न घेता मेडिसिन दिले. मामींना पहाटे पहाटे झोप लागली. मी आणि माझी पत्नी रात्रभर जागेच होतो. मामी, सगळ्या नातेवाईकां जवळ माझे कौतुक करायच्या. ऐश्वर्यसंपन्न जीवनात ही त्यांचा साधेपणा टिकून होता. घोरपडे कुटुंबात त्यांचा शब्द प्रमाण असायचा. 
   अलीकडच्या काळात मामींची तब्येत साथ देईना, सांध्याचा आजार बळावत गेल्याने त्यांच्यावर जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या जिगरबाज होत्या. त्यांनी, सात आठ वर्षांपासून आजाराशी दोन हात केले. त्यांनी हार मानली नाही. त्या लढत होत्या...मृत्यूशी...! त्याला अनेकदा चकवाही दिला. शेवटी काळाने डाव साधला. शनिवार ता. 1 मे. 2021 रोजी त्यांना मृत्यू ने गाठले. रविवार ता. 2 रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना साश्रू नयनाने निरोप देण्यात आला. 
     जगदगुरू तुकाराम महाराज म्हणायचे, याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. खर म्हणजे, शेवट गोड झाला आहे. त्यांनी आनंदाने.... बोलता बोलता देह ठेवला. आई - बाबांच्या डोळ्या देखत मुलां-मुलींचा संसार वेल मांडवी गेला की, त्यांना कशाचीच चिंता वाटत नाही. अशा वेळी, मृत्यू म्हणजे एका अर्थाने आनंद सोहळाच असतो. मामी, तुम्ही कष्टाने कोरलेल्या आयुष्याचे खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. तुमच्या कुटुंबाचा उत्कर्ष त्याचे उत्तम उदाहरण आहे. मामी...तुम्ही सदैव आठवणीच्या हिंदोळ्यावर कायम राहणार आहात. तुमचा विसर कधीही पडणार नाही. तुमचा मृत्यू, नातेवाईक, आप्तेष्ट आणि घोरपडे कुटुंबावर अचानक झालेला आघात आहे. या दुखद प्रसंगातून घोरपडे कुटुंबाला सावरण्याचे बळ मिळो, अशी इश्वर चरणी प्रार्थना...! आदरणीय मामी... भावपूर्ण श्रद्धांजली.

सुभाष सुतार ( पत्रकार - बीड  )