दिनेश मानेला श्रध्दांजली कशी वाहू ? - प्रा. बापू घोक्षे
------------------------------------
गेवराई, (प्रतिनिधी) - प्रा. दिनेश माने या आपल्या बालमित्राच्या दुःखद निधनावर श्रध्दांजली कशी वाहू ? असे मनोगत सुप्रसिध्द नाटककार प्रा. बापू घोक्षे यांनी त्यांच्या विशेष फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केले आहे.
या पोस्टद्वारे आपल्या मित्रास श्रध्दांजली अर्पण करतांना प्रा. बापू घोक्षे यांनी लिहिले आहे की, बालमित्र म्हणून दिनेश मनाच्या जवळ होता... कालौघात बदलत गेलेलं त्याचं विलक्षण जगणं जवळून बघत आलो...
शाळेत शिकतांना कधीतरी एकत्र होतो... विद्यापीठाच्या मराठी विभागातून युवक महोत्सव गाजवित तो कायम चमकत राहिला... दिलीप महालिंगे, बसु कानडे यांच्या सोबतीनं असंख्य एकांकिका स्पर्धांवर त्यानं अभिनेता म्हणून राज्य केलं...
ग्रामीण कथेला प्रतिककथेचा नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला... 'झाड', 'रिंगण', 'दगड' या त्याच्या अशाच अफलातून कथा... मानवी मनाच्या अंतरंगाचा धांडोळा घेणाऱ्या या कथा त्याच्या भारदस्त आवाजात सादर होतांना ऐकल्या की प्रेक्षक शहारायचा... 'रिंगण' नं तर केंद्रीय युवक महोत्सवाचं सुवर्णपदक जिंकलं होतं...
तसा तो मला सिनियरच...
मी विद्यापीठात शिकायला गेलो, तेव्हा तो गंगापूरला प्राध्यापक झालेला...
तिथं रमला नाही...
मग आष्टीला आला...
अस्वस्थ असायचा...
तिथंही मन लागलं नाही...
पाटोद्याला आला... पाटोद्यात आम्ही सोबतच प्राध्यापकी सुरु केली...
फार दिवसांनी एकत्र आलो... खूप उत्साह होता... स्नेहसंमेलने, एकांकिका स्पर्धा, असं खूप काही चालू होतं...
सुंदर सुशील पत्नी... गोंडस चुणचुणीत मुलगा... दृष्ट लागण्यासारखा त्याचा नेटका संसार...
नव्हे, दृष्ट लागलेलीच...
पूर्वीचा दिनेश पुरता बदललेला...
पूर्ण अल्कोहोलिक...
त्याशिवाय जगणं शक्यच नाही, म्हणणारा... त्याला सावरण्यासाठी मी जीवाचा आटापीटा केला...
त्यावेळचे प्राचार्य परजने, प्रा. सोनवणे आदींनीही त्याला खूप सांभाळला...
पण त्याला सावरायचं नव्हतंच जणू...
गडी राजीनामा देऊन अनामिक प्रवासावर गेला... कसला शोध होता त्याला..? कुणास ठाऊक...
सुभाष आणि सुधीर या निकम बंधूंनी केलेल्या 'तनमाजोरी' या नाटकात आम्ही सोबत होतो...
माझ्या 'गबार' आणि 'माणूस' या एकांकिकांना त्यानं आपल्या अभिनयानं वेगळी उंची दिली...
कमलाकर देशमुखांच्या 'आनंदवाडी' नाटकातून तो राज्य नाट्य गाजवून आला...
दै. चंपावतीपत्रची साहित्य पुरवणी मी संपादीत करीत होतो, तेव्हा 'देशीच्या
अड्ड्यावरून' हे रोखठोक सदर त्यानं सलग दीड वर्ष लिहिलं...
एकप्रकारे ते त्याचं आत्मकथनच होतं...
कोणताही मुलामा न देता, वास्तव मांडलेलं...
गेल्या दहा वर्षात निवांत भेटलाच नाही...
कधीतरी कॉलेजवर यायचा... माझ्या खिशात हात घालायचा...
मिळतील तेवढे काढायचा...
पुन्हा बोलतो, म्हणीत निघून जायचा... मी चिडायचो...
पिऊन कॉलेजात भेटायला येत जाऊ नकोस, म्हणायचो...
तो ओशाळवाणं हसून 'सॉरी' म्हणून सटकायचा...
दिन्या, साल्या, आज कोणत्या प्रवासाला गेलास..?
मला कॉलेजात येऊन भेट...
घाल हात माझ्या खिशात...
नाही चिडणार रे मी दोस्ता...
