संघर्ष धान्य बँकेकडून विश्व कल्याण सेवाभावी संस्थेला धान्य व किराणाची मदत
गेवराई प्रतिनिधी
कोरोणाच्या लाटेमध्ये अनेक कुटुंबे बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. मोठी दुकाने बंद आहेत परंतु त्यांचे मालक तग धरून आहेत. छोटे व्यवसायिक उधार उसनवारीने कसेबसे आपले दिवस पुढे रेटत आहेत. जे रोज दारावर जाऊन वस्तू विकतात अशा भटक्या लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गल्ल्या बंद आहेत, दारे बंद आहे. सरासरी कुणी कुणाच्या वस्तूला हात लावायला धजावत नाही. परिणामी उपासमारीची पाळी या लोकांवर येत आहे. शहराबाहेर पाल करून राहणार्या वस्त्या अगोदरच दुर्लक्षित आहेत.या काळात यांच्याकडे व्यवसाय नाही. गावात घर नाही आणि शिवारात शेत नाही आणि कोणी ओळखतही नाही. फक्त हस्तकलेने वस्तू तयार करून बाजारात विक्री करणे हा यांचा व्यवसाय. परंतु बाजार बंद आहे ते वस्तू विकत नाहीत. उत्पादनाचे साधनच बंद आहे. खायचं काय हा एकच प्रश्न यांच्या समोर आ वासून उभा आहे.
विश्वकल्याण सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किस्किंदाताई पांचाळ यांनी बीड शहराच्या बाहेर जाऊन त्यांची चौकशी केली तेव्हा वास्तव समोर आले. लेकरं बाळं कसेतरी भीक मागून जगतवतोय सध्याला भिकही कोणी वाढत नाही. कधी कधी पाणी पिऊन पुढच्या दिवसाची आशेने वाट पाहावी लागत आहे.अतिशय विकट अवस्थेतून हा समाज आला दिवस पुढे ढकलत आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटना आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून विश्वकल्याण सेवाभावी संस्थेने या पालावरच्या लोकांना दररोज जेवण देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. दररोज तीनशे माणसांचा कुटुंबकबिला ही संस्था चालू लागली आहे. फेसबुकच्या माध्यमातून विश्व कल्याण सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा किस्किंदा पांचाळ यांनी मदतीची हाक दिली. संघर्ष बँकेने या हाकेला साद घालत आज या पालावरच्या लोकांच्या जेवणासाठी *एक क्विंटल धान्य व दोन हजार रुपयांचा किराणा* किस्किंदा ताई पांचाळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तीनशे माणसांचा स्वयंपाक करण्यासाठी दररोज 20 माणसे झटत आहेत. काहीजण सेवाभाव म्हणून मदत करत आहेत तर काही तुटपुंजा पगारावर हे काम करत आहेत. लॉकडाउन संपेपर्यंत त्यांचा हा अन्नदानाचा यज्ञ चालू राहणार आहे. सर्वांनी या महत पुण्याच्या कामासाठी मदत करणे गरजेचे आहे. ज्यांची ओंजळ भरलेली आहे त्यांनी सांडयच्या आत वाटायला शिकलं पाहिजे. कारण सांडून वाया जाण्यापेक्षा कोणाच्यातरी मुखात जाऊन जीवदान मिळणार आहे. कोरोणाच्या काळात आपल्याला माणसं जगवायची आहेत. त्यांना अन्नाबरोबरच हिंमतही द्यायची आहे. किस्किंदाताई पांचाळ सारख्या समाजधुरीणी यासाठी पुढे आलेल्या आहेत आपण त्यांना मदत करून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. असे आव्हान संघर्ष धान्य बँकेच्यावतीने करण्यात येत आहे.
याप्रसंगी संघर्ष धान्य बँकेचे शिवाजी झेंडेकर प्रहार शिक्षक संघटनेचे सुधाकर राऊत विश्व कल्याण सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा किस्किंदा पांचाळ, समाधान पांचाळ, अक्षय डहाळे इत्यादी उपस्थित होते.