पोटासाठी नाचणाऱ्या तमाशा कलावंताची उपासमार: शासनाने अर्थ साहाय्य द्यावे.. डॉ.देवदत म्हात्रे
बीड (प्रतिनिधी)कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे तमाशा फडाची फड फड सुरू असून या तमाशा कलेवर पोट असलेल्या कलावंतांची उपासमार होत आहे, राज्य शासनाने या तमाशा कलावंतांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी चित्रपट निर्माते व लेखक डॉ. देवदत्त म्हात्रे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलतांना डॉ.म्हात्रे म्हणाले की, पूर्वीच्या काळी तमाशा ही एकमेव कला ग्रामीण भागात लोक रंजनाचे साधन होते,पूर्वी तमाशा पारावर टेंभ्याच्या प्रकाशात ध्वनीक्षेपकाशिवाय होत असत.
नंतर तो कणातीत आला आणि पुढे नाट्य, नंतर चित्रपटात आला.सांगते ऐका,सवाल माझा ऐका, गाण्यानं घुंगरू हरवलं ते पिंजरा,अलीकडचा नटरंग मधून प्रेक्षकांनी तमाशा डोक्यावर घेतला.तमाशामध्ये गण,गवळण,रंगबाजी,झगडा,सवाल जबाब वग या सर्व प्रकारातून रसिकांची मने रिझवितो.
सुरवातीला गण, नंतर गवळण,
झगडा,सवाल जबाब,शेवटी रात्रभर वग.असा हा तमाशा असतो. महाराष्ट्रातील लोककला असलेल्या या तमाशाला अलिकडे उतरती कळा लागली आहे. डिजीटल युग जरी असले तरी तमाशा या लोककलेवर प्रेम करणारी रसिक मंडळी आजही आहेत.
गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांची फड फड सुरू आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमुळे खेळ बंद आहेत,तमाशा कलेवर अवलंबून असणाऱ्या कलावंतांची उपासमार होत आहे.आजपर्यंत ज्या कलेने ग्रामीण भागात लोकांचे मनोरंजन केले सोंगाड्या, मावशी ,जल्लाद होऊन हसविले आज त्यांच्यावर लॉकडाऊनमुळे रडण्याची वेळ आली आहे. नर्तिका जेंव्हा ' लाज धरा पावन,जनाची मनाची,
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची'असे म्हणत आपले नृत्य सादर करते, तेंव्हा प्रेक्षक डोक्यावरील फेटे,टोप्या उडवत पैसे उधळत असत .पण गेल्या दोन वर्षापासून पै पैयीला मोताज झालेल्या या लोककलेतील नृत्यांगनाची पर्वा कुणालाच नाही.
