संत सेना महाराज : भक्ती व सेवाभावाचे सुवर्णपदक
मध्य प्रदेशातील बांधवगड निसर्गाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव. विक्रम संवत १३५७ च्या वैशाख वैद्य द्वादशीच्या पवित्र रविवारी, येथे एका घरात नव्या सूर्योदयासारखी एक दिव्य कळी उमलली. नाव ठेवले सेना. वडील देविदास राजदरबारी न्हावी; माता प्रेमकुवर साधी, भक्तिमय स्त्री. साधारण उपजीविकेचा हा संसार मात्र रामभक्तीच्या सुवासाने सदैव सुगंधित असे.
लहानपणापासूनच सेनाजींच्या अंतःकरणात भक्तिभावाची बीजे रोवली गेली. वडिलांचे गुरु, सद्गुरु रामानंद, एकदा त्यांच्या घरी आले. प्रेमपूर्वक आदरातिथ्य करताना देविदास व रामानंदांमध्ये चाललेली ईश्वरभक्तीवरील चर्चा सेनाजींनी तन्मयतेने ऐकली. गुरूंनी काही प्रश्न विचारले, आणि या बालकाच्या ओजस्वी व योग्य उत्तरांनी प्रभावित होऊन त्यांना रामनामाची मंत्रदीक्षा दिली. त्या क्षणापासून सेना हे नाव ‘रामभक्त सेना’ म्हणून उजळले.
काळ पुढे सरकला. आई-वडिलांच्या निधनानंतर सेनाजींनी पारंपरिक व्यवसाय सांभाळला, पण हृदय मात्र सदैव संतसंगती, अभंगरचना आणि पोथीवाचनात रंगलं होतं. त्या काळी वीरसिंह राजा गादीवर होता. सेनाजींचा लहानपणीचा सवंगडी.
एके दिवशी, सेनाजींच्या घरी संतांचा मोठा मेळावा भरला होता. पत्नीसमवेत त्यांनी सर्व संतांचे प्रेमपूर्वक स्वागत केले. याच वेळी, राजाला हजामत हवी होती. राजवाड्यातून बोलावणी आली, पण सेनाजींनी ठाम सांगितले. “संतसेवा पूर्ण झाल्यावरच मी येईन.”
दरबारी चापलूसांनी राजाकडे चुकीची माहिती पोहोचवली. क्रुद्ध होऊन राजाने शिक्षा देण्याचा आदेश दिला. पण त्या क्षणीच चमत्कार घडला. सेनाजी राजाच्या समोर हजर झाले. त्यांनी हजामत सुरू केली आणि राजाला आरशात स्वतःचा चेहरा नव्हे तर साक्षात पांडुरंगाचे रूप दिसले. पाण्यातही तेच प्रतिबिंब झळकले. त्या क्षणी राजाचे अंतःकरण आनंद, श्रद्धा व भक्तिभावाने ओथंबून आले. आजारपण नाहीसे झाले, शरीरात नवचैतन्य संचारले.
नंतर सेनाजी खरोखरच राजवाड्यात आले, तेव्हा राजा अचंबित झाला. “तुम्ही तर आत्ताच सेवा करून गेलात!” हकीकत कळल्यावर राजाला उमगले की, स्वतः पांडुरंगाने सेनाजींच्या रूपाने त्यांचे रक्षण केले होते. कृतज्ञतेपोटी राजाने सोन्याच्या मोहोरांचा बहुमान अर्पण केला.
संत सेना महाराजांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण भगवंताच्या सेवेत व समाजाच्या कल्याणात अर्पण केला. त्यांचे जीवन सांगते. सेवा हीच खरी साधना, आणि भक्ती हीच खरी संपत्ती. संत जनाबाईंच्या ओव्या आजही आपल्याला आठवण करून देतात.
“सेना नाव्ही भला, त्याने देव भुलविला.”
आजच्या युगात, स्वार्थ व अहंकाराच्या गर्दीत, सेनाजींचे चरित्र आपल्याला सांगते. ज्याच्या अंतःकरणात नम्रता, सेवाभाव आणि भक्ती आहे, त्याच्यापुढे स्वतः ईश्वरही नतमस्तक होतो.
लेखक
श्री स्वप्निल चंद्रकांत शिंदे
