महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

उत्तम हजारे - ग्रामीण पत्रकारितेचा आधारवड

उत्तम हजारे - ग्रामीण पत्रकारितेचा आधारवड 

     त्यांनी स्वतः संघर्ष करून, बहुजन चळवळीतल्या संघर्षाला बातमीच्या माध्यमातून आकार दिलाय. त्यांच्या जगण्याच्या अभिनव पद्धतीचा हेवा वाटावा, एवढी ती वैखरीची वाट बिकट होती. त्या, वाटेला तुडवून त्यांनी बातमीच्या पानावर स्वतःला झोकून दिले. एका लहानशा गाव खेड्यातून आलेल्या या स्थितप्रज्ञ माणसाने जिल्हा पातळीवर विविध वृत्तपत्राचा बातमीदार म्हणून काम केले. शहरातील माणसांना आपलेसे करून, पाॅझिटिव पत्रकारिता केली. समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्यांना शब्दांचे बळ दिले. बाबासाहेबांनी मुकनायकाच्या माध्यमातून लोक जागृती केली. समाजला सजग केले. याच पाऊलवाटेने जाऊन, उत्तम हजारे यांनी "बाबांच्या" लेखणीचा आधार आणि आदर्श घेतला. त्यांच्या पत्रकारितेला पस्तीस वर्ष झाली. वामनमुर्ती असलेल्या, या पत्रकार मित्राने ग्रामीण भागातील पत्रकारांना उभे करण्यासाठी पाठबळ दिले आहे. त्यांना मार्गदर्शन केले आहे. कसलीही आदळआपट न करता, संयम ठेवून काम केले आहे. त्यांच्या वाणीतल्या गोडव्याने, त्यांच्याच कर्तृत्वावर "उत्तम" अशी मोहर उमटली आहे. ग्रामीण पत्रकारितेचा आधारवड म्हणून ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांच्या यशस्वी प्रवासाने मराठवाड्यातल्या जर्नालिझम हिस्ट्रीत एक सोनेरी पान तयार झाले आहे. एक चांगला मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार म्हणून उत्तम हजारे यांची कारकिर्द उर्जा देणारी राहीली आहे. त्यांच्या विषयी असलेल्या प्रेम भावनेतून, त्यांच्याच साडेतीन दशकाच्या कार्य कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध, हे शब्द पुष्प..! 

  उत्तम हजारे बीडचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. सिरसमार्ग ता. गेवराई जि.बीड चे भूमिपुत्र आहेत. सिंदफणा नदीच्या काठावर त्यांच बालपण गेलय. आई-वडीलांचे काबाडकष्ट, गरीबीचे सहन केलेले चटके त्यांनी पाहिलेत.    गावातच, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवलेत. 
सिंदफणेच्या अंगा खांद्यावर खेळून बीड सारख्या मोठ्या शहरात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. काॅलेजात असतानाच, त्यांना साहित्याची आवड निर्माण झाली. ते कविता करायचे. समकालीन विषयावर लिहायचा प्रयत्न करायचे. बलभीम महाविद्यालयाच्या परिसराने त्यांच्या "उत्तम" संस्कार केलेत. 
  उत्तम हजारे निगर्वी पत्रकार आहेत.
बातमीच्या धर्माला जागून काम करणारे आहेत. जिथे काम करायची मिळाली, त्या ठिकाणी इमानदारीने काम केले. आड पडदा न ठेवता बातमीला शाश्वत आकार देण्याची भूमिका पार पाडली. बहुजन समाजातल्या तरूण पत्रकारांना मार्गदर्शन केले आहे. जे त्यांच्या संपर्कात आले. अशा, सर्व पत्रकारांना त्यांनी बातमी मूल्य शिकवले आहे. 
 दै. लोकशा सारख्या मोठ्या वृत्तपत्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे. ते तिथे रमलेत. संपादकाचा विश्वास मिळवला आहे. एवढेच नाही, बंब कुटुंबातल्या परिवारात स्वतःची विश्वासार्हता निर्माण केली आहे. वाणीवर ताबा असलेले ते पत्रकार आहेत. जिभेचा मणका ताठ आहे. म्हणूनच, इथपर्यंत आलेत. सोपी गोष्ट नाही.
   नवलाई म्हणजे, पती, पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले एकाच महाविद्यालयात शिकली आहेत. ज्यांनी दारिद्र्य पाहिले, अनुभवले, त्या हजारे परिवाराला सुखाचे दिवस पाहायला मिळालेत. द सिक्रेट पुस्तकातला राॅन्डा नावाचा विचारवंत सांगतो की, तुमचा भुतकाळ, तुमच्या वर्तमान काळात "संचित" म्हणून उभा राहतो. उत्तम हजारे यांनी हालअपेष्टा सहन करून, आनंदाने पत्रकारिता केली. वैखरीच्या वाटा तुडवून, कुटुंबाचा गाडा पती-पत्नीने चालवला. त्यांची पत्नी मोची- पिंपळगाव ता. माजलगाव जि.बीड येथील आहे. त्या उच्चशिक्षित आहेत.  प्रतिकूल परिस्थितीत कुटुंब चालवले. मुलांना शैक्षणिक प्रवाहात मार्गदर्शन केले. मुले मोठी झाली. एक मुलगा डॉक्टर झालाय. मुलगी उच्च शिक्षण घेत आहे. 
   उत्तमराव सांगतात, बदल हवा, या धाटणीची पत्रकारिता करायला हवी. पत्रकारांनी, सर्वार्थाने बदलाचा साक्षीदार व्हावे, समाजात सकारात्मक बीजारोपण करीत राहावे. बातमीच्या माध्यमातून 
वंचित घटकाच्या मागे उभे राहावे, असा आग्रह त्यांनी नेहमीच ठेवला आहे. त्यांच्या लाडक्या लेकी बद्दल ची कहाणी ऐकून माणसं आणखी त्यांच्या प्रेमात पडतात. दै. पुढारीचे जिल्हा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्याच दरम्यान, परळी जि.बीड येथील स्त्री-भ्रूण हत्या प्रकरण बाहेर आल्याने, महाराष्ट्र हादरला होता. गर्भातच मुलींचा जीव घेतला जातो. त्यामुळेच, बीड जिल्ह्य़ात मुलींचा जन्मदर कमी होत असल्याचे दिसून आले. संवेदनशील माणसांना गहिवर आला. चीड निर्माण झाली. त्याच विषयाच्या माध्यमातून, 
उत्तमरावांनी, हा गंभीर विषय ; बातीमीच्या माध्यमातून आणखीन लावून धरला. समाजात चर्चा घडवून आणली. दै. पुढारी सारख्या राज्य पातळीवरच्या वृत्तपत्रात, स्त्री भ्रूण हत्या प्रकरण पानभर छापून आणले. महिनाभर वृत्त मालिका सुरू ठेवून, वाचकांना या प्रश्नावर विचार करायला भाग पाडले. मुलगीच खरा आधार असताना, गर्भातच मुलींचा जीव घेतला जातोय. उत्तम हजारे, या प्रकरणाने आतून अंतर्मुख होत गेले.  एक तरी मुलगी व्हावी, अशी मनोमन इच्छा व्यक्त केली. इश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांना एक गोड मुलगी आहे. लाडाच्या लेकीवर त्यांचा भलता जीव आहे. उत्तम हजारे कुटुंबवत्सल आहेत. संवेदनशील पत्रकार आहेत. मितभाषी आहेत. मोजकेच बोलतात. समाजाला उपयोगी पडणारे विषय लावून धरतात. नव्या पत्रकारांना विषय सुचवतात. प्रदीर्घ अनुभव गाठीशी आहे. एक भूमिपुत्र म्हणून, हजारे यांनी गेवराई जि.बीड च्या पत्रकारांशी कायम संवाद ठेवला. या परिसरातील प्रश्नांना ऐरणीवर आणले. सामाजिक, राजकीय चळवळीत भूमिका पार पाडली. लोकशाहीला नेहमीच पाठिंबा दिला. गोरगरीबांचा कैवार घेऊन, त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले. हेतू न ठेवता पत्रकारिता धर्म सांभाळून काम करणारे उत्तमराव, अनेका पक्ष - संघटनेतल्या कार्यकर्त्यांचे चांगले मित्र म्हणून वावरलेत. 
   दै. नवाकाळ, पुढारी, पुण्यनगरी, झुंजार नेता, सम्राट , दै. लोकाशा आदी दैनिकांच्या पानावर स्वतःची ओळख उभी केली. उत्तम हजारे यांना अग्रलेखाचे बादशहा निळूभाऊ खाडिलकर, पदमश्री डॉ प्रतापसिंह जाधव, मुरलीधर बाबा शिंगोटे, मोतीरामजी वरपे, बबनराव कांबळे सारख्या प्रतिभावान माणसांचा सहवास लाभला. छापलेले सत्य असते. यावर, वाचकांचा आजही विश्वास; त्या विश्वासाला पात्र राहता आले. हे, उत्तम हजारे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष म्हणावे लागेल. तीन - साडेतीन दशकाचा, हेवा वाटावा असा त्यांचा प्रवास राहीला आहे. एवढ्या मोठ्या कालखंडात त्यांनी विशेष लेख, वृत्त विशेष, संपादकीय पानावरचे लेख, कथा, कविता, वृत मालिका, बातमीच्या मागे दडलेली बातमी, असे असंख्य विषय पुढे आणले. बातमीचा शेवट करेपर्यंत ते थांबले नाहीत. समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत बातमीला घेऊन गेले. खर म्हणजे, ते मवाळ वादी आहेत. मात्र, स्त्री-भ्रूण हत्या प्रकरणात त्यांनी केलेली बातमीदारी, त्या विषयावर केलेले चिंतन, पिच्छा, पाठपुरावा
नव्या पिढीतल्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक पान आहे. तुम्ही पत्रकार आहात. म्हणजे, नेहमीच आक्रमक असावे. याची गरज नसते. हे उत्तमरावांनी दाखवून दिले.  
स्थितप्रज्ञ राहून ही तुम्ही , तुमच्या ध्येयापर्यंत जाऊ शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे उत्तम हजारे..! अल्वीन टाॅपलर म्हणायचे, पत्रकारांनी समाजाची यंत्र शक्ती म्हणून काम करावे. या अर्थाने, ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांच्या पत्रकारितेकडे पाहता येईल. मला ही, त्यांचा सहवास लाभला. अगदीच प्रतिकूल काळात त्यांनी मार्गदर्शन केले. चार हिताच्या गोष्टी सांगितल्या. 
शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले उत्तमराव, आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर मोठे झाले. विचाराचा वारसा जोपासून चालत राहीले. विचाराची श्रीमंती लाभलेल्या, या भल्या माणसाने आर्थिक परिस्थितीशी दोन हात केलेत. स्वाभिमानाची पत्रकारिता केली. शब्दांची श्रीमंती खिशात घेऊन, बातमीची मुशाफिरी करणारे असंख्य पत्रकार बा- महाराष्ट्राने अंगाखांद्यावर जपले आहेत. त्या मध्ये उत्तम हजारे यांच्या सारख्या बहुजन घटकातल्या पत्रकाराचा उल्लेख होतो म्हणजे, मोठी गोष्ट आहे. त्यांनी, मनाला समाधान लाभेल, अशी पत्रकारिता केली. पत्रकारितेने त्यांच्या प्रतिभेला उंचीवर नेले आहे. बातमीच्या माध्यमातून जीवनसत्व पेरलीत. 
त्यांच्या कर्तृत्वाचा मुला-बाळांना आशीर्वाद लाभला. मुलगा डॉक्टर झालाय. एक वेळ, उत्तमरावांनी एक वेळ आर्थिक अडचणीशी सामना केला. डॉक्टर झालेल्या मुलाने, पंच्याहत्तर हजार एवढ्या मोठ्या रक्कमेचा पहिला पगार समाजाच्या पायावर ठेवला. या बांधिलकीने हजारेंच्या कुटुंबाला कर्तृत्वाचे झुंबर लागलेत. पैसा नसतो तेव्हा समाजाचा आधार घेतला जातो. हाती पैसा -आडका आला की, समाजाला विसरणारी पिढी सुद्धा अवतीभोवती दिसते. मात्र, हजारे कुटुंब अपवाद ठरले. समाजाचे आपण देणं लागतो. ही जाणीव ठेवून, नवा आदर्श ठेवणारे  उत्तमराव हजारे आणखी मोठे झालेत. 
     उत्तमरावांनी, पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना, पुरोगामीत्व जपले आहे. सकल जीवनाला आकार देणारी पत्रकारिता केली आहे. त्यामुळेच, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रतिष्ठा लाभली आहे. त्या प्रतिमा आणि प्रतिभेला जपा.
 या पुढे ही, ते लोकजागृती  करून, कर्तव्य पार पाडत रहा. अशी अपेक्षा आहे. त्याच धाटणीतला तुमचा स्वभाव आहे. कवी हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलय, बैठ जाता हूं मिट्टी प्रत्येक अक्सर, क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगते है...!

सुभाष सुतार, पत्रकार,
गेवराई-बीड