वैर ठेवू नका, निवडणूक झाली- गेली..!
ग्रामपंचायतीचा सरपंच गावचा "विठ्ठल" असतो - आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील
गेवराई प्रतिनिधी
आपल्या हक्काचा माणूस म्हणून काम करण्याची दिलेली संधी ओळखून, नवनिर्वाचित सरपंच-सदस्यांनी ग्रामपंचायतीचा नावलौकिक वाढवून काम चांगले करावे. गावातला खरा "विठ्ठल" सरपंच असतो. गावात एखादा माणूस उपाशी राहून दिवस मोजत असेल तर मग सरपंचाला झोप कशी लागते ? असा सवाल उपस्थित करून, ग्रामीण भाग विकासापासून दूर असल्याची खंत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी येथे व्यक्त केली. 16 जानेवारी रोजी गेवराई तालुक्यातील किनगाव येथील ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच उपस्थित होते.पेरे पाटील यांनी आपल्या खास ग्रामीण खुमासदार शैलीत तासभर व्याख्यान देऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन करून सोप्या शब्दात विकासाची संकल्पना स्पष्ट करून सांगितली. ते म्हणाले की,
देश बदलतोय, एक सरपंच दुसर्या सरपंचाचे ऐकायला येतोय ही चांगली गोष्ट आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. मला गावाने पंचवीस वर्ष सरपंच पदावर बसविले. काम अवघड आहे मात्र जबाबदारीने काही गोष्टी शक्य करता येतात. आज रोजी, माझ्या गावात आठशे घरे आहेत. दरवर्षी बेचाळीस ,लाख रुपये करातून येतात. गावाला सगळ्या सुविधा देऊन ही आठ लाख रू शिल्लक राहतात. चार प्रकारचे पाणी दिले जाते. गरम पाण्याची वेगळी सोय आहे. गावात नारळाची दोन हजार झाडे आहेत. स्वच्छता आहे. दळण - कांडण मोफत आहे. महिलांना वर्षभर नॅपकिन मोफत दिली जाते. फळांच्या झाडांचा फायदा लहान मुलांना होतो. आता,
महाराष्ट्रात फिरतोय तर लोकांना वाटते कामे झाली पाहिजेत. नवनिर्वाचित सरपंचाने ॲक्टिव व्हायला हवे, असे सांगून ते म्हणाले, माणसांचे
आयुष्य कमी झाले आहे. त्याला सरपंच जबाबदार असून, गावात स्वच्छताच नाही. पाणी नाही, झाडे नाही. परिसरातल्या घाणीने रोग पसरतात, हे सूत्र लक्षात घेण्याची गरज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी भास्करराव पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास किनगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.