महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने गेवराईत 'दर्पणदिन' सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा !
गाईंना चारा तर अनाथालयातील मुलांना ब्लॅंकेट वाटप
गेवराई, (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गेवराई तालुका शाखेच्या वतीने ६ जानेवारी रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी 'दर्पण दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील चिंतेश्वर मंदिर संस्थानातील गो-शाळेत गाईंना चारा वाटप तर बालग्राम सहारा अनाथालयातील १२७ चिमुकल्यांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईशी संलग्न असलेल्या गेवराई पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यावर्षीही ६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ (दर्पणदिनी) गेवराई येथील चिंतेश्वर मंदिर संस्थानातील गो-शाळेत गाईंना चारा वाटप करण्यात आला. तर सायंकाळी बालग्राम सहारा अनाथालयातील १२७ चिमुकल्यांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तुळशीराम महाराज आतकरे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब घोडके, सहारा अनाथालयाच्या संचालिका सौ. प्रीती संतोष गर्जे, आंधळे सर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे यांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी बीड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक दिव्य लोकप्रभाचे उपसंपादक काझी अमान यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. पत्रकार संघाच्यावतीने विभागीय उपाध्यक्ष सुनील पोपळे व मार्गदर्शक शिवाजी मामा ढाकणे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीड राज्यकर्ताचे संपादक अमोल वैद्य व प्रा.रामहरी काकडे यांनी तर आभार प्रदर्शन दैनिक सामनाचे प्रतिनिधी व संघाचे शहराध्यक्ष प्रदीप जोशी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेवराई तालुका पत्रकार संघाचे सचिव तुळशीराम वाघमारे, उपाध्यक्ष राजेंद्र नाटकर, भागवत देशपांडे, कार्याध्यक्ष अनिल आगुंडे, सहसचिव सचिन नाटकर यांच्यासह दत्तात्रय लाड, सुदर्शन देशपांडे, सिद्धांत मोरे, सय्यद कौसर, अरविंद कुलकर्णी, ज्ञानेश्वर जाधव, नितीन वाकडे, वाल्मीक कदम, अकबर शेख, गणेश वीर, सुमेध करडे आदी पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.