जिल्हा बँकेचे ऊस कापणी यंत्रासाठी (हार्वेस्टर) एक कोटी पर्यंत कर्ज देण्याचे सुधारीत धोरण जाहीर; माजी आ.मुरकुटे
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने शेतकरी सभासदांना ऊस कापणी यंत्रासाठी (हार्वेस्टर) कारखाना हमीवर २ इनफिल्ड ट्रान्सपोर्टरसह हार्वेस्टरच्या किंमतीच्या ७० टक्के किंवा कमाल रुपये एक कोटी पर्यंत कर्ज देण्याचे सुधारीत धोरण जाहीर केले असून सभासद शेतकर्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले आहे.
यासंदर्भात माहिती देतांना श्री.मुरकुटे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अनेक शेतकरी सभासदांनी ऊस हार्वेस्टरसाठी कर्ज द्यावे, अशी मागणी केली होती. त्यावर संचालक मंडळाने ऊस कापणी यंत्राला (हार्वेस्टर) कर्ज वाटप करण्याचे सुधारीत धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार शेतकरी सभासदास प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत कारखाना हमीवर मशिन व दोन इनफिल्ड ट्रान्सपोर्टरच्या किंमतीच्या ७० टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये एक कोटी पर्यंत ११ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्हा बँकेकडून ७० टक्के कर्ज, तर ३० टक्के लाभधारकास स्वगुंतवणूक करावी लागणार आहे.
सदरच्या कर्ज धोरणानुसार सभासदाकडे तारण म्हणून किमान १० एकर बारमाही बागायत किंवा २५ एकर हंगामी बागायत जमीन असणे आवश्यक आहे. कर्ज उपलब्धतेसाठी कारखाना हमी देणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार कारखाना, सोसायटी आणि जिल्हा बँक यांच्यात रुपये शंभरच्या स्टॅम्पपेपरवर नोटरी नोंदणीकृत करावी लागणार आहे. सदर कर्जाची फेड ७ वर्षे मुदतीत ७ हप्त्यांमध्ये पुढीलप्रमाणे करावी लागणार आहे. पहिला हप्ता १५ टक्के, दुसरा हप्ता २० टक्के, तिसरा हप्ता २० टक्के, चौथा हप्ता २० टक्के, पाचवा हप्ता १५ टक्के, सहावा हप्ता ५ टक्के आणि सातवा ५ टक्के याप्रमाणे सुधारीत धोरण जाहीर केले असून सभासद शेतकर्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, तसेच याबाबत सविस्तर माहितीसाठी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री.मुरकुटे यांनी केले आहे.