वसतिगृहे संस्कार केंद्रे बनावीत ;राधाकिसन देवढे
शंभूक वसतिगृहात शैक्षणिक साहित्य वाटप
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :
बहुजन शिक्षण संघाच्या शंभूक विद्यार्थी वसतिगृहाचा आदर्श घेऊन इतरही वसतिगृहे संस्कार केंद्र बनावीत अशी अपेक्षा सहाय्यक समाजकल्याण आयुक्त तथा अहमदनगर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.
श्रीरामपूर येथील शंभूक विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप देवढे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त व सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम.डी. सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संघाचे निबंधक व्ही. एम. बैचे, ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, वसतिगृह अधीक्षक व संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब भोईटे, टायगर फोर्सचे संजय रूपटक्के, प्रा. सुनील वाघमारे, भीमराव जाधव, जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, दादासाहेब बनकर, निवृत्ती पगारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे, परिवर्तन फाऊडेशनचे गोरख आढाव, प्रा. राऊत आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. देवढे व इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग, वह्या पुस्तके, कंपास, टॉवेल व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कविता दिवे यांचा देवढे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
शंभूक विद्यार्थी वसतिगृहाच्या कामकाजाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना सहाय्यक आयुक्त देवढे म्हणाले की, याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील व डोळ्यातील तेज पाहून या वसतिगृहाच्या कामाचा व गुणवत्तेचा दर्जा अनुभवास येतो . दिवंगत दादासाहेब रुपवते यांच्या परिश्रमातून सुरू झालेल्या या वसतिगृहामध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले जात आहेत. या व इतर वसतिगृहांचा दर्जा उंचावण्यासाठी समाज कल्याण विभाग सदैव प्रयत्नशील आहे. ज्या ठिकाणी काही त्रुटी आढळतील अशा वसतिगृहांचा दर्जा व कामकाज सुधारण्यासाठी संधी देण्यात येईल. इतर सर्व वसतिगृहांनी देखील शंभूक विद्यार्थी वसतिगृहाचा आदर्श घेऊन आपलीही वसतिगृहे संस्कार केंद्र कसे होतील? यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देवढे यांनी यावेळी केले. अशोक दिवे यांनी प्रास्ताविक करताना वसतिगृहाच्या कामकाजाची माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी बैचे, सोनवणे, साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. सिद्धार्थ दिवे यांनी आभार मानले.