एकाच आठवडय़ात पार पडल्या तीन अवघड शस्त्रक्रिया
गेवराई उपजिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना मिळतोय आधार..!
गेवराई प्रतिनिधी
: येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सर्जन डॉ. महादेव चिंचोळे यांच्या नेतृत्वाखाली तीन रुग्णांवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून, कोविड काळात आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या नागरिकांना "हायटेक उपचार" मिळू लागल्याने गोरगरीब, गरजू रुग्णांना आधार मिळू लागला आहे.
गेवराई शहरात राष्ट्रीय महामार्गावर पन्नास खाटाचे अद्ययावत "गेवराई उपजिल्हा रुग्णालय" असून, येथे ट्राॅमा केअर सेंटरची उपलब्धता आहे. गेल्या आठवडय़ात, शुक्रवार ता. 8 जुलै रोजी उमापूर ता. गेवराई येथील शांताबाई बाबुराव कापसे (65) यांना पोटदुखीचा त्रास होत होता म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनोग्राफी च्या चाचणीनंतर त्यांना ॲपेन्डीक्स डिसिज असल्याचे निदान झाले होते. रुग्णाला होत असलेला त्रास लक्षात घेऊन, कापसे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. अतिशय अवघड असलेली ही शस्त्रक्रिया डॉ. महादेव चिंचोळे यांनी यशस्वीपणे केली. रुग्णालयाचे भूलतज्ञ डॉ. राजेश शिंदे , डॉ. सराफ, डॉ. रांदड यांच्यासह रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा ही या मध्ये सहभाग होता.
मंगळवार ता. 12 जूलै गेवराई शहरात शिवाजी नगर प्रभागात राहणारे सुनिल कोंडिबा साबळे ( 35 ) यांच्या बेंबी जवळ मोठी गाठ होती. पोट रिकामे असताना त्यांना प्रचंड वेदना सहन करावी लागायची. साबळे यांना हार्निया डिसिज असल्याचे निदान झाल्यावर, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. संगिता उदरभरे,धोंडराई येथील महिलेच्या डाव्या हातावर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान,
रुग्णालयातले शस्त्रक्रिया गृह (ओटी) अद्यावत करण्यात आले असून, या रुग्णालयात गरजेनुसार लहान-मोठ्या शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, आवश्यक असेल तेव्हा बाळंतपणा साठी आलेल्या महिलांसाठी तातडीने सिझर केले जात आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याने परिचीत झालेले सर्जन महादेव चिंचोळे, डॉ. राजेश शिंदे, डॉ. रांदड, डॉक्टर काकडे
यांच्या देखरेखीत अशा शस्त्रक्रिया तातडीने करण्यात येतात. खाजगी रुग्णालयात सिझर साठी तीस ते पन्नास हजार रू खर्च येतो. मात्र, गोरगरीब समाजातील घटकांना एवढा खर्च परवडत नाही. त्यामुळे, अशा रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाचा आधार मिळू लागला आहे.
रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ, हाडाचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. नवजात बाळाची काळजी घेणारे बालरोग तज्ज्ञ ही या रुग्णालयात कार्यरत असल्याने गेवराई तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होऊ लागली आहे.