पावसाची रिपरिप..!
पाच दिवसापासून सुर्य दर्शन नाही, पिकांची वाढ खुंटल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला
गेवराई प्रतिनिधी
: गेल्या पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आभाळ भरून आल्याने, सूर्य दर्शन होऊ शकले नाही. दरम्यान,
गेवराई तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने एकीकडे पिकांना फायदा होत असला तरी सूर्य दर्शन नसल्याने पिकांना पोषक वातावरण नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पिकांची वाढ खुंटली असून, रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. नदी नाले वाहू लागले आहेत. गाव तलाव, पाझर तलावात पाणी आले आहे.
गेवराई तालुक्यात एकूण १ लाख ४७ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. तालुक्यात पेरणी लायक १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र असून गेवराई परीसरात मादळमोही , चकलांबा , रेवकी , तलवाडा , घाँडराई , पाचेगाव , उमापूर , जातेगाव , सिरसदेवी, पाचेगाव, सिसरमार्ग परीसरात चांगला पाऊस झाला आहे. तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रात ऊस आणि कापुस लागवडीवर भर असतो. या वर्षात ही तेच चित्र दिसतेय. उलट ऊस उत्पादक शेतकरीवर्ग वाढलाय. नगदी आणि त्यामानाने कमी मेहनत म्हणून त्याकडे पाहिले जाते.
यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झालेला आहे. पिके वाढू लागल्याचे चित्र असून, काही ठिकाणी पेरणी व्हायची आहे. पावसाची अशीच रिपरिप सुरू राहील्यास पेरता येणार नाही. तसे झाल्यास पेरणी शिवाय राहीलेल्या शेत जमीनीवर ज्वारी, गहू, हरभरा पेरता येईल.
तालुक्यात खरीप हंगामात जवळपास ९ ० हजार हेक्टरवर पेरणी होते. यंदाच्या हंगामात
गेवराई परीसरात कपाशी , तूर , बाजरी , सोयाबीन, मटकी, मूग, आदी पिकांचा पेरा झाला आहे. मात्र , पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने पेरले ते उगवते की नाही, अशी स्थिती होती. काही ठिकाणी पिकांनी डोके वर काढायला सुरुवात केली होती. अशा पिकांना तात्काळ पाण्याची गरज होती. आधीच कडक ऊन होते. त्यामुळे, जमिनीत उष्णतामान होते. काही शेतकरी चांगला पाऊस होईपर्यंत थांबले होते. अजून ही रान शिवार निटनाटके करण्याची घाई केली जात आहे. यावर्षी सुरुवातीलाच पावसाने आशा पल्लवित करून, शेतकऱ्यांना पेरते व्हा, म्हणून संदेश दिला होता. दोन दिवस जोरदार पाऊस पडला. शेतकऱ्यांनी उत्साहात पिकांची पेरणी केली आहे. या वर्षी ही ऊस आणि कापुस लागवडीवर भर दिलेला आहे. अचानक, पाऊस थांबल्याने, शेतकरी हतबल झाला असून नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. अखेर, दमदार पाऊस पडू लागला असून, पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे.