केरळ येथील राष्ट्रीय शिबिरातील सहभागाबद्दल राहुल गायकवाडचा सत्कार
गेवराई, दि. २४ (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक राहुल गायकवाड हा नुकताच केरळ येथील मार बेसलियोस ख्रिश्चन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कुट्टीकनाम, ता. इडुकी, जि. कोट्टायम येथे संपन्न झालेल्या सातदिवसीय राष्ट्रीय स्तरावरच्या नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प २०२२ मध्ये सहभाग घेऊन परतला आहे. राष्ट्रीय शिबिरातील सक्रिय सहभाग, त्याचबरोबर शिबिरात विधायक कार्यक्रमात त्याने घेतलेल्या निर्णयांमुळे त्याचे उठावदार व्यक्तिमत्व सर्व शिबिरार्थींना भावले. त्याच्या सहभाग आणि समाजाप्रती उत्तरदायित्वासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या हस्ते राहुल गायकवाडचा सत्कार करण्यात आला.
राहुल गायकवाडने केरळ येथील शिबिरात अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. तसेच रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्यात सहभाग नोंदवला. केरळ येथे संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील कलागुणांच्या सादरीकरणातही सहभाग नोंदवला.
वृक्षारोपण, स्वच्छता जनजागृती, आरोग्य विषयक जागृती, शैक्षणिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रचार-प्रसार हे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करण्याचे घेतलेले धडे आयुष्यात पूर्णत्वास आणण्याचा संकल्प त्याने सत्कारप्रसंगी बोलून दाखविला.
यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रवीण सोनुने, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, कार्यालयीन अधिक्षक भागवत गवंडी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. समाधान इंगळे, प्रा. शरद सदाफुले, डॉ. दहे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांची यावेळी उपस्थिती होती.
