गेवराई शहरातून जाणार्या महामार्गाच्या डांबरीकरण कामासाठी विजयसिंहांकडून अजितदादांना साकडे
===================
महिनाभरात कामास मंजुरी देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
--------------------------------
गेवराई, (प्रतिनिधी) ः- सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ (जुना क्र.२११) चे चौपदरीकरण झाल्यानंतर गेवराई शहरातून जाणार्या या महामार्गाकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे मोठे दुर्लक्ष झाले होते. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे नागरीक आणि वाहनधारक त्रस्त झाले असून अलिकडे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले होते. या पार्श्वभुमीवर विजयसिंह पंडित यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेवून त्यांना याबाबतचे लेखी निवेदन दिले. लवकरच प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेवून कामास मंजुर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे महिनाभरात या कामास मंजुरी मिळणार असल्याची माहिती विजयसिंह पंडित यांनी दिली आहे.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ (जुना क्र.२११) या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेवराई शहरातून जाणार्या महामार्गाच्या भागाचे डांबरीकरण किंवा वेळेवर दुरुस्तीचे कामही केलेले नाही. शहरातून जाणार्या या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे, त्यामुळे वाहनधारक त्रस्त झालेले असून अलिकडे नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभुमीवर बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट घेवून त्यांना लेखी निवेदन दिले. गेवराई शहरातून जाणार्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, रस्त्यावर दुभाजक बसवून रस्त्याचे रुंदीकरण करावे या कामासाठी राज्याच्यावतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती विजयसिंह पंडित यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विजयसिंह पंडित यांच्या मागणी बाबत अतिशय सकारात्मक भुमिका घेवून पुढील आठवड्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेवून गेवराई शहरातून जाणार्या महामार्गाच्या डांबरीकरण आणि रुंदीकरणाच्या कामास मंजुरी देण्याचे आश्वासन दिले, सुमारे महिनाभरात मंजुरीची प्रक्रिया होईल असेही त्यांनी सांगितले. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारामुळे गेवराई शहरातून जाणार्या रस्त्याचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे.
