छत्रपती संभाजीराजेंच्या समर्थनार्थ मराठा समाज एकवटला
---------------------------
गेवराईतही होणार अमरण उपोषण ; 26 तारखेला लोटणार मराठ्यांचा जनसागर
-----------------------------
गेवराई, (प्रतिनिधी) युवराज छत्रपती खा. संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या आरक्षणासह प्रमूख न्याय व हक्कासाठी आझाद मैदानात अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राजेंच्या या निर्णयानंतर आता आंदोलनाची धग महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पसरु लागली आहे. गेवराई तालुक्यातील मराठा समाजानेही एक मुखाने संभाजीराजेंना पांठिबा दर्शवत शास्त्री चौकात अमरण उपोषण करण्याचा निर्धार केला असून दि. 26 फेब्रुवारी रोजी हजारोंच्या संख्येने मराठा समाज गेवराईत एकवटणार आहे.
मराठा आरक्षणाला राजकीय मुद्दा बनवून राज्यातील प्रमूख पक्ष आरक्षण प्रश्न झुलवत ठेवत आहेत. आरक्षणाबरोबरच समाजाच्या विकासास सहाय्यक ठरणार्या मागण्या मान्य करुनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे संतप्त झालेल्या खा. युवराज छत्रपती संभाजीराजेंनी आता थेट आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानात होणार्या या उपोषणाची धग आता गावागावात पोहचत आहे. गेवराई तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या वतीने सोमवारी (दि.21) गेवराईत बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी सर्व समाज बांधवांच्या वतीने एकमुखाने खा. संभाजीराजेंच्या भुमिकेला पाठिंबा देण्यात आला. तसेच आरक्षणाची चळवळ पुन्हा गतीमान करण्यासाठी व आक्रमकपणे आपला न्याय व हक्क मिळवण्यासाठी समाजाने भुमिका घेण्याचे ठरवले. तसेच खा. संभाजीराजेंच्या उपोषणादिवशीच त्यांना पाठिंबा म्हणून गेवराईच्या शास्त्री चौकात अमरण उपोषण करण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला. तसेच दि.26 रोजी तालुक्यातील गावागावातून मराठा समाज गेवराईत दाखल होणार असून हजारोंच्या उपस्थितीत हे उपोषण सुरु होणार आहे. तसेच यावेळी सरकारने छत्रपतींच्या उपोषणापुर्वीच मागण्या तात्काळ मान्य करुन त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
चौकट
--------------
*उपोषण कालावधीत जि.प.गटनिहाय गावांची उपस्थिती*
------------------
26 तारखेला उपोषण सुरु करतांना तालुकाभरातून मराठा बांधव एकत्र येणार आहेत. तर उपोषण सुरु झाल्यानंतर जर सरकारने याची दखल घेतली नाही. तर जो पर्यंत उपोषण सुरु आहे तोपर्यंत प्रत्येक दिवशी एका जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमधील मराठा बांधव गेवराईत उपस्थित राहणार आहेत.
चौकट
-----------------
*पक्ष, संघटनेचे झेंडे बाजूला*
------------------
गेवराईच्या या मोर्चासाठी विविध पक्ष, संघटनेतील मराठा पदाधिकार्यांनी आपआपले राजकीय विचार व व्यक्तीगत मतभेद बाजूला सारुन पुढाकार घेतला आहे. मराठा सेवक म्हणून प्रत्येकाने घेतलेला सक्रीय सहभाग हीच क्रांती मोर्चाच्या यशाची नांदी ठरणार आहे. गेवराईतील अमरण उपोषण व मराठा बांधवांची उपस्थिती ही रेकॉर्ड ब्रेक असणार असल्याचा विश्वास क्रांती मोर्चाने व्यक्त केला.
