प्रिय...आमदार साहेब.
नमस्कार,
वि.वि....पत्रास कारण की, आज आपला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपणास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!
खर म्हणजे, तुम्ही दुसर्यांदा आमदार झालात ना, तेव्हाच अभिनंदनाचे पत्र लिहायचे होते. पण, लिहायचे राहून गेले. हल्ली पत्र लिहिणे मागे पडले आहे. नेट संवादाची संस्कृती आली आहे. इंटरनेट क्रांतीने हे सगळे घडून आले आहे. पत्र, इतिहासाची देण आहे. पोर्तुगीज, डच कागदपत्रात छत्रपती शिवाजी राजे यांच्या पत्राच्या नोंदी आढळतात. साने गुरूजी, महात्मा गांधी, पंडित नेहरू, आचार्य अत्रे यांनी लिहलेली पत्रे वाचली आहेत. साने गुरूजींनी आईला उद्देशून लिहिलेले पत्र मनाला भूरळ पाडते. कुलगुरू शिवाजीराव भोसले म्हणायचे, आवडत्या व्यक्ती विषयी पत्र लिहून त्या व्यक्तीचे स्मरण करणे म्हणजे, अक्षर संवाद असतो. म्हणूनच, सवडीने हे पत्र लिहायचा प्रयत्न केलाय. वेळ ही चांगली आहे. तुमचा वाढदिवस ही आहे. तुमच्या आमदारकीला सात वर्ष पूर्ण झालीत. म्हणून, हा दोन ओळीचा पत्र प्रपंच..! पत्र एकांतात लिहता येते. ज्यांच्या विषयी लिहायचे ते समोर नसतात. मनातल्या भावना मन मोकळ्या शब्दात मांडता येतात.
तुमच्या एवढा भला राजकारणी माणूस कुणाला भावनार नाही. चांगली माणस समाजाला हवीच असतात. लोक म्हणतात, राजकारणात चांगली माणसे राहीली नाहीत. खर तर, आपण नीटपणाने वागलो सवरलो, भल्यांचे मागे राहीलो तर अवघड काय आहे. तुम्ही राजकारण नवखे असताना ही लोकांनी टाकलाच ना विश्वास..! तुमची कुठे टेस्ट झाली होती. वाटल म्हणून लोक पाठीशी आले. नगरसेवक, उपाध्यक्ष, नगराध्यक्ष आणि आमदारकी मिळाली. नशीब आणि प्रारब्ध, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या पुढ्यात आल्यात. त्यातून हे वलय, वैभव, पवारांच्या घराला "राजकीय घरपण" आणायला कारण ठरले आहे.योग म्हणजे, तुम्ही पहिल्यांदा आमदार झालात. सत्ता ही आली. पंधरा वर्षांपासून नगर परिषदेची सत्ता होतीच. आमदारकीने शहराला आणखी चांगले दिवस आले.
सत्तेतील पाच वर्ष तुम्ही केवळ विकासात्मक कामात घालवलीत. विरोधक आहेत म्हणून कधी कुणाशी वैर धरले नाही. हेच संचित तुम्हाला दुसर्या आमदरकीला कामाला आले. याच एका उर्जेवर तुम्ही आमदार झालात, केवढे हे भाग्य..!
काही राजकारणी अगदी क्षुल्लक कारणावरून कार्यकर्त्यांना, गावाला वेठीस धरतात. सूड भावनेतून फटकून वागतात. असा बदमाश पणा कधी कुणी करू नये, कारण सत्ता म्हणजे सूड घेणे नसते. तसेच, राजकारणातली खूर्ची सदैव राहत नाही. एवढे ध्यानी यायला हरकत नसते. तुम्हाला कधी सत्तेचा मोह नव्हता आणि नाही. सत्तेचा दुरुपयोग फार लांबची गोष्ट आहे. सत्ता , पैसा आणि त्यातून येणारा उन्माद औषधाला दिसला नाही. तत्कालीन मुख्यमंत्रीच्या गुडबुक मध्ये तुमचा उल्लेख होत असायचा. त्याने तुम्ही कधी हुरळून गेल्याचे दिसले नाही.
तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी तुमच्यातला कुल राजकारणी, काय करू नये आणि कोणत्या वेळी काय करावे. या दृष्टिकोनातून तुमचा निर्णय, एखाद्या सर्वसमावेशक विषयावर तुम्ही घेतलेला स्टँड तुमची प्रगल्भता दर्शवितो. हे एका स्थितप्रज्ञ माणसाचे लक्षण आहे. त्याचा अनुभव ही आला. खूर्ची ला शुन्य किंमत देणारा आणि सार्वजनिक हिताला अधिक महत्त्व देणारा राजकारणी कम समाजकारणी माणूस म्हणून तुमची नोंद झाली आहे. तुम्ही परखड बोलायला कधी ही विचलित झाला नाहीत. हे सत्य कोण नाकारील. मत द्यायचे तर द्या नाही तर नका देऊ, कुणाला निवडून आणायचे ते तुम्हीच ठरवा. मी, खोट बोलत नाही आणि सहन ही करणार नाही. कारण,
मी, कुणाच्या दहा पैशाचा मिंदा नाही. विधानसभेच्या ऐन निवडणुकीत थेट बोललात. केवढ हे धाडस. शोभलात तुम्ही.
आबासाहेब, सत्य बोचत राहत बर का, पण शेवटी लोकांना सत्यच आवडत. त्यामुळेच तुमच्या विषयी मतदारांनी सहानुभूती दाखविली. राजकारणात बोलायच एक आणि करायचे एक, असे दुहेरी मापदंड चालत राहीलेत. दादा कोंडके यांच्या दुहेरी संवादा सारखे, तुम्ही मात्र अपवाद राहीलात. कामावर निष्ठा ठेवून चालत राहीलात. पक्षाशी निष्ठा, कार्यकर्त्यांशी तुमची जोडलेली नाळ अधिक घट्ट होत गेली आहे. तिला आणखी वृद्धिंगत करायचे काम तुम्हालाच करायचे आहे. ऋणानुबंध पुढच्या पिढीला मार्गदर्शन करतील.
आमदार साहेब, तुमच्या स्वाक्षरीचे (सही) नेहमीच कुतूहल वाटत राहीले आहे. खूप आकर्षक सही आहे. सही संदर्भात एक पुस्तक वाचण्यात आले होते. हा संदर्भ घेऊन असे म्हणता येईल की, तुमच्या सहीचा आकार उंच जाणारा आहे. सहीने व्यक्तिमत्त्वातले बारकावे शोधता येतात. अशा स्वाक्षरीचे माणसे स्वच्छंदी, परखड विचाराचे असतात. पोटात एक अन ओठांवर एक , या धाटणीतले नसतात. खूप प्रेमळ ही असतात. अगदी नारळा सारखे..! तुमची सही तुमच्या सारखीच सुंदर दिसते. प्रयत्न करून ही सहीची नकल करता येणार नाही, एवढी भन्नाट सही आहे. फार स्तुती करतोय, असे काही नाही. मनातल्या भानवा शब्दबद्ध झाल्यात. दुसरे काही नाही. नाहीतरी, पवारांच्या घरा विषयी मनात एक कवडसा आयुष्यभर राहणारच आहे..!
आणखी एक विषय..! तुमच्या बोलण्यातून आय.एल.एस. (ils) या विधी महाविद्यालयाचा उल्लेख होत असे. तिथेच तुमचे "लाॅ" झाले आहे. या काॅलेजचे पूर्ण रूप माहित नव्हते. तुम्हाला विचारीन म्हणायचो पण राहीले. इंडियन लाॅ सोसायटीचे महाराष्ट्रातले टाॅपचे काॅलेज आहे. माझ्या मुलाला ही ils लाॅ काॅलेज ला जायच होत. तेव्हा तुमची आठवण झाली. मी त्याला म्हणालो, अरे विश्वजित, आपले आमदार ॲड.लक्ष्मण अण्णांचे याच काॅलेज मध्ये शिक्षण झालय. मग त्याने काॅलेजचा इतिहास सांगितला. त्याला सीईटी ला 86% पडले. ils चे मिरीट लिस्ट 98% गेल्याने प्रवेश मिळाला नाही. ils काॅलेज ने प्रवेश घ्यायचा का म्हणून विचारना केली. मात्र, तोवर यशवंतराव चव्हाण लाॅ काॅलेजला (पुणे ) प्रवेश झाला होता. न राहून, ils काॅलेज ला भेट दिली. काय भव्य काॅलेज आहे. आमदार साहेब, खरच तुम्ही भाग्यवान आहात. आणि आम्ही सुद्धा. महाराष्ट्रात नव्हे तर देशात नाव असलेल्या काॅलेज चा एक विद्यार्थ्यी गेवराई मतदारसंघाचा लोकप्रिय आमदार आहे.
आबासाहेब, पवारांच्या राजकीय भूमिके मुळे, अनेक माणसे तुमच्या जवळ आली आहेत. त्यांना सांभाळायची जबाबदारी तुमचीच आहे. बर, कार्यकर्त्यांचा जीव केवढास असतो. त्यांना ही मर्यादा असतात. त्यामुळे, तुमच्या खांद्यावर माना टाकून राजकारणातली वाट तुडवावी लागते. तुमची सोबत त्यांना हत्तीच बळ देत राहते. काही वेळा कार्यकर्त्ये नाराज होतात. रूसतात, फुगतात. अनेकदा असे वर्तन हक्काने, तेवढेच लाडीकपणाचे असते. तुम्ही पालक म्हणून समजून घेऊन कार्यकर्त्यांची मने सांभाळली पाहिजेत. अशीच अपेक्षा असते. वाद विवाद लोकशाहीत शोभून दिसतात. फक्त मनभेदाने माणसे दूर जावू न देता संवादातून वाट काढणे तुमच्या साठी फार मोठी गोष्ट नाही. पोटच्या लेकराने चुका केल्या म्हणून आई त्याला सोडून देते का ? तुम्ही तर गेवराई ला आई मानता. याचाच अर्थ तुमचे दातृत्व आईच्या भूमिकेत मोडते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, बहूत काय सांगावे, सूज्ञ असा..!
आमदार साहेब, महासत्ता म्हणजे तरी काय हो..! आपण आपले आत्मनिर्भर होणे. उदा. गेवराई शहर, नगर परिषद च्या माध्यमातून शहरात रस्ता, नाली, वीज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, भव्य नाट्यगृह, जलतरण तलाव आदी विकासात्मक गोष्टी झाल्यात. नगर परिषदेची देखणी इमारत उभी राहीली आहे.
शहर विकासाच्या बाबतीत सुदृढ झाल आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे, पैठण च्या नाथ सागरातून 65 कोटीची पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आली आहे. शहर आत्मनिर्भर होतय. यालाच महासत्ता म्हणतात. तुमच्या प्रयत्नाला यश लाभले आहे. मात्र, ग्रामीण भागातील मोठी गावे पाणी, लाईट, रस्ते विकासा पासून अजूनही दूर आहेत. मोठ्या बाजार पेठेतील ही गावे नागरीकांना वेळेवर पाणी देऊ शकत नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे. अजून ही महिलांना डोक्यावर पाणी आणावे लागते. 79 गावातल्या पाणी पुरवठा योजना कुठे आहेत ? हा पैसा नेमका कुठे गेला. आपण या प्रश्नाकडे लक्ष दिले तर बरे होईल.
माध्यम तत्वज्ञ,अल्वीन टाॅपलर यांनी "तिसरी लाट" येणार म्हणून भाकीत केले होते. भाकीत खरे ठरले आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जगात चमत्कारिक प्रवेश केला. आपल्या आयुष्यात ही "तिसऱ्या लाटेचा" स्पर्श झाला तर नवल घडेल. हे मन्वंतर घडून येईल आणि तुमच्या कर्तृत्वाला "तीन" झुंबर लागतील. तत्वज्ञानाचा भाष्यकार खलील जिब्रान म्हणतो, महात्वाकांक्षी माणसांना दीर्घायुष्य असते. तुमच आयुष्य ही जनतेच्या सेवेसाठी लाभत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, अशी महादेवा चरणी प्रार्थना..!
आपलाच..!
सुभाष सुतार
(पत्रकार)
