धक्कादायक ! सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाने केली आत्महत्या
माजलगाव : अमर साळवे
शनिवारी मोठ्या थाटात लग्न केल्यानंतर नवरी-नवरदेवाने नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आज सत्यनारायण पूजा करण्यात आली. मात्र, सत्यनारायण पूजा संपताच नवरदेवाने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी तालुक्यातील नित्रुड येथे घडली. पांडुरंग डाके असे मृत तरुणाचे नाव आहे.
नित्रुड येथील पांडुरंग रामकिसन डाके (२६ ) हा शेती करत होता. त्याचे शनिवारी माजलगाव येथील मुलीसोबत थाटामाटात लग्न झाले. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास नव्या नवरी-नवरदेवासाठी सत्यनारायण आयोजित करण्यात आला. लग्नानंतर नव्या आयुष्याची होणार असल्याने पांडुरंग आनंदित होता. मात्र, सत्यनारायण झाल्यानंतर पाहुणे, ग्रामस्थांच्या पंगती बसलेल्या असताना पांडुरंग कोणालाही न सांगता थेट शेतात गेला.
शेतात पांडुरंग याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील शेतकऱ्याने ही घटना पाहताच पांडुरंगच्या घरी याची माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईक आणि पोलीस घ्तानास्थाली दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. पांडुरंगच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
