बहुजनांचे कैवारी : श्री. छत्रपती राजर्षी शाहू महाराज.
आपल्या राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात भरीव स्वरूपाच्या सुधारणा करून लोककल्याण करण्याचा प्रयत्न करणारे तसेच या सर्व सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सुधारणा मुळे ज्यांचा लोक नाम उल्लेख शेतकऱ्यांचा राजा, मल्लाचा राजा, लोकांचा राजा म्हणजेच लोक कल्याणकारी राजा आणि भारतीय विद्यार्थी वस्तीग्रहाचे ' आद्यजनक ' म्हणून करू लागले असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा आज जन्मदिवस. एक आदर्श राजा आणि बहुजन समाजाचे कैवारी म्हणून असलेली त्यांची लोकप्रियता शेवट पर्यंत कायम टिकून राहिली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचे व्यक्तीमहत्व कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित न राहता जगभर ही लोकप्रिय झाले.
इ.स. १७०८ मध्ये कोल्हापूर या स्वतंत्र राज्याची स्थापना झाली. या राज्याचे राजे चौथे शिवाजी महाराज यांचे २५ डिसेंबर १८८३ रोजी निधन झाले. त्यांना अपत्य नसल्याने कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभर पाहण्यासाठी दत्तक पुत्र घेण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यामुळे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी घाटगे घराण्यातील जयसिंगराव आबासाहेब घाटगे यांचे पुत्र यशवंतराव यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले. दत्तक घेतल्या नंतर यशवंतरावांचे नाव ' छत्रपती शाहू ' असे ठेवण्यात आले. हेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणून पुढे जग विख्यात झाले.
शाहू महाराज कोल्हापूरला दत्तक म्हणून येण्यापूर्वीच त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला होता. इ.स. १८८५ मध्ये महाराजांना ' राजकोट ' येथे महाविद्यालयात पाठवण्यात आले. कुस्ती, शिकार आणि घोड्यावर बसणे याबाबतीत महाराजांची बरोबरी करणारा एकही राजकुमार तेथे नव्हता. इ.स. १८८५ ते १८८९ पर्यंत महाराजांनी राजकोट येथील महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. इ.स. १८९० ते १८९४ या काळात महाराजांचे ' धारवाड ' येथे शिक्षण पूर्ण झाले. सर स्टुअर्ट फ्रेझर आणि सर रघुनाथराव व्यंकाजी सबनीस हे त्यांचे धारवाड येथील गुरू होते. तेथे महाराजांनी इंग्लिश भाषा, राज्यकारभार आणि जगाचा इतिहास इत्यादी विषयाचे सखोल अध्ययन केले. महाराजांचा विवाह धारवाड येथे शिक्षण घेत असताना १ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांच्या पत्नी श्रीमंत लक्ष्मीबाई साहेब या बडोद्याचे गुनाजीराव खानविलकर यांच्या कन्या होत्या.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी २ एप्रिल १९९४ रोजी कोल्हापूर राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी त्यांनी सर्व प्रजाजनांना जाहीर केले कि ' आमचे प्रजाजन सदासुखी व संतुष्ट असावेत '. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाच्या विकासासाठी व उद्धारासाठी शिक्षण महत्वाचे मानले. त्यामुळे त्यांनी समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना व स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केल्या. बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे मत महात्मा जोतीराव फुले यांचे होते. महात्मा जोतीराव फुले यांच्या या धोरणाचाच शाहू महाराजांनी स्वीकार केला. बहुजन समाजास मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शिक्षण हेच महत्वाचे स्थान आहे हे ओळखून शाहू महाराजांनी राज्यामध्ये शैक्षणिक सुधारणा केल्या. शिक्षण क्षेत्रात उच्यवर्गीय समाजाची मक्तेदारी होती. बहुजन समाजास शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच त्यांना शिक्षणाचे महत्व देखील माहीत नव्हते. शाहू महाराजांनी त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि गरिबांच्या झोपडी पर्यंत शिक्षण पोहचविण्याचे कार्य केले.
कोल्हापूर राज्यामध्ये असलेला समाज आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला होता. शिक्षणाशिवाय त्यांच्यात परिवर्तन आणि प्रगती होणार नाही याची जाणीव शाहू महाराजांना झाली. त्यामुळे त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती जाहीर केल्या. इ. स. १८९६ चा दुष्काळ आणि नंतर आलेली प्लेगची साथ या काळात शाहू महाराजांनी खूप मेहनतीने दुष्काळी कामे, तगाई वाटप, धान्य वाटप आणि निराधार आश्रमाची स्थापना असे विविध सामाजिक कार्य केले अश्या रीतीने केलेले सामाजिक कार्य पाहून रयत ' असा राजा होणे नाही ' असे म्हणू लागली. शाहू महाराजांचा शाहूपुरी व्यापरपेठ, शेतकऱ्याच्या सहकारी संस्था, शेती तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ' किंग एडवर्ड अग्रिकल्चर इन्स्टिट्युट ' इत्यादी संस्था स्थापण करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी आणि शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अश्या उपक्रमांतर्गत त्यांनी कृषी क्षेत्राकडे लक्ष्य पुरविले. तसेच शाहू महाराजांनी इ. स. १८९५ साली शाहूपुरी गुळाची बाजारपेठेची स्थापना केली. इ. स. १९०१ साली जैन बोर्डिग व मराठा बोर्डिंग ची स्थापना केली आणि पंचगंगा नदी घाट सर्वांसाठी खुले केले. इ.स. १९०२ साली ५०% आरक्षणाचा कायदा केला. इ.स. १९१६ मध्ये त्यांनी राज्यातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याचा कायदा केला. प्रत्येक विद्यार्थ्याला शाहू महाराजांनी एक रुपया शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी बहुजन समाजामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली हे महत्वाचे ठरते.
राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजास राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापण केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने महाराजांनी इ. स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अगदी अल्पकाळात राज्यात विविध प्रकारच्या सुधारणा केल्या. त्यामुळे सर्व दृष्टीने जनतेची प्रगती झाली. त्यांच्या या सुधारणे मुळेच जनता त्यांना " राजर्षी छत्रपती " संबोधू लागली. शाहूंच्या महाराजांच्या सामाजिक कार्यामुळे सामाजिक परिवर्तनास चालना मिळाली. अश्यारीतीने समाजास प्रेमाने आणि मायेने आपलेसे करून सर्व समाजास समान दर्जा देणारे आणि त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारे तसेच लोकांना समान न्याय देणारे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस
" सामाजिक न्याय दिवस " म्हणून साजरा केला जातो.
" बहुजनांचे कैवारी: श्री. छत्रपती राजर्षी शाहू महाराज " यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
*लेखक*
*शुभम चंद्रकांत शिंदे, गेवराई.*
*(मो.नं.८१४९६४००९१)*