पिसाळलेला कुत्रा चावल्याने
गेवराई(वार्ताहर): पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वेळेत लक्षात न आल्याने शाळकरी मुलाचा रेबीजने मृत्यू झाला.पुनित जितेंद्र मुंदडा (वय ८ वर्ष , रा. सरस्वती कॉलनी क्रमांक.१ गेवराई) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. कुत्रा चावलेला लक्षात न आल्याने पुनितने कुत्रे चावल्याचे कुणालाच सांगितले नाही. १५-२० दिवसांत रेबीजच्या प्रभावाने त्याची प्रकृती बिघडली. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज वर आज तागायत परिपूर्ण इलाज नाही. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गेवराईतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पुनित आईवडिलांसह सरस्वती कॉलनी क्रमांक १ राहत होता. जितेंद्र मुंदडा दाम्पत्याचा तो धाकला मुलगा. तो दुसरीच्या वर्गात शिकत होता. सरस्वती कॉलनी क्रमांक १ जवळील रस्त्यात सायकल चालवत असताना कुत्रा मागे लागल्याने पुनित घाबरला त्या दरम्यान सायकल वरून पडला व पिसाळलेल्या त्या कुत्र्याने त्याच्या कानाजवळ चावा घेतला, त्या वेळी लोकडाऊन असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती, ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही.कुत्र्याने चावा घेतल्याचे पुनीतलाही लक्षात आले नाही.त्याला वाटले सायकल वरून पडल्याने मार लागला म्हणून घरी पुनित ने सायकल वरून पडल्याचे सांगितल्याने त्या दृष्टीने त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यात आली. पाच सहा दिवसांपूर्वी पुनित ने पाणी पाहता क्षणी तो घाबरू लागला, थरथर कापू लागला. या तक्रारी वाढल्याने वडिलांनी त्याला खासगी दवाखान्यात उपचार घेतला. डॉक्टरांनाही त्याने कुत्रे चावल्याचे सांगितले नाही, त्यामुळे नेमका उपचार झालाच नाही. प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला अखेर कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथे हलवण्यात आले.येथील डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केल्यानंतर रेबीज झाल्याचे लक्षात आले. उपचाराला विलंब झाल्याने रेबीजची लक्षणे बळावली होती. येथील डॉक्टरांनी पुनित ला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले, मात्र यात यश आले नाही. 4 मे ला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्क्यातून आई-वडील अद्यापही सावरलेले नाहीत. गेवराई शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. दिवसा व रात्रीच्या वेळी भटकी कुत्री लोकांवर हल्ले करतात, त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यावर नगरपालिका ने लक्ष घालावे. आणखी किती निष्पाप जीवाचा ही कुत्री बळी घेणार हा प्रश्न आहे.सदरील घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेमुळे गेवराई तालुक्यात कुत्र्या विषयी लोकांत भीती निर्माण झाली आहे, सदरील घटनेबाबत श्री. प्रतापराव खरात , श्री.बाळासाहेब बरगे, श्री.हरेश मघारामाणी, श्री.अभिजीत काला यांनी गेवराई व्यापारी महासंघ, गेवराई किराणा व्यापारी संघटना, आसरा फाऊंडेशन च्या वतीने सदरील घटने बाबत श्रद्धांजली देत आपले दुःख व्यक्त केले. लोकांनी जागरूक राहून घरा बाहेर पडताना अशा कुत्र्यापासून बचाव करण्याचे आहवान केले.
